विश्वभूषण डॉ. बाबासाहेबांची स्फूर्तीज्योती : रमाई आंबेडकर
भारताची भूमी ही रत्नांची खाण आहे. या भूमीत स्वाभिमान, कर्तृत्व,शौर्य,पराक्रम,परोपकार,
बुद्धीचा फुलोरा सदैव दरवळतो. महामानवांच्या व महानायिकांच्या असीम त्यागामुळेच हा देश आज ताठ मानेने उभा आहे. अशा महानायिकांच्या यादीत रमाई भिमराव आंबेडकर हे नाव अग्रणी आहे. आज २७ मे माता रमाई अर्थात रमाई भिमराव आंबेडकर यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने हा अभिवादन म्हणून लेख लिहिला आहे. प्रथमतः स्मृतीदिनानिमित्त माता रमाईंना विनम्र अभिवादन....
जन्म व बालपण
माता रमाई यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ ला दापोलीजवळ वनंदगाव येथे झाला.वडील भिखू धुत्रे वारकरी संप्रदायाचे अनुयायी,अत्यंत सोज्वळ व प्रामाणिक,विठ्ठलावर त्यांची अपार भक्ती होती.रमाईंना आणखी तीन भावंडे होती, आक्का,गौराबाई आणि शंकर. लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले,आणि त्यांच्या कष्टाला सुरूवात झाली. वयाच्या आठव्या वर्षी घरातील कामाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. आईची सर्व कामे त्या करू लागल्या.शेण व सरपण गोळा करणे,घरकाम करणे ,अशातच वडीलांचेही अकाली निधन झाले.आणि रमाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला.त्यानंतर त्यांच्यासह निराधार भावंडांना काकांनी व मामांनी आधार दिला. बालपणातील याच परिस्थितीने त्यांना समंजस, शोषिक,कष्टाळू आणि आज्ञाधारक बनवले होते.
विवाह
सुभेदार रामजी यांनी रमाईंना पाहिल्यावर त्यांनी आपला मुलगा भिमराव यांच्याशी त्यांचा विवाह करण्याचे ठरवले.रमाई ९ वर्षाच्या असताना भायखळा ,मुंबई येथे भीमराव व रमाई यांचा विवाह पार पडला. त्यांनी सासर व माहेर एक मानून संसार केला.
जबाबदारीची जाणीव असणारी पत्नी रमाई
रमाई ह्या कारूण्य,त्याग आणि समर्पणाची मुर्ती होत्या. त्यांच्या त्यागाला संपूर्ण विश्वामध्ये तोड नाही.डॉ.भिमराव आंबेडकरांना आखिल राष्ट्राचे थोर पुरुष जर कोणी बनवले असेल तर ते माता रमाईंने. रमाईंच्या साथीने आणि त्यागानेच बाबासाहेब उच्चशिक्षण घेऊ शकले.रमाईंनी जर बाबासाहेबांना साथ दिलीच नसती तर बाबासाहेब कदाचित राष्ट्रउद्दारक झालेच नसते.
रमाईंनी आपल्या सर्व सुखाचे बलिदान हे बाबासाहेबांसाठी व बहुजन समाजाच्या दास्यमुक्तीसाठी केले. जेव्हा बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले,तेव्हा एकट्या रमाईने संपूर्ण कुंटुंबाचा भार आपल्या खांद्यावर उचलला. असंख्य संकटे त्यांच्यावर आली पण बाबासाहेबांकडे कधीही त्यांची तक्रार केली नाही,असंख्य आव्हाने पेलून बाबासाहेबांचा संसार केला,प्रसंगी शेणाच्या गोवऱ्या थापल्या आणि विकल्या.
बाबासाहेब जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा जाताना त्यांनी रमाईंना काही पैसे दिले,
ते काही दिवसातच खर्च झाले. त्यानंतर उदरनिर्वाह करण्यासाठी रमाई,भाऊ शंकर आणि बहीण गौराबाई हे मोलमजुरी करून ८-१० आणे कमावत.रमाई मिळालेल्या पैशातून किराणा सामान आणून स्वयंपाक करून घरातील सर्वांना खाऊ घालत.खूप कष्ट व हलाखीचे होते ते दिवस.कधी -कधी त्या अर्धपोटीच राहत तर कधी उपाशीपोटीच रात्र काढत,ही परिस्थिती भयावह होती.तरीही त्यांनी खंबीरपणे या परिस्थितीवर मात केली.
डॉ.भिमराव आंबेडकर
ज्या बहुजन समाजाला पिढ्यानपिढ्या ज्ञानाची दारे बंद करण्यात आली होती,त्या समाजात बाबासाहेबांच्या रुपानं ज्ञानसूर्य जन्माला आला.आपल्या पतीस मोठी पदवी मिळाली ( बी.ए.ची पदवी १९१२ ला मिळाली) याचा रमाईंना झालेला आनंद अवर्णनीय स्वरुपाचा होता. बाबासाहेबांच्या शिक्षणाचं अप्रुप त्यांना नेहमीच वाटे.रमाईने बाबासाहेबांकडून शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. बाबासाहेब ध्येयधोरणासंबंधी चार गोष्टी रमाईंशी नक्कीच बोलत असत. इतर स्त्रियांच्या पतिपेक्षा आपल्या पतीमध्ये वेगळे अलौकिक काहीतरी आहे,हे त्या जाणून होत्या. त्यामुळे आपल्या परीने जे जे शक्य ते ते पतीसाठी करण्याचा संकल्प त्यांनी केला होता.त्या स्वतः लिहायला आणि वाचायला शिकल्या होत्या.
३० जानेवारी १९३० ला बाबासाहेब लंडनला गोलमेज परिषदेला गेले असता,त्यांनी रमाईंना पत्र लिहिले,त्यात ते लिहितात ....."रामू,तू जर माझी पत्नी नसतीस तर आज लोकांना डॉ.भिमराव आंबेडकर हे नाव कळले नसते.यामागे सारे श्रेय तुझे आहे.तुझी निष्ठा होती म्हणून मी भिमरावांचा डॉ.भिमराव आंबेडकर झालो.मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले अन् समाजाकडे लक्ष दिले." त्यामुळेच असे म्हणावे वाटते की,रमाई ह्या बाबासाहेबांच्या स्फूर्तीज्योती झाल्या आणि बाबासाहेबांना प्रकाशमान केले.तसेच १९१३-१९१७ दरम्यान शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्यावर बाबासाहेब रमाईंना पत्र लिहित तसेच रमाईही बाबासाहेबांना उत्तरार्थ पत्र लिहित.......एका गीतकाराने त्यांच्या पत्राचे बोल गीतात परिवर्तित केले ते असे....।
"पत्रात लिहिते रमा.....
साहेब माझी चिंता न करता शिका,
मी लेकरांना सांभाळते...,
तुम्ही साहेब स्वतःला जपा...
पत्रात लिहिते रमा....
उपाशी कधी,मी शिळीपाकी खायील...
पण,तुमची रामू तुमच्या पाठीशी राहिल...
करु नका हो पर्वा,सांभाळते मी सर्वा...
तुमची रामू ही बोलते स्वतः
कष्टाची माझ्या चिंता नसू द्या....
अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू द्या...
पत्रात लिहिते रमा....."
या गीतातून बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी रमाई ह्या त्यांच्या बरोबर खंबीरपणे साथ देत होत्या,त्यांच्यासाठी केलेला त्याग हेच यातून दिसून येते.
बाबासाहेब आणि रमाई यांचे आपल्यावर कर्ज आहे. आणि हे कर्ज जर उतरायचं असेल तर समाजात जाऊन सामाजिक कार्य करून आपण या महापुरुषांचे,महामानवांचे विचार पसरवण्याचे कार्य करावे आणि रमाई यांच्या त्यागामुळे,संघर्षामुळेच माझ्यासारख्या करोडो लेकी आज लिहायला आणि बोलायला लागल्या आहेत,याची जाणीव आपल्याला हवी.आज जर बाबासाहेब हवे असतील तर स्त्रियांनी सुद्धा रमाईंचे गुण घेणे गरजेचे आहे.
यशवंत नावाचा वारसा
आपले गुरु महात्मा फुले यांच्या दत्तक मुलाचे नाव यशवंत तसेच छत्रपती शाहू महाराजांचे मुळनाव यशवंत. यावरुन बाबासाहेब आणि रमाई यांनी आपल्या मुलाचे नाव यशवंत ठेवले.हा यशवंत नावाचा वारसा त्यांनी होळकरशाहीतील शूर व कर्तबगार यशवंतराव होळकर यांच्याकडून घेतला आहे.याच यशवंतराव होळकरांनी पुण्यातील बाजीराव पेशव्यांचा पराभव करून पेशवाईला गाढण्याचा प्रयत्न केला होता.नेमका हाच वारसा फुले दाम्पत्याने व पुढे बाबासाहेब व रमाईंनीही चालवला.
आज रमाईंना नाकारले जात आहे
डिसेंबर २०१८ ला मी सहकुटुंब 'दिक्षाभूमी',नागपूर येथे गेले होते.त्या ठिकाणचे चित्र पाहून माझे मन हेलावून गेले.
दिक्षाभूमीच्या दालनात गेल्यानंतर पाहिले की,त्याठिकाणी बाबासाहेबांच्या ५१ प्रतिमा लावलेल्या आहेत.त्यापैकी ४५ प्रतिमांमध्ये सविता कबीर बाबासाहेबांसोबत दिसून येतात. परंतू तेथे एकाही प्रतिमेत बाबासाहेबांसोबत रमाई दिसून आल्या नाहीत.हे कार्य सहज वा अनावधानाने घडलेलं नसून अगदी जाणीवपूर्वकच केलेले असावे,असा तर्क निघतो.
यातून हेच दिसून येते की,ज्या मातेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेबांना आधार दिला.अनेक हाल अपेष्टा सहन करुन त्यांनी बाबासाहेबांना साथ दिली.त्या मातेचा एकही फोटो याठिकाणी नसणे म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक नाकारले किंवा दुर्लक्षित केले जात असावे,असे दिसून येते.अशा या गंभीर वास्तवाचे प्रत्यक्ष निरीक्षण वा तपासणी करुन वाचकांनी रमाईंना जो नाकारण्याचा प्रयत्न होत आहे,तो हाणून पाडला पाहिजे असे मी नम्र आवाहन करेल.
अशा या त्यागमूर्ती तथा बाबासाहेबांच्या स्फूर्तीज्योती रमाईंची २७मे १९३५ रोजी प्राणज्योत मालवली.त्यांच्या स्मृतींना त्रिवार अभिवादन....
जयभीम ! जयभारत !
लेखक :आम्रपाली विनोद वाघाळकर(लांडगे),
जालना.
vinodwaghalkar83@gmail.com
Mo.8788220560.
0 Comments