नवी दिल्ली - देशभरामध्ये सध्या कोरोना विषाणूने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून या संसर्गजन्य रोगाला वेळीच अटकाव करण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी 'लॉक डाऊन' करण्यात आलाय. देशभरामध्ये लागू करण्यात आलेल्या या लॉक डाऊनमुळे सध्या कामगार वर्गाच्या हातातील रोजगार नाहीसा झाला असून हातावर पोट असलेली ही मंडळी सध्या मिळेल त्या साधनाने घराकडे कूच करताना दिसत आहे.
अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आशा स्थलांतर करणाऱ्या कामगारांसाठी मदतीचा हात पुढं केला आहे. गडकरी यांनी परराज्यात रोजंदारी करणाऱ्या मात्र कोरोनामुळे आपल्या गावाकडे निघालेल्या मोलमजुरांना देशभरातील नॅशनल हायवेवरील टोलनाका कर्मचाऱ्यांनी अन्न व पिण्याच्या पाण्याची सोया उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले आहे.