पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीककर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेने परतफेडीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना आता त्यांच्याकडील पीककर्जाची परतफेड येत्या ३० जूनपर्यंत करता येणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

या मुदतवाढीचा फायदा खरीप आणि रब्बी पिकांसाठी कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना होणार असल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी राज्यात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात येत असल्याचे रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.नियोजित कार्यक्रमानुसार या परतफेडीची मुदत दरवर्षी ३१ मार्च असते.

या निर्णयाचा पुणे जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. जिल्हा बँकेने खरीप पिकांसाठी सुमारे १२०० तर, रब्बी पिकांसाठी सुमारे २५० कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे.