ईद उल अज़हा (बकर ईद) : समज गैरसमज
 नौशाद उस्मान

ईद-उल-़अज़हाविषयी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे या सणानिमित्त पशुंचा बळी दिला जातो. खरं म्हणजे या सणाला बळी नव्हे तर कुरबानी दिली जाते. आता बळी अन् कुरबानीत फरक काय? ते आपण थोडक्यात समजून घेऊ या. बळी म्हणजे एखादा नवस फेडण्याकरिता एखाद्या माणसाच्या नावाने पशुला मारून त्याचे मांस त्याच्या देवतांना नैवेद्य म्हणून देणे, असे सर्वसाधारपणे मानले जाते. परंतु कुरबानीमागे एक फार मोठा इतिहास आहे. तो इतिहास आपण एकदा समजून घेऊ या-
प्रेषित मुहम्मद (सल्अम्) यांच्यापूर्वी १ हजार नऊशे तीस वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. पूर्व १८६१ मध्ये (आजपासून ३,८७५ वर्षांपूर्वी) इराकमध्ये प्रेषित इब्राहिम यांचा जन्म झाला. त्यांचे पूत्र इस्माईल हेदेखील प्रेषित होते. त्या काळात अंधश्रद्धा, वाईट रीती-रूढी, चाली, र्मूितपूजा या कर्मकांडांनी थैमान घातले होते. स्वयंघोषित मध्यस्थ पुरोहितांना मोठे स्थान प्राप्त झाले होते. राजप्रमुखही पुरोहितांचे ऐकत असत.
प्रेषित इब्राहिम यांना ईश्वराकडून प्रेषित्त्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी समाज सुधारणेला सुरुवात केली. त्यांना सामाजिक परिवर्तन करून जगात क्रांती घडवायची होती. ‘ईश्वराशिवाय कुणीही पूजनीय नाही’ हाच संदेश त्यांच्या परिवर्तनवादी चळवळीचा मुद्दा होता. अल्लाहने (ईश्वराने) या महान कुटुंबाला जे मिशन दिले होते ते मिशन चालविणाNयांनी गरज पडल्यास मोठ्यात मोठे दिव्य पार पाडण्यची तयारी ठेवावी, याचे लोकांसाठी एक उदाहरण अल्लाहला दाखवून द्यायचे होते. त्यासाठी प्रेषित इब्राहिम यांच्या कुटूंबीयांची परीक्षा घेण्याचा निर्णय अल्लाहने (ईश्वराने) घेतला.
‘तुमच्या सर्वात आवडत्या वस्तूची आहुती द्या’ असा संकेत अल्लाहने वारंवार दिल्यावर प्रेषित इब्राहिम समजून गेले की अल्लाह कोणाची आहुती द्यायला सांगत आहे. पुढील वृत्तांत कुराणात दिलेला आहे-
‘‘आणि जेव्हा तो मुलगा (प्रेषित इस्माईल) त्याच्यासोबत धावपळ करण्याच्या वयाप्रत पोहचला तेव्हा हा (प्रेषित इब्राहिम) म्हणाला, ‘बाळा! मी स्वप्नात असे पाहतो की, तुझा गळा कापत आहे, तेव्हा तुझे काय मत आहे?’ तो म्हणाला, ‘‘बाबा! करून टाका ज्याचा आदेश दिला जात आहे. ईश्वर-इच्छेने तुम्ही मला दृढ असल्याचे पाहाल. शेवटी जेव्हा हे दोघेही (प्रेषित इब्राहिम व प्रेषित इस्माईल) ईश्वराला शरण गेले आणि इब्राहिमने लेकराला पालथे केले आणि आम्ही (अल्लाहने) साद दिली, ‘हे इब्राहिम! तू स्वप्न साकार केलेस. आम्ही सत्कर्म करणा-यांना असाच मोबदला देत असतो. निश्चितच ही एक उघड परीक्षा होती.’ आम्ही एक मोठी आहुती प्रतिदानात देऊन त्या मुलाची सुटका केली. आणि त्याला (आहुती देण्याच्या त्याच्या या परंपरेला) भावी पिढ्यांसाठी कायम ठेवले. सलाम इब्राहिम तुजला! (धन्य ते इब्राहिम)!’’
-कुराण (३७-१०१ते १०९)
प्रेषित इब्राहिम त्यांच्या लेकराच्या मानेवर सुरी चालवत असताना ईश्वरकृपेने प्रेषित इस्माईल यांच्या जागी एक दुंबा (मेढ्यांसारखा एक पशू) ठेवण्यात आला. आदरणीय इस्माईल यांच्याऐवजी त्या पशूच्या गळ्यावर सुरी चालली. प्रेषित इस्माईल यांना ईश्वराने सुरक्षित ठेवले. कारण अल्लाह फक्त या कुटुंबाची परीक्षा घेत होता. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी एक अभेद्य फळी निर्माण करायची होती आणि त्या चळवळीचे नेतृत्व प्रेषित इब्राहिम, प्रेषित इस्माईल व त्यांच्या कुटुंबाला देण्याची ईश्वराची योजना होती. त्यासाठी अनेक वेळा या कुटुंबाची ईश्वराने परीक्षा घेतली. त्याच बलिदानाची आठवण म्हणून या ईद-उल-अ़जहाच्या (बकरी ईदच्या) दिवशी जनावरांची कुर्बानी करून गोरगरिबांना, आप्तस्वकीयांना मांस वितरित केलं जाते.
त्यामुळे ही ़कुरबानी कोणताही नवस-बिवस नसून एक अत्त्यावश्यक अशी प्रेषित-परंपरा आहे. ज्याला शक्य आहे त्या प्रत्येक इमानवंताकरिता कुरबानी करणे आवश्यक ठरवले गेले आहे. पशुची कुरबानी केल्यानंतर त्याच्या मांसाचे तीन भाग केले जातात. एक भाग स्वत: व स्वत:च्या कुटूंबियांकरिता, दुसरा भाग आप्तस्वकीयांकरिता व तिसरा भाग हा गोरगरिब, रंजले-गांजल्या, मागासलेल्या पद-दलितांकरिता, गरिब बहुजनांकरिता वितरित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे या कुरबानीमागे ईशपरायणता, त्यागभावना, बलीदान करण्याचे संस्कार घडवणे व इतर उद्देश तर आहेतच, शिवाय गोरगरीब व पद-दलितांविषयीची सामाजिक बांधिलकी रूजवणेदेखील यातून अपेक्षित असल्याचे स्पष्ट होते. वर्षभर अनेक गरीबांच्या ताटात बक-याचं मटन पाहायलादेखील मिळत नाही. दारिद्र्याच्या विळख्यात अडकलेल्या अशा एखाद्या बहुजनाची रिकामी पोटाची खळगी भरण्याकरिता एखाद्या इमानवंताने ़कुरबानीच्या मांसाचं एखादं पाकीट जेंव्हा भेट देतो, तेंव्हा कृतज्ञतेच्या भावनांनी भारावून झालेल्या त्या गरीबाच्या मनात त्याच्या इमानवंताप्रती प्रेम भावना उंचबळून येतात. हा अनुभव आम्ही स्वत: घेतलेला आहे. आम्ही आमच्या गावातील मुस्लिम तसेच अमुस्लिम देशबांधवांना, गोरगरीब बहुजनांनादेखील बकरी ईदच्या दिवशी मटन वितरीत करतो आणि आपल्या ईदचा आनंद द्विगुणित करतो.
अशाप्रकारे एखाद्या माणसाच्या नावाने जनावराचा बळी देऊन त्याच्या मांसाचे नैवेद्य त्याच्या ईश्वराला दाखवण्यापेक्षा ईश्वराच्या (अल्लाहच्या) नावाने जनावराची ़कुरबानी करून त्याचे मांस गोरगरिबांची पोटाची खळगी भरणे केंव्हाही योग्यच असते. बळी हा माणसाच्या नावाने दिला जातो, तर कुरबानी ही अल्लाहच्या नावाने दिली जाते. बळी दिलेल्या जनावराचा बराच भाग हा नैवेद्य म्हणून बळी देणाऱ्याच्या मुर्तिसमोर ठेवला जातो, ज्याच्यावर तेथील पुजारीच जास्त करून हक्क सांगतात. तर कुरबानी ही कोणत्याही मशिदीत कोणत्याही मौलवीसमोर नैवेद्य म्हणून ठेवली जात नाही. बळी हा कोणता तरी नवस असतो, तर कुरबानी ही प्रेषित इब्राहिम यांची त्यागमय अशी परंपरा आहे. बळीमुळे नवस-बिवस अशा प्रथांचा पगडा दृढ होऊन समाजात अंधश्रद्धा वृद्धीस लागू शकते, तर कुरबानीमुळे अंधश्रद्धेच्या विरूद्ध चळवळ उभी करणाऱ्या प्रेषित इब्राहिम यांचा आदर्श डोळ्यांसमोर उभा राहतो. बळीमुळे गलेलठ्ठ पुरोहितवाद्यांचंच जास्त करून पोट भरतं, तर कुरबानीच्या मटनाच्या एक तृतियांश भागापासून गोरगरीब लाभ घेतात.
म्हणूनच अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ चालविणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर असोत किवा शाम माधव असोत, यांनी बळी देण्याच्या प्रथेला अनेकदा विरोध केला, पण कुरबानीला या लोकांनी कधी विरोध केल्याचं ऐकिवात नाही.
वास्तविक पाहता इस्लाम या शब्दाचा अर्थच शांती आहे. जगात बहुसंख्य मुसलमान हे शांतीप्रिय आहेत. इस्लाममध्ये पशुंना मारण्याची परवानगी फक्त दोनच कारणांसाठी देण्यात आली आहे. एक म्हणजे संरक्षणाकरिात आणि दुसरे म्हणजे पोट भरण्याकरिता, बस्स! विरंगुळा म्हणून शिकार करणे किवा खुंट्याला बांधून त्यावर नेम धरणे या गोष्टी इस्लाममध्ये निषिद्ध आहेत.
शंभर टक्के शाकाहार शक्य नाही. दही, मशरूम यातदेखील बॅक्टेरिया व इतर सुक्ष्म जीव असतातच. शंभर टक्के अहिंसादेखील शक्य नाही. कारण वनस्पतीमध्येही जीव असतो, मग ते एकेंद्रीय असोत की बहुइंद्रिय असोत, जीव तो जीव असतो. साधी भाजी-पोळी जरी खातो म्हटलं, तर तेदेखील शेतात उगवावं लागतं. त्यासाठी त्यावर जहाल विषारी किटनाशकांचा म्हणजेच एकप्रकारे रासायनिक शस्त्रांचा वापर करून लाखो, कोट्यवधी किटकांची सार्वजनिक कत्तल करावी लागते. तेंव्हा कुठं आपल्या घरात ज्वारी, गव्हाचं पीठ येते आणि त्याची पोळी करून आपण ती खातो. आता मला सांगा, एका बैलाची कुरबानी करून अनेक उपाशी गोरगरिबांना घास भरवणे हिंसा आहे की, एका ब्राह्मणवाद्याला जेऊ घालण्याकरिता शेतात हजारो-लाखो किटक मारणे जास्त हिंसा आहे? जास्त हिंसक कोण? तर यापैकी हिंसक कुणीच नाही. माणुसकीच्या भरण-पोषणाकरिता हे अपरिहार्य ठरते. शंभर टक्के अहिंसेचेच तत्त्व राबवतो म्हटलं तर माणसं उपाशी तडफडून मरून जायचे. म्हणून हजारो किटकांना, पशुंना मारण्याकरिता एका उपाशी माणसाला मरू देण्यापेक्षा एका माणसाला वाचवण्याकरिता हजारो पशुंची कुरबानी दिली तरी बेहत्तर! इस्लामची भुमिका ही मानवतेची आणि व्यवहार्य असल्याचं स्पष्ट होते. आपल्या देशात अनेक जण मांसाहारी समाजाताल्या लोकांना स्पर्शदेखील करत नाहीत. अस्पश्यतेची सुरूवात मांसाहाराविरूद्ध असलेल्या मानसिकतेपासूनच झाल्याचे काही लोक सांगतात. जुन्या काळी मांसाहारी बहुजन लोकांना वर्णवादी लोकांनी राक्षस, पिशाच्च, म्लेंच्छ म्हणून हिणवायचे, असे सांगितले जाते. खरं म्हणजे अस्पृश्यतेचं उदात्तीकरण करण्याकरितादेखील मांसाहारविरोधी प्रचार केला जाण्याची शक्यता आहे.
काही लोकांचं असं म्हणणं आहे की, ‘मांसाहार योग्य आहे, पण तो ईश्वराच्या किंवा अल्लाहच्या नावाने नको.’ मुसलमान लोकं कुरबानी ही अल्लाहच्या नावानं करतात, यावर त्यांचा आक्षेप असतो. परंतु त्यांनी हे समजून घ्यायला हवं की, जर कुरबानी करून पोट भरणं हे योग्य असेल तर मुसलमान प्रत्येक योग्य कामाची सुरूवात हे अल्लाहच्या नावानेच करत असतो, त्यात वावगं काय? स्वत:च्या नावालौकिकाकरिता किंवा फुशारकी मारण्याकरिता कोणतंही काम करणं हे इस्लामला मान्य नाही. प्रत्येक योग्य काम अल्लाहला समर्पण करण्याची शिकवण इस्लाम देतो. त्यामुळे व्यक्तीवाद वाढीस लागत नाही तर निर्मळ अशी सामाजिक बांधिलकी उत्पन्न होते, ईशपरायणता वाढीस लागते. प्रेषित मुहम्मद सलम् यांचं एक वचन आहे, ज्याचा मतितार्थ असा की, ‘‘कुरबानीच्या जनावराचं रक्त किंवा मांस अल्लाहला पोहचत नाही, तर (त्याद्वारे उत्पन्न होणारी) तुमची ईशपरायणता त्याच्यापर्यंत पोहोचतो.’’
आणि एखादा सजीव कापतांना, चाऊन खातांना आपल्या उपास्याचं नाव घेणं चुकीचे असेल तर मग पंगतीत बसून ताटातली काकडी दातांनी कडकडून फोडण्यापूर्वी “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल …” म्हटले जाते, त्याचं काय?
अशाप्रकारे स्वच्छता, ईशपरायणता व सामाजिक बांधिलकीची पार्श्वभूमी असलेल्या या पर्यावरण व सांस्कृतिक दोन्हीदृष्ट्या इको फ्रेंडली असलेल्या ईद उल अजहाच्या आपल्या सर्वांना सदिच्छा! ईद मुबारक!– 
नौशाद उस्मान , औरंगाबाद