कोरोनालारोखण्यासाठी प्रत्येक  गावाने 11 कलमी कार्यक्रमाचा अवलंब करावा.

राज्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन व शेजारच्या कर्नाटक राज्याची सीमा देवणी तालुक्याला आहे, हे विचारात घेऊन, आज मी  गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह आंबेगाव,  इंद्राळ, वडमुरंबी, आनंदवाडी,  टाकळी, बोंबळी बुद्रुक, बोंबळी खुर्द, वलांडी या ठिकाणी जाऊन ग्रामपंचायतींना भेट दिली.  त्यांना पुढील काळासाठी अतिशय दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.  त्या अनुषंगाने प्रत्येक गावाने आपापल्या गावासाठी योग्य ते नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. यात- गावातील कोणीही आपल्या घरातून विनाकारण बाहेर पडू नये. आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस गाव सोडून बाहेर गावी जाण्याची परवानगी देऊ नये.  किराणा व इतर जीवनावश्यक वस्तू गावातील दुकानदार यांच्याकडूनच घ्याव्यात. रास्त भाव दुकानात रांगेत उभे राहून अंतर ठेवून धान्य घ्यावे.  दूध, भाजीपाला व तत्सम पदार्थ गावातील शेतकरी यांच्याकडूनच विकत घ्यावेत.  शेतीला पाणी देणे, भाजीपाला तोडून आणणे, धान्य मळणी, पिकांची खुरपणी करणे जनावरांना पाणी व चारा देणे, दूध काढणे याशिवाय इतर कामे वाढवू नयेत.  गावाच्या बाहेर फक्त दूध विक्री, भाजीपाला विक्री, किराणा दुकानदार, शेतमाल विक्री करणारे शेतकरी हेच बाहेरगावी  जातील. कोरोना सदृश्य  आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात तात्काळ ग्रामपंचायती संपर्क साधावा. इतर आजारांच्या बाबतीमध्ये शहरात जाण्याअगोदर ग्रामपंचायतीला सूचना द्यावी.  गावातील लोकांनी आपल्या सर्व जीवनावश्यक गरजा गावातच भागवाव्यात. किरकोळ गोष्टी घेण्यासाठी देवणी किंवा वलांडी येथे जाऊ नये. संचार बंदीचे उल्लंघन करून आपला जीव धोक्यात घालू नये. दिनांक 14 एप्रिल पर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही गाव सोडू नये.
 
या पद्धतीने सर्व सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांनी आपापल्या गावांमध्ये लाऊड स्पीकर वरून सर्व गावकऱ्यांना अवगत करून या सूचनांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.  विनाकारण देवणी आणि वलांडी बाजारपेठेमध्ये गर्दीचे कारण होऊ नये, याबद्दल समस्त गावकरी मंडळींना जागृत करावे, याची माहिती देण्यात आली.
 तसेच कर्नाटक सीमेवरील अटरगा येथे भेट देऊन तेथील पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा केली व वलांडी येथील चेक पोस्ट बोंबळी- आळवाई दरम्यान लावण्यासाठी च्या सूचना देण्यात आल्या व कर्नाटक चे लोक देवणी तालुक्यात प्रवेश करणार नाहीत, याबाबत सूचना देण्यात आल्या.


    सुरेश घोळवेे  
तहसीलदार देवणी.