बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी
जसे की बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या गुणवत्तेवरच शेतीच यशापयश अवलंबून असते. योग्य दर्जाच्या विविध निविष्ठा अभावी शेतकऱ्यांचा मशागत व निविष्ठावर केलेला खर्च वाया जाण्याचे शक्यता नाकारता येत नाही. तरी शेतकऱ्यांनी बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना खालील प्रकारे काळजी घ्यावी.
अधिक उत्पादनासाठी बियाणे बदल करणे आवश्यक असते,परंतु सुधारित बियाणे दर तीन वर्षांनी व संकरित बियाणे दरवर्षी बदलण्यात यावे.
सरकारमान्य अधिकृत परवानाधारक व गुणवत्ता तसेच दर्जाचे हमी देणाऱ्या कृषी सेवा केंद्र असलेल्या विक्रेत्याकडूनच रासायनिक खते व बियाणे खरेदी करावी.
बियाणे व रासायनिक खते खरेदी केल्यानंतर अधिकृत पावती घ्यावी. सदर पावतीवर लेबल नंबर, लॉट नंबर, खरेदी दिनांक, बियाणे किंमत तसेच विक्रेत्याचे व खरेदीदाराची स्वाक्षरी असावी.
बियाण्याचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.
भेसळची शंका दूर करण्यासाठी बियाण्याचे पाकिटे अथवा पिशवी सीलबंद व मोहरबंद असल्याचे खात्री करावी.
बियाणे उगविण्याच्या खात्रीसाठी पाकिटावरील अथवा पिशवीवरील अंतिम मुदत पाहूनच खरेदी करावी.
शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खताची पक्की पावती घ्यावी तसेच ती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी.
खतात भेसळ असल्याचे शंका दूर करण्यासाठी खतांची पाकिटे व गोणी सीलबंद असल्याचे खात्री करावी.
केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या खतांच्या ग्रेड सारखे अनुकरण व नक्कल केलेल्या खतांची खरेदी करू नये.
खतांच्या बॅगवर त्यामध्ये असणाऱ्या रासायनिक घटक, मूलद्रव्याचे प्रमाण नमूद केलेले असणे बंधनकारक आहे व त्याची खातरजमा करण्यात यावी. (उदा. डीएपी रासायनिक खतांमध्ये नत्राचे प्रमाण 18% व स्फुरदचे प्रमाण 46% असेल तसा मजकूर बॅगवर छापलेला असल्याचे खात्री करावी)
खताच्या बॅगवर लिहिलेला मजकूर नीट वाचून, खात्री करूनच खरेदी करावी.
रासायनिक खते व बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी वरील दक्षता घ्यावी, तसेच दिशाभूल करणाऱ्या रासायनिक खतांची व बियाणाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पंचायत समिती, रेणापूर कृषी विभाग तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय, रेणापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे अहवान तालुका कृषी अधिकारी श्री हरिराम नागरगोजे यांनी केले आहे.
तालुका कृषी अधिकारी,
रेणापूर जि लातूर
0 Comments