जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक चे विमोचन

मुंबई : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक चे विमोचन तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक व खारघर येथील दोन पर्यटक संकुलांचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या शुभहस्ते ई-लोकार्पण  सोहळा आज पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीपराव बनकर, माजी खासदार समीर भुजबळ, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, जिल्हाध्कारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदिश चव्हाण शाखा अभियंता महेश बागुल, सागर शिंदे आदी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पर्यटन वाढीसोबत विकासाच्या हव्यासापोटी आपलं पर्यावरण नष्ट न करता आहे त्या स्थितीत त्याचा विकास करण्याची आवश्यकता आहे, तसेच आहे ते जपणं आणि हवंय ते देणं हिच पर्यटन विकासाची खरी संकल्पना असावी, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सन २०१३ साली छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिक मध्ये मेगा पर्यटन संकुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने काढलेली डेटा पुस्तिका हे एक राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टिने महत्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्राला अनेक गडकिल्यांचा वारसा मिळालेला आहे. त्याची जपवणूक करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. नाशिक बोट क्लबचा पूर्ण क्षमतेने विकास व्हावा व पर्यटन आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. वन्य प्राणी, सूक्ष्मजीव हा आपल्या राज्याचा ठेवा असून ते मोठं वैभव आहे, त्याची जपणूक करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करणे हेच आजच्या जागतिक पर्यटन दिनाचे खरे औचित्य ठरेल असेही यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मुंबईतील गिल्बर्ट हिलवर बाराव्या शतकातील मंदिर असून या टेकडीचे वैशिष्ट्ये म्हणजे ती ज्या खडकापासून बनली आहे तशा तशा खडकातल्या जगात केवळ दोनच टेकड्या आहेत. एक मुंबईतील अंधेरीच्या बाजूची आणि दुसरी अमेरिकेतील. दोघांचा दगड एक आहे. पण अमेरिकेने या वास्तूची जपणूक वर्ल्ड हेरिटेज म्हणून केली आहे. आपलेही अशा ठेव्यांची जपणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाने पर्यटन विभागाच्या विकासासाठी  पहिला निधी रायगडासाठी 600 कोटीच्या रुपात मंजूर केला. त्यातील 20 कोटी निधी वितरीतही केला आहे.  गेल्या काही  दिवसात या खात्याने चांगले काम केले आहे. पर्यटनाचा विकास करतांना राहण्याची खाण्याची, पोहोचण्याची उत्तम, सोय असायला हवी. यासाठी पर्यटनाचे एक स्वतंत्र पॅकेज करण्याबाबतची सूचनाही यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मंत्रभूमी, यंत्रभूमी आता पर्यटन भूमी म्हणूनही ओळखली जाईल : छगन भुजबळ
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की,  प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहर व जिल्ह्याला मोठी धार्मिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. आज नाशिकची वाटचाल मंत्र भूमीकडून यंत्र भूमीकडे होत असतांना नाशिकमध्ये बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना नाशिकमध्ये आल्यावर किमान दोन तीन दिवस वास्तव्य करावे या हेतून शहर व जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या सौंदर्यात भर पडणारी व पर्यटन केंद्रांचा अमुलाग्र विकास साधणारी मोठ्या प्रमाणात पर्यटन विकासची कामे करण्यात आली आहेत. त्यात सप्तशृंगी गड येथे भाविकांच्या सुविधेसाठी भारतातील पहिलाच असा फ्युनिक्यूलर ट्रॉलीचा प्रकल्प, नांदगाव तालुक्यातील श्री.क्षेत्र नस्तनपूर परिसराचा विकास, इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद पर्यटन विकास कामे, कानवाई येथील कपिलधारा तीर्थ येथील विकास, श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर, प्रयाग तीर्थ (अंजनेरी तळे), अंजनेरी येथील साहसी पर्यटन ट्रेकिंग संस्था, त्र्यंबकेश्वर हिरवा चौपदरीकरण मार्ग, ब्रम्हगिरी फेरी मार्ग सुधारणा, चांदवड येथील रेणुका माता मंदिर परिसर, सिन्नर येथील पुरातन गोंदेश्वर मंदिर परिसर विकास, मऱ्हळ खु. येथील खंडेराव मंदिर या तीर्थ क्षेत्र, मांगीतुंगी येथील श्री.दिगंबर जैन, सिद्धक्षेत्र येथील पर्यटन स्थळासाठी पोहोच मार्ग सुधारणा, येवला पैठणी पर्यटन केंद्र, येवला शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी, कोटमगाव देवी मंदिर परिसर विकास, सावरगाव स्वामी समर्थ मंदिर परिसर विकास, अनकाई येथे पर्यटन विकास, नाशिक शहरातील कालिकामाता मंदिर परिसराचा विकास यासारख्या कामांचा यात समावेश आहे. त्याचबरोबर नाशिकचे तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरालगत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गंगापूर येथे 'मेगा पर्यटन संकुलाची मुहूर्तमेढ रोवली. या मेगा पर्यटन संकुलात बोटक्लब, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडा केंद्र, कन्व्हेन्शन सेंटर यासह गोवर्धन येथील कलाग्राम प्रकल्पाचा समावेश आहे. पुर्णत्वाकडे असलेल्या या प्रकल्पाचे काम काही दिवसांपासून रखडले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रकल्पांना पुन्हा एकदा चालना देण्यात आली असून आज पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर या मेगा पर्यटन संकुलातील 'ग्रेप पार्क रिसॉर्ट'चे राज्याचे मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होत आहे. याचा मनस्वी आनंद आहे.
'ग्रेप पार्क रिसॉर्ट' च्या पहिल्या टप्प्यामध्ये २८ कक्ष तसेच उपहारगृह, सभागृह जलतरण तलाव, सायकल ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, आयुर्वेदिक स्पा व मसाज केंद्र, वाईन टेस्टिंग केंद्र, द्राक्ष महोत्सवाकरिता पायाभूत सुविधा इ. सोयीसुविधा या ठिकाणी पर्यटकांना उपलब्ध होतील. या ठिकाणी अद्यावत स्वरुपात अंतर्गत सजावट, विद्युतीकरण, पाणीपुरवठा, अग्निशामक यंत्रणा व बाह्यपरिसर सुशोभिकरण करण्यात आले आहे. द्राक्ष पर्यटनासह नाशिक वाईन व वायनरीला पर्यटकांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी सदर 'ग्रेप पार्क रिसॉर्ट' (लेक व्ह्यू नेचर्स रिसॉर्ट) चा उपयोग होणार आहे. नाशिक शहर व जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी हे मेगा पर्यटन संकुल अत्यंत महत्वपूर्ण ठरणार असून या माध्यमातून नाशिकच्या अर्थकारणात मोठी गती मिळणार आहे. या मेगा पर्यटन संकुलात समाविष्ट असलेल्या बोट क्लबच्या डिझाईनचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. तसेच परदेशातून नामवंत मासिकांनी याची दखल घेऊन आपल्या फ्रंट पेजवर त्याची दखल घेतली.

या बोट क्लब सारख्या प्रकल्पात प्रदूषण विरहीत ४० बोटी या कॅनडातून आणल्या गेल्या. मात्र त्यातील काही बोटी या मागच्या काळात स्थलांतरीत झाल्या. त्यातील उरलेल्या बोटी येथील लोकांनी सुरक्षितपणे ठेवल्या आहेत. त्याची तपासणी करून त्या उपयोगात आणल्या जातील.  तसेच नव्याने काही बोटींची आवश्यकता असेल तर त्या आणल्या जातील. त्यासाठी अनुभवी लोकांची मदत घेतली जाईल आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात लवकरच हा बोट क्लबचा प्रकल्प सुरु केला जाईल हा राज्यातला एक नंबरचा बोट क्लब असणार आहे.  त्याचबरोबर राज्य शासनाच्या वतीने साहसी क्रीडा केंद्र, कन्व्हेन्शन सेंटरसह  कलाग्राम तसेच तयार असलेले अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूट देखील लवकरच सुरु करण्यात येईल. यापुढील काळात नाशिक शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले इगतपुरी येथे हिल स्टेशन विकसित करणे, दादासाहेब फाळके चित्रपट नगरीचा विकास, श्री संत निवृत्ती देवस्थान विकास आराखडा, श्री सप्तशृंगी गड विकास आराखडा, भावली धरण येथील पर्यटन विकास, ओझरखेड धरण येथील पर्यटन विकास, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य, येवला तालुक्यातील ममदापूर येथील वन पर्यटन क्षेत्राचा विकास करून पर्यटनाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री भुजबळ पुढे म्हणाले, रायगडाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ही कामे तातडीने हाती घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. भविष्यात जास्तीत जास्त पर्यटक महाराष्ट्रात खेचून आणण्यास प्रयत्न करण्यात येतील.
जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा नावलौकीक निर्माण करणार : आदित्य ठाकरे
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असून जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा नावलौकिक निर्माण करण्यास प्राधान्य आहे. जागतिक पातळीच्या संकल्पना नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून राबविल्यात जात आहे. त्यात बोट क्लब व ग्रेप पार्क रिसॉर्टचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.