घड्याळाचे काटे डावीकडून उजवीकडेच का फिरतात ?
अलीकडे आलेली केवळ आकड्यांनी वेळ दाखवणारी डिजिटल घड्याळं सोडली तर इतर घड्याळांमध्ये तास काटा, मिनिट काटा असे दोन काटे असतातच. काहींमध्ये तर तिसरा सेकंद काटाही असतो. हे सगळे काटे डावीकडून उजवीकडे फिरत असतात. आता ते सतत गोलाकारच फिरत असल्यामुळे या प्रकारच्या प्रदक्षिणेला घटीवत आणि त्याच्या उलट उजवीकडून डावीकडे फिरण्याला अवघटीवत असं म्हटलं जातं.
म्हणा काहीही, पण प्रश्न उरतोच. हे काटे डावीकडून उजवीकडेच का फिरतात ते उलट्या दिशेनं फिरले तर वेळ दाखवू शकणार नाहीत, असं थोडंच आहे. तासांचे व मिनिटांचे आकडे तबकडीवर उलट्या दिशेनं दाखवले म्हणजे काम झालं पण तसं होताना दिसत नाही. मग याचं कारण काय असेल खरं तर ती एक प्रथा आहे. काळ मोजायला सुरुवात केली गेली तेव्हा असणाऱ्या व्यवस्थेची ती एक राहिलेली खूण आहे.
आपण दिवसाची सुरुवात सूर्योदयाबरोबर झाली असं मानतो. त्यानंतर किती काळ उलटून गेला आहे, हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा वाळूचं घड्याळ तयार करण्यात आलं पण त्याच्या मदतीनं संपूर्ण दिवसाचं कालमापन करायचं तर अगडबंब घड्याळ तयार करावं लागलं असतं. तेव्हा मग गावाच्या मध्यभागी एक उंचच उंच खांब उभा करून त्याची सावली मोजण्याची कल्पना लढवली गेली. हे खांब वरवर जाताना निमुळते होत गेलेले असत. इजिप्तमध्ये पहिल्यांदा त्यांचा वापर करण्यात आला. त्यांना ओबेलिस्क असं म्हणत. आपण त्याला ‘कालमनोरा म्हणू शकू.
सूर्योदयाच्या वेळी त्याची सावली लांबलचक पसरलेली असे पण जसजसा सूर्य वर येऊ लागे तसतशी त्या सावलीची लांबी कमी कमी होत माध्यान्हीच्या वेळी तर ती त्या खांबाच्या पायथ्याशीच घुटमळत राही. सूर्य कलू लागला, की परत त्या सावलीची लांबी वाढत वाढत सूर्यास्ताच्या वेळी ती लांबलचक होई. सावलीच्या लांबीवरून मग किती काळ उलटला आहे, हे मोजता येई. या ओबेलिस्कच्या कल्पनेचाच वापर करून मग छोट्या तबकड्यांची, सहज आपल्याबरोबर नेता येतील अशा धातूच्या तबकड्यांची घड्याळं तयार करण्यात आली. त्यात गोलाकार तबकडीच्या मध्ये एक त्रिकोणी पट्टी बसवलेली असे. तिच्या सावलीच्या लांबीवरून वेळ मोजण्यात येई. हिला ‘सूर्यतबकडी असं म्हणत.
सूर्य पूर्वेला उगवत असल्यानं खांबाची सावली पहिल्यांदा पश्चिमेच्या बाजूला पडे. मग दिवसभरात तिचा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे असा होत असे. आता नकाशात आपण पश्चिम दिशा डावीकडे दाखवतो. म्हणजेच त्या सावलीचा प्रवास हा डावीकडून उजवीकडे असा होत असे. दिवसातली वेळ टळण्याचा आणि सावलीचा प्रवास डावीकडून उजवीकडे होण्याचा संबंध डोक्यात इतका पक्का भिनला होता, की मग काट्यांची घड्याळं तयार केली गेली तेव्हा त्या काट्यांचा प्रवासही असाच डावीकडून उजवीकडे होईल, अशी व्यवस्था केली गेली. कालगणनेच्या इतिहासाची ती अशी एक पाठी राहिलेली निशाणीच आहे.
संकलन : प्रविण सरवदे, कराड
डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन
सृष्टी विज्ञानगाथा' विज्ञान आणी दिनविशेष
0 Comments