राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची शक्यता..!!
शनिवार, 30 मे 2020
पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने जोरदार वारे वाहू लागले आहे. उन्हाचा चटका कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. आजपासून (ता.३०) राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील बुलडाणा येथे उच्चांकी ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात जवळपास आठवडाभर उन्हाचा चटका वाढून अनेक भागात उष्ण लाट आली. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान असल्याने उष्ण लाट होती. उर्वरित राज्यातील लाट ओसरली असली तरी उन्हाचा चटका तापदायक ठरला. आजपासून (ता.३०) विदर्भासह संपूर्ण देशभरातील उष्ण लाट ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राजस्थानातील गंगानगर येथे देशातील उच्चांकी ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, दिवसभर चटका कायम राहून दुपारनंतर वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :* पुणे ३७.२, नगर ४३.१, धुळे ४२.०, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्वर ३०.१, मालेगाव ४३.०, नाशिक ३७.५, निफाड ३७.५, सांगली ३७.८, सातारा ३६.८, सोलापूर ४१.५, डहाणू ३४.९, सांताक्रूझ ३४.५, रत्नागिरी ३४.८, औरंगाबाद ४१.८, परभणी ४४.०, नांदेड ४४.०, अकोला ४४.२, अमरावती ४३.६, बुलडाणा ४६.६, ब्रह्मपुरी ४४.८, चंद्रपूर ४६.०, गोंदिया ४३.८, नागपूर ४६.३, वर्धा ४५.५.
Btv News Maharashtra
0 Comments