पुस्तक परिचय
वात्रटिकांच्या माध्यमातून परिवर्तन घडवू पाहणारा संग्रह : धडक बेधडक
------------------------------------------
मराठी साहित्यात अनेक वाङमयीन प्रकारांपैकी वात्रटिका हा प्रकार आता कमी अधिक प्रमाणात दिसून येतोय. अनेकजण आपापल्या पद्धतीने साहित्य निर्मिती करताना समाजाचे चित्रण आपल्या कलाकृतीतून व्यक्त करतो. काही लेखक समाजातील रूढी परंपरा किंवा कुठली गोष्ट पटत नसेल तिथं काहीतरी लिहून समजावं ण्याचे किंवा परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न करतात. त्यात वात्रटिका संग्रहाची आता गरजही आहे.आणि या साहित्यकृती आता कमी अधिक प्रमाणात का होईना बाजारात येत आहेत. अशाच एका वात्रटिकाकार मित्राचा " धडक बेधडक " हा वात्रटिका संग्रह माझ्या हाती पडला.अतिशय सुरेख व वाईट सवयीवर ताशेरे ओढणारा हा संग्रह आहे.शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे सहयोगी प्राध्यापक असलेले प्रा.डॉ.नरसिंग कदम यांचा हा "धडक बेधडक" वात्रटिका संग्रह असून यापूर्वी त्यांचा "जीवनशैली " हा चारोळी संग्रह , "निर्भया", "गोंडर " ही कवितासंग्रह प्रकाशित असून बहुचर्चित " लातूर वसा आणि वारसा" ह्या संपादीत पुस्तकाच्या संपादकीय सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. यानंतर जानेवारी २१ मध्ये हा वात्रटिका संग्रह वाचकाच्या हाती दिला. हळुवारपणे वाईट प्रवृत्तीवर टीका करीत पुढे नेलेला हा संग्रह आहे.यात सर्व विषयाला स्पर्शून वात्रटिकाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचा लेखकाचा प्रयत्न दिसतोय.
संसार संसार
माझी मुले बाळे
म्हणत
आई-वडील
अपार कष्ट करू लागले
अन
मुलाबाळांच्या कारभारात
आई-वडील
अनाथाश्रमाची
हवा खाऊ लागले
या ओळीत वात्रटिकाकारांनी समाजात संस्कारहीन दिशाहीन झालेल्या मुलांबद्दल सांगितले.आईवडील आपली मुले खूप खूप शिकावित ,मोठमोठया पदावर जावीत हा हेतू ठेवून अहोरात्र आपल्या मुलांसाठी सर्वकाही करतात. आई-वडील जेव्हा आपली मुले मोठे होतात हे डोळ्याने पाहुणही त्यांचे कौतुक करायला त्यांच्या जवळ राहत नाहीत. कारण आपल्या मुलांसाठी , मुलांच्या प्रगतीसाठी झटणारे आई-वडील जेंव्हा म्हातारे होतात तेंव्हा त्यांची किंमत ह्या दिशाहीन झालेल्या, संस्कारशून्य मुलांना कळत नाहीत.तेंव्हा आई-वडीलांना वृद्धाश्रमाची हवा खावी लागते.हे लेखकांनी या वात्रटिकेत सांगितले.
वर्गामध्ये
शिक्षक
तळमळीने शिकवत असतात
विध्यार्थी मात्र
मोबाईलवर
गेम
खेळत बसतात
हे युग संगणकाचे,मोबाईलचे असून लहानापासून थोरांपर्यंत आता मोबाईलचा वापर होतोय.पण त्यात अग्रेसर आहेत मुले. या मोबाईलमुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असून मोबाईल हे अत्यावश्यक झाले आहे.त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात शिक्षणावर होत असल्याचे प्रा.डॉ.कदम यांनी वरील वात्रटिकेत केले आहे. त्यामुळे शिक्षकाची व शिक्षणाची अवस्थाही लक्षात येते.त्याचे परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होतोय असे सूचक प्रा.डॉ.कदम यांनी केले.
राजकारण म्हटलं की चर्चेचा विषय झाला.राजकारणावर चर्चा करीत असताना राजकारणाचा स्तर किती खालावलाय हे लक्षात येते. पूर्वीची राजकारणी निःस्वार्थ राजकारण करायचे पण सद्या खुर्चीच्या हव्यासापोटी राजकारणी लोक पक्षांतर करतात.आणि स्वतःचे इमानसुद्धा विकतात.हे प्रा.डॉ.कदम यांनी खालील वात्रटिकेत सांगितलंय,
कधी
यापक्षात
तर कधी
त्यापक्षात
नेते उडया मारू लागले
खुर्चीच्या
हव्यासापोटी
आपले इमान
विकू लागले
आज माणूस उच्च शिक्षण घेऊन मोठं मोठ्या पदावर जावून नोकरी करतात आणि शहराच्या ठिकाणी घर करून गावाला,गावच्या माणसाला विसरत चाललीत. ही बाब प्रा.डॉ. कदम यांनी खालील वात्रटिकेत केले.ही वास्तव परिस्थिती असून ग्रामीण भागातील एखादा मुलगा उच्चशिक्षित झाला अन नोकरीच्या निमित्ताने शहरात गेला तर तो तिथच घर करतोय व आपल्या मूला बाळांना शिक्षण देण्याच्या नादात आपलं गाव ,आपली माणसं विसरतो ही सत्य परिस्थिती त्यांनी सांगितली.
शिक्षणाने
माणूस
उच्चशिक्षित झाला
नोकरीच्या
निमित्ताने
शहरवासी झाला
अन
स्वतःच्या गावालाच
विसरून गेला
एकंदरीत अनेक विषयाला स्पर्शून जाणाऱ्या या संग्रहात वात्रटिका असून त्या प्रबोधन करणाऱ्या आहेत.ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.जयद्रथ जाधव यांची प्रस्ता वणा असलेले" धडक बेधडक" हा वात्रटिका संग्रह लातूरच्या अरुणा प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे.या संग्रहाचे मुखपृष्ठ विरु गुळवे यांनी काढले असून या वात्रटिका संग्रहाचे वाचक स्वागत करतीलच.प्रा.डॉ.नरसिंग कदम यांच्या पुढील लिखाणासाठी शुभेच्छा देऊया !
शंकर बोईनवाड
उदगीर
धडक बेधडक
लेखक:प्रा.डॉ.नरसिंग कदम
अरुणा प्रकाशन, लातूर
मूल्य: १०० रु.

0 Comments