*कोरोना, लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या परिणामांसाठी सज्ज राहा: शरद पवार*
कोरोनामुळे संपूर्ण उद्योग जगत ठप्प असल्याने अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या परिणामांसाठी सर्वांनी सज्ज राहावे असा इशारा शरद पवारांनी दिला आहे. गर्दी टाळण्यासाठी सर्वच नेते आजकाल फेसबूक आणि ट्विटरवरूनच लोकांना संबोधित करत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून सोमवारी नागरिकांशी संवाद साधला. यासोबतच लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा आणि व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शक्य असेल तेवढे घरातच राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, "देशात सर्वच प्रकारचे उद्योग सध्या पूर्णपणे बंद आहेत. अशात अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या कुठल्याही वाइट परिणामांसाठी सर्वांनी सज्ज राहावे. देशाची अर्थव्यवस्था सुद्धा डगमगताना दिसून येत आहे. अशात नागरिकांनी आपल्या अनावश्यक खर्चांवर येत्या काही आठवड्यांसाठी नियंत्रण ठेवावे." यासोबतच, नागरिकांनी मी आवाहन करतो की त्यांनी कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी घरातच राहावे. अन्यथा पोलिसांना लोक घरातच राहतील यासाठी सक्ती करावी लागेल. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा रविवारीच हजारपेक्षा अधिक झाला आहे. त्यातच सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 12 नवीन रुग्ण सापडले आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील परिस्थिती सर्वात वाइट आहे. याच ठिकाणी कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यूचा आकडा देखील सर्वात जास्त असल्याचे दिसून येत आहे.