*"वारकरी व्हायला जन्मोजन्मीचे पुण्य हवे !"*
- सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर.
गळ्यात तुळशीची माळ कपाळी गोपीचंदन टिळा आणि बुक्का मुखात विठ्ठलाचे अहर्निश नाम पंढरीची वारी व्रत एकादशी ही वारकर्यांची बाह्यअंगाची ओळख आहे, पण भौतिक अवस्थेसह परमार्थिक साधना उपासनेतुन भक्तीआवस्थेत पोहोचणा-याला वारकरी म्हणता येऊ शकते.पंढरीचा असा वारकरी होण्याकरिता जन्मोजन्मीची पुण्य हवे. "होईन भिकारी पंढरीचा वारकरी" ही मन बुद्धी चित्त आणि देहाची अवस्था आणि "असो ऐसा कोठे आठवची नाही ! देहीच विदेही भोगू दशा !!" ही नाम साधनेतील एकरूपता ही वारकर्यांची खरी ओळख आहे. असे विचार नाथ संस्थानचे सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले आहेत. माघ वारीमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटी औसेकर महाराज फडावर माघ शुद्ध दशमी दिनि सेवा रुजू करताना...
"होय होय वारकरी ! पाहे पाहे रे पंढरी !!
काय करावी साधने ! फळ अवघेचि येणे !!
अभिमान नुरे ! कोड अवघेचि पुरे !!
तुका म्हणे डोळा ! विठू बैसला सावळा !!"
हा अभंग घेऊन औशाहून नाथांच्या पालखी समवेत आणि संस्थानचे पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या सोबत विठ्ठल सद्गुरु आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या नामगजरात आणि टाळ मृदंगाच्या निनादात हाती टाळ घेऊन चालत आलेल्या वारकरी समुदायांसी संवाद करताना महाराज बोलत होते.
श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय सर्वांना सांगतात तू आता काहीच करू नको, वारकरी हो, गळात तुळशीची पवित्र अशी माळ घाल, खांद्यावर भगवत पताका घे, हाती टाळ आणि विठ्ठलाचे नाम घेत, नाचत बागडत आनंदात नामाचा गजर करीत पंढरीला ये, तुझी साधना परिपूर्ण होण्यासाठी वारकरी हो, मग खरे पहा काय चमत्कार होतो तो- मग "गेले आशापाश निवारोनी" तुझा विषय कर्म नित्यनेम विठ्ठल भक्तीस्वरूप बनून जाईल. अभिमान, अहंकार, क्रोध, लालसा गळून पडून तु स्वच्छ, निर्मळ, शुद्ध मनाने विठ्ठल चरणाशी एकरूप होऊन जाशील..
loading...
पंढरीत आले की...
"पंढरीचा वास ! चंद्रभागे स्नान !
आणिक दर्शन विठोबाचे !!
हेचि मज घडो जन्मजन्मांतरी !
मागणे श्रीहरी नाही दुजे !!"
ही मनाची दृढ अवस्था बनुन जाते. ईथे आता संतांची पायधुळ ज्या वाळवंटी लागली, तिथे स्वतःला विसरून तू विठ्ठल स्वरूपाशी एकरूप होऊन नाचू गाऊ लागशील आणि सर्व श्रेष्ठ अशा परमानंद सुखाचा तू क्षणात अधिकारी बनशील. ही ताकद वारकरी होण्यामध्ये आहे, म्हणून तू वारकरी हो पंढरीला ये.
"पंढरीशी जारे आल्यानो संसारा" असे म्हणून, संत जीवाला सलगीचा अट्टाहास करतात. असे महाराजांनी संत चरित्रातील कथा प्रसंग निरूपणासह सांगितले.
"तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा ह्रदयी कळवळा वैष्णवांचा" अगदी सहज मिळू शकणारी व स्वस्त असणारी, ही तुळशीची माळ, माणसाचे जीवन सुगंधित करून भाग्य उजळून टाकते.
माणसाला विठ्ठलासी नित्यनेम, नामस्मरण सेवा सत्संगाचे मार्गातून अनुसंधान निर्माण करण्याची किमया घडवते. जीवनात परम सुखाची प्राप्ती शांती सुखाची उपलब्धता होऊन जीवनात मोक्ष लाभण्याची पेठ अशी पंढरीची वारी आहे, म्हणून वारकरी होऊन पंढरीला ये असे महाराज वारंवार म्हणतात आणि "राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा" मंत्र देऊन वारकरी भक्त यांना विठोबाची शपथ घेऊन, याहुन कुठलेही पारमार्थिक साधन परमात्म्याच्या प्राप्तीचे नाही, हे ठासून सांगतात. वारकरी हा धर्म मुखी विठोबाचे नाम हा आग्रह करतात.असे तुकोबारायांच्या अनेक प्रमाणासह अत्यंत सलगीने अंतकरणात या भावना रुजवण्याचा महाराज प्रयत्न करतात. चंद्रभागेच्या वाळवंटात औसेकर महाराजांच्या फडावर दशमीच्या कीर्तनासाठी पायी चालत आलेले हजारो वारकरी श्रध्देतुन हजर होते.
_____________________________
0 Comments