*मध्यम मार्गाचा उद्गाता लोकगुरु : गौतम बुद्ध*
गौतम बुद्ध भारत भूमीत जन्मलेले एक रत्न. ज्याच्या जन्माने पुनीत झालेल्या या भूमीला ‘बुद्धाची धरती’ (The Land Of Lord Buddha) असे म्हटले जाते. अत्यंतिक हिंसा, कर्मकांड, यज्ञयाग, सामाजिक विषमता आणि मोक्षप्राप्तीच्या चिखलात रुतून पडलेल्या समाजाला च्या चिखलातून बाहेर ओढून काढून डोळस व समंजस बनण्यास प्रवृत्त करणारे धर्म चक्र प्रवर्तक म्हणजे गौतम बुद्ध. ज्यांना आशियाचा दीपस्तंभ (The Light Of Asia) म्हणून संबोधले जाते, लॉर्ड बुद्धा (Lord Buddha) असे आदराने पाश्चात्य जगात संबोधले जाते. एक धर्मसंस्थापक, एक विचारवंत, एक बुद्धिवंत म्हणून बुद्ध जगाला परिचित आहेतच शिवाय एक सामाजिक न्यायाची मानवतावादी चळवळ चालवणारे आंदोलक म्हणूनही ते तितकेच लोक सुप्रसिद्ध आहेत.
*माणसा – माणसांमधील भेद नाकारला :*
गौतम बुद्ध यांनी आपल्या धम्मात (धर्मात) विषमतेला थारा दिला नाही. राजा असो वा रंक, नर असो वा नारी, ब्राह्मण असो वा चांडाळ, स्पृश्य असो वा अपृश्य या सर्वांनाच आपल्या धम्मात आणि भिक्खू संघात प्रवेश दिला आणि ‘सर्व मानव समान आहेत’ हा महान संदेश प्रथमच जगात प्रसृत केला. स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता तत्वांचा पुरस्कार करणारे बुद्ध हे पहिले महापुरुष होत.
*कर्मकांड विरहीत मानवी जीवन :*
सुखाच्या शोधात निघालेले लोक सुखप्राप्तीसाठी यज्ञयाग आणि कर्मकांड यांच्या पुरते आहारी गेले होते. कर्मकांड व यज्ञयाग हेच लोकांच्या दैनंदिन जीवनाचे अंग बनले होते ते केल्यानेच सुख प्राप्त होते अशी समजूत करून घेवून बसलेल्या लोकांना कर्मकांड आणि यज्ञयाग केल्याने सुखप्राप्त होत नाही हे ठामपणे सांगणारे गौतम बुद्ध हे एक वेगळे चिकित्सक थोर व्यक्ती ठरतात.
*अलौकिक व पारलौकिक जीवन नाकारले :*
बुधाच्या काळात अनेक धर्मपंथ प्रचलित होते. अनेक विचारधारा होत्या. लोक मिळालेल्या या जन्मापेक्षा मृत्यूपरांत जीवनाकडे डोळे लाऊन बसले होते. पुण्य केले, कर्मकांड, यज्ञयाग, देवाराधाना केली तरच आपल्याला मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळेल अन्यथा आपल्याला नरकात नरकयातना भोगाव्या लागतील. आपली जन्ममरणाच्या दुष्ट चक्रातून सुटका होणार नाही अशी भीती तत्कालीन समाजमनात पक्की बसली होती. ही भीती गौतम बुद्ध यांनी लोकांच्या मनातून अलगदपणे दूर केली. मृत्युनंतर जीवन नसते हे सत्य त्यांनी प्रथमच लोकांना उलगडून सांगितले. मृत्युनंतर जन्म नाही हे ठासून सांगणारे बुद्ध वेगळे विचारवंत ठरले.
*आत्मा आणि पुनर्जन्म या संकल्पना अव्हेरल्या :*
माणसाच्या शरीरात असतो व तो अमर असतो. माणसाचे शरीर मरते पण आत्मा केव्हाच मरत नाही. मृत्यूनंतर आत्मा दुसरा देह धारण करतो किंवा अनंतात भटकत राहतो अशा काहीशा वेडगळ समजुती लोकांच्या मनात घर करून बसलेल्या होत्या व आजही त्या समजुती प्रचलित आहेत. या समजुतीला गौतम बुद्धांनी छेद दिला. माणसाच्या शरीरात आत्मा नसतो त्यामुळे माणसाचा पुनर्जन्म हो नाही हे त्यांनी लोकांना सप्रमाण पटवून सांगितले.
विज्ञानानुसार शरीरामध्ये कोठेही आत्म्याचे स्थान नाही, हा सिद्धान्त तथागत भगवान बुद्धांनी इसवी सनाच्या सहा शतके आधी सांगितला. शरीर चार महाभूतांनी बनलेले आहे. त्यांमध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचा समावेश आहे. मनुष्यप्राणी जेव्हा मरतो तेव्हा ही चारही महाभूते निसर्गातील आपापल्या घटकामध्ये विलीन होतात. त्यामुळे शरीरामध्ये आत्मा नाही हे सिद्ध होते. मानवाच्या शरीरामध्ये आत्मा नावाचा कोणताही भाग आढळलेला नाही, आढळत नाही.
*देव – ईश्वर नाकारून विज्ञानवाद स्वीकारला :*
गौतम बुद्धांनी ईश्वर, देव, देवत्व यांना स्पष्टपणे नाकारले. ईश्वराचे अस्तित्व त्यांनी झुगारून लावले. ईश्वर देव या खुळचट संकल्पनांना त्यांनी थोडेही महत्व दिले नाही. ईश्वर – देव आहे की नाही यावर चर्चा करण्यापेक्षा त्यांनी माणसाच्या आचरणावर अधिक चर्चा केली. मानवाच्या शुद्ध विचारसरणीला व तशाच वागणुकीला त्यांनी सर्वाधिक महत्व दिले. ईश्वरवादी माणसाला विज्ञानवादी बनविले. स्वर्ग – नरकाचे थोतांड गौतम बुद्धांनी धिक्कारले. म्हणून त्यांचा धर्म सुधारणावादी धर्म ठरला.
विश्वामध्ये देव वा ईश्वर नावाची कसलीही गोष्ट, वस्तू किंवा प्राणी अस्तित्वात नाही. बौद्ध धम्मामध्ये देवाला स्थान नाही. गौतम बुद्धांनी देव नाही हा सिद्धान्त अनेक दृष्टीने पटवून दिला आहे. विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे जगात देव नाही. कारण, त्याचा आकार कसा, स्थान याबद्दल याबद्दल कोणालाही माहिती नाही. देव ही मानवी मनाची काल्पनिक संकल्पना आहे असे ते म्हणतात.
*दैववाद नाकारून कर्मवाद स्वीकारला :*
भगवान बुद्धांनी कर्म सिद्धान्त सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार दैव, देव, नशीब, नियती या सर्व संकल्पना चुकीच्या आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे वर्तन कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल, असे विज्ञान सांगते. भगवान बुद्धांच्या कर्म सिद्धांताप्रमाणे आदर्श समाज घडवायचा असेल तर कुशल कर्म करावे म्हणजेच दैववाद, नशीब यांवर अवलंबून राहू नये. स्वकर्म चांगले तर त्याचा परिणाम चांगला ही नीती बौद्ध धम्माचा गाभा आहे. नैतिक आचरणाला अग्रक्रम दिला.
*मोक्षाऐवजी मुक्तीच्या मार्गाचा प्रचार :*
गौतम बुद्धांनी मोक्षप्राप्तीच्या मागे लागलेल्या माणसाला परत फिरविले आणि दु:खमुक्तीच्या मार्गावर आणून सोडले. सुखप्राप्तीसाठी दु:खापासून मुक्ती मिळवावी लागेल व त्यासाठी माणसाच्या जीवनात दु:ख का निर्माण होते, दु:ख निर्माण करणाऱ्या कारणांचा शोध घेऊन त्या दु:खापासून मुक्ती मिळविता येते त्या मार्गाचा बोध गौतम बुद्धांनी लोकांना करून दिला. मी कोणचेही दु:ख दूर करू शकत नाही. तुमचे दु:ख तुम्हाला स्वत:ला स्वप्रयत्नाने दूर करावे लागेल व हाच दु:खमुक्तीचा मार्ग आहे हे त्यांनी लोकांना समजाऊन सांगितले. मी फक्त मार्गदर्शक आहे मी मुक्तिदाता नाही, मी सांगितलेल्या मार्गाने तुम्ही गेलात तर तुम्हाला दु:खापासून मुक्ती निश्चित मिळेल हे सांगणारे बुद्ध दु:खी माणसाला सुखप्राप्तीची सरळ – साधी वाट दाखवणारा वाटाड्या होत.
*अवतारांचे खंडण :*
अनेक धर्मसंस्थापकांनी स्वत:ला ईश्वराचा अवतार म्हटले, कोणी स्वत:ला ईश्वराचा प्रेषित म्हटले, कोणी स्वत:ला मोक्षदाता म्हटले, कोणी स्वत:ला ईश्वराचा अंश म्हटले, कोणी स्वत:ला ईश्वराचा पुत्र जाहीर केले. परंतु गौतम बुद्धांनी म्हटले की, मी मोक्षदाता नाही, मी ईश्वर नाही, मी ईश्वराचा अंशही नाही, मी ईश्वराचा पुत्र नाही, मी ईश्वराचा अवतारही नाही किंवा ईश्वराचा प्रेषितही नाही. मी त्राता नाही. मी माणसाचा पुत्र आहे व मी मानवच आहे. मी दिव्य पुरुष नाही. मी प्रयत्नपूर्वक शोधलेल्या मार्गाने कोणीही जाऊ शकतो व दु:खापासून मुक्ती मिळऊ शकतो या अर्थाने मी केवळ एक मार्गादाता आहे.
*मनाची मलीनता घालविण्यावर भर :*
गौतम बुद्धांनी माणसाच्या मनातील मळ आणि मळभ दूर करण्याचा प्रयत्न केला. मनाला चिकटलेली कुविचारांची जळमटे दूर केली की मन स्वच्छ होते व त्या माणसाचे आचरण शुद्ध व्हायला लागते व तो जीवनात निर्माण होणाऱ्या दु:खानपासून मुक्ती मिळविण्याकडे वाटचाल करायला लागतो. मनाची मलीनता हाच दूर करण्यासाठी गौतम बुद्धांनी पंचशील मार्ग, अष्टांगिक मार्ग आणि पारमितांचे पालन करण्यास सांगितले आहे. या मार्गांचे अनुसरण केल्याशिवाय कोणालाही शुद्ध होता येत नाही, असे त्यांच्या शिकवणुकीचे सार आहे. या धम्म शिकवणुकीच्या मार्गाचे पालन केल्याने जीवनातील दु:ख नाहीसे होऊन सुखाची प्राप्ती होते असा दावा त्यांनी केला आहे.
*प्रमादरहित आचरणावर भर :*
गौतम बुद्धांनी आपल्या शिकवणुकीत माणसाने आपल्या जीवनातील दु:ख घालवायचे असल्यास त्याने पावलो-पावली प्रमादरहित आचरणावर भर दिला पाहिजे यावर भर दिलेला दिसून येतो. कष्टमय मानवी जीवनाला सुख हवे असते व ते मिळविण्यासाठी त्याने नेहमीचा सद्वर्तन आचरावे हा त्यांच्या शिकवणुकीचा गाभा होय. कोठेही त्यांनी पुजाअर्चा, उपासतापास, व्रतवैकल्ये, कर्मकांड, तीर्थयात्रा करायला सांगितली नाही. जपजाप्य सांगितले नाही. आपल्या जीवनातील चुका कमी करणे हे सांगणारे ते लोकगुरु होत.
*मैत्रीचा संदेश :*
माणसाने एकमेकांशी माणसाप्रमाणे वागावे. मैत्रीपूर्ण संबध जोपासावेत. प्राणीमात्रांसोबत सुद्धा बुद्ध मैत्रीभाव जोपासावयास सांगतात. मैत्रीभाव अंगीकारल्यामुळे मनात विरहाचे दु:ख उत्पन्न होत नाही हा त्यांचा संदेश होय. मानव व प्राणीमात्र यांच्यविषयी आपल्या मनात दयाभाव, करुणा बाळगायला सांगणारे बुद्ध विरळे धर्मसंस्थापक.
*माणूस हाच केंद्रबिंदू :*
गौतम बुद्धांच्या शिकवणुकीत देवप्राप्ती, ईश्वरप्राप्ती, मोक्षप्राप्ती हे केंद्रस्थानी नसून त्यांच्या उपदेशात माणूस हाच केंद्रस्थानी दिसून येतो. भगवान बुद्ध आपल्या प्रथम “धम्मचक्र प्रवर्तन” सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्र्यात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दुःख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.”
*निर्वाण किंवा निब्बाण :*
खरे तर अनेकजण निर्वाणप्राप्तीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. तासनतास ध्यानधारणा करणे, काही दिवस, काही महिने, काही वर्षे ध्यानसमाधीच्या मार्गाने निर्वाण प्राप्त करण्यासाठी धडपडत असत्तात. खरे तर निर्वाण ही एक मनाची एक अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेत मनातील सर्व आशा-आकांक्षा, विकार, लोभ, राग, द्वेष, मत्सर, प्रेम (ओढ किंवा आकर्षण) नाहीसे झालेले असते, अशी अवस्था व ती प्राप्त करण्यासाठी ध्यान समाधी मार्गाचा अवलंब करणे गरजेचे नसून दशशील, अष्टांगिक मार्ग व पारमिता यांचे पालन करणे जरुरी आहे. सर्वसामान्य माणसाला निर्वाणाच्या जंजाळात न अडकवता त्याचे रोजचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न बुद्धांनी केलेला दिसतो.
*मध्यम मार्ग :*
गौतम बुद्धांनी मध्यम मार्गाचा पुरस्कार केल्याचे नेहमीच बोलले जाते. प्रयेक दृष्टीने जीवन शांतीमय, शुद्ध व आनंदी बनले पाहिजे यासाठी बुद्धांनी ज्ञानाचा शोध घेतला. चार आर्य सत्यातील शेवटचे सत्य म्हणजेच ‘दु:ख निरोध प्रतिपद’ त्यालाच अष्टांगिक मार्ग किंवा ‘मध्यम मार्ग’ असे म्हटले आहे. अर्थात संतुलित जीवन जगणे. नैतिक आचरण आणि सद्गुणांचा विकास यावर भर देणे हाच मध्यम मार्ग होय. कोणतेही टोकाचे पाउल न उचलता जीवनात मधुर संगीत निर्माण करणे हाच मध्यम मार्गाचा उद्देश होय.
*वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार :*
गौतम बुद्ध यांनी कोणतीही गोष्ट आपल्या बुद्धीला व सद्सदविवेकाला पटली तरच ती मान्य करा असे सांगितले तद्वतच मी सांगितलेला धम्म बुद्धीला पटला व तर्कावर खरा उतरला तरच मना. एखादी गोष्ट मी सांगतो आहे म्हणून खरी मानू नका, सांगणारा फार मोठा माणूस आहे म्हणून खरी मानू नका, एखादी गोष्ट धर्मग्रंथात लिहिलेली आहे म्हणून खारी मानू नका, परंपरेने चालत आली आहे म्हणून खारी मानू नका, सांगणाऱ्याचे रूप सुंदर आहे म्हणून खरी मानू नका, सांगणाऱ्याच्या ठायी तुमची श्रद्धा आहे म्हणून खरी मानु नका. कोणतीही गोष्ट बुद्धीला पटली, तर्काच्या व विज्ञानाच्या कसोटीवर उतरली तरच खरी माना. माझा धम्म व माझी शिकवण सुद्धा पतीची परीक्षा घेऊनच मान्य करा, अथवा करू नका. धर्माच्या शिकवणुकीत इतका पारदर्शकपणा गौतम बुद्धाइतका कोणत्याही धर्मसंस्थापकाने ठेवलेला नाही हे बुद्धाचे वेगळेपण होय.
मानवाच्या सर्वांगीण कल्याणाचा धम्माचा कल्याणकारी मध्यममार्ग प्रतिपादित करणारे गौतम बुद्ध हे खऱ्या अर्थाने एक असाधारण लोकगुरू ठरतात, एक शिक्षक ठरतात.
गौतम वाव्हळ
डी.एड,एम.ए.(इतिहास),
एम.एड., सेट (शिक्षणशास्त्र),नेट (शिक्षणशास्त्र),
नेट (इतिहास)
व्हा. - ८६००५९३४२४
इमेल–gmwavhal@gmail.com
BTV NEWS MAHARASHTRA
0 Comments