गंज गोलाई एकशेचार वर्षांची

आमच्या हृदयात लातूर आहे आणि लातूरच्या हृदयात आहे…गंजगोलाई! 
स्थापत्यकलेचा अप्रतिम आविष्कार म्हणजे आमची गंजगोलाई. मॉल वगैरे संकल्पना आजच्या काळातली आहे परंतु आमच्याकडे हा भव्य दिव्य मॉल 104 वर्षांपूर्वीच बांधला गेलाय. लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या बाजारपेठेची ब्लु प्रिंट तयार केली नगर रचनाकार श्री. फैयाजुद्दीन यांनी. गंजगोलाईची वास्तू 07 जून 1917 रोजी उभी राहिली आणि अद्यापही ती त्याच दिमाखात उभी आहे. आज तिचा वाढदिवस! 

दोन मजली मजबूत बांधकाम असणाऱ्या गंजगोलाईच्या मधोमध आई जगदंबेचे मंदिर आहे. त्यासभोवती आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूनेही वर्तुळाकार दुकाने आहेत. या गोलाईला शहराच्या अनेक भागातून अनेक दिशांनी कित्येक रस्ते येऊन मिळतात. या रस्त्यांचा भुलभुलैय्या फक्त अस्सल लातुरकरच समजू शकतो. आधुनिक मॉल्समध्ये जसे विविध वस्तूंचे सेक्शन्स असतात तसेच या रस्त्यांचे सेक्शन्स आहेत. त्याला लाईन म्हटले जाते. उदाहरणार्थ, लोखंड लाईन, कापड लाईन, भुसार लाईन, सराफ लाईन, इत्यादी… 
गोलाई परिसरात काय मिळत नाही? अगदी साध्यातल्या साध्या घरगुती वस्तूपासून ते महागातल्या महाग ब्रँडेड वस्तूपर्यंत सबकुछ है यहाँ! तुम्ही ती विंडो शॉपिंग करता ना, तशीच विंडो शॉपिंग करत आम्ही अख्खा दिवस घालवू शकतो या परिसरात… आणि भूक लागली तर खायची प्यायची सुद्धा भरपूर सोय आहे. इथल्या एक एक दुकानाचा स्वतंत्र इतिहास लिहिला जाऊ शकतो एवढं वैभव बाळगून आहे ही आमची गोलाई. 

गंजगोलाईबाबत जेवढं लिहू तेवढं कमीच आहे...
हॅप्पी बर्थडे डिअर! 
तुम जियो हजारों साल…