कमी केलेल्या दरात खतांची उपलब्धता
पुणे / प्रतिनिधी : केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या अनुदानात वाढ केल्यानंतर खत निर्मिती कंपन्यांनी कमी केलेल्या दरानुसार खते उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे. दुसऱ्या बाजूला अनुदान धोरणात दोन नव्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे.
खतांच्या अन्नद्रव्य आधारित अनुदान (एनबीएस) धोरणात ८:२१:२१ आणि ०९:२४:२४ अशा दोन नव्या श्रेणींना आणले आहे. त्यांना गोणीमागे अनुक्रमे ६५७ रुपये आणि ७५० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या नव्या ग्रेड्स कमी किमतीत शेतकऱ्यांना द्याव्या लागतील. विशेष म्हणजे नव्या धोरणात नत्र, पालाश आणि गंधक अशा चारही मुख्य अन्नद्रव्यांच्या अनुदानात अजिबात कपात करण्यात आलेली नाही.
स्फुरदसाठी गेल्या हंगामात दिले जाणारे प्रतिकिलो १४.८८८ रुपये अनुदान रक्कम २०४ टक्क्यांनी वाढवले आहे. स्फुरदसाठी प्रतिकिलो ४५.३२३ रुपये अनुदान मंजूर करीत केंद्राने चांगले पाऊल टाकले आहे. त्यामुळे कंपन्यांना ग्रेडनिहाय ६७ ते २०४ टक्क्यांपर्यंत जादा अनुदान मिळणार आहे.
कंपन्यांनी आता सुधारित दरपत्रकानुसार खतांची उपलब्धता करून देण्यास सुरूवात केली आहे. इफको पाठोपाठ कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीने देखील राज्यात खतांचे दर कमी केले आहेत. निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांनी सुधारित दरपत्रक लागू न केल्यास कारवाईचा इशारा देणारे पत्र खत कंपन्यांना पाठविल्यामुळे विक्रेत्यांनी देखील धसका घेतला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
▪️किमती कमी होण्यास मदत : कंपन्यांना जादा अनुदान मिळणार असल्याने राज्यात शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या जवळपास विविध प्रकारच्या २० ग्रेड्सच्या खतांच्या किमती घटण्यास मदत झाली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांना खतांची विक्री करताना सुधारित दरानुसार कंपन्यांना विविध ग्रेडप्रमाणे ५० किलोच्या गोणीमागे २४४ रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत कमी रक्कम घ्यावी लागणार आहे.
▪️५० किलोच्या गोणीचे अनुदान असे (रुपयांत)
ग्रेड पूर्वीचे अनुदान नवे अनुदान वाढ
१८:४६:०:० ५१२ १२१२ ७००
०:०:६०:० ३०४ ३०४ ०
०:१६:०:११ १३२ ३७६ २४४
२०:२०:०:१३ ३५२ ६५७ ३०४
१०:२६:२६:० ४१९ ८१५ ३९६
२०:२०:०:० ३३७ ६४१ ३०४
१५:१५:१५ ३२८ ५५७ २२८
२४:२४:०:० ४०४ ७६९ ३६५
२०:५:०:२३ २२० २२० ०
२८:२८:०:० ४७२ ८९८ ४२६
१७:१७:१७ ३७२ ६३१ २५९
१९:१९:१९ ४१६ ७०५ २८९
१६:१६:१६:० ३५० ५९४ २४३
१६:२०:०:१३ ३१५ ६१९ ३०४
१४:३५:१४ ४६३ ९९६ ५३३
२४:२४:०:८ ४०४ ७६९ ३६५
११:५२:०:० ४९० १२२८ ७९१
०:४६:०:० ३४२ १०४२ ७००
१२:३२:१६ ४३२ ९१९ ४८७
१४:२८:१४ ४११ ८३७ ४२६
१५:१५:१५:०९ ३३९ ५६७ २२८
१४:२८:०:० ३४० ७६६ ४२६
८:२१:२१ ० ६५७ ०
९:२४:२४ ० ७५० ०
0 Comments