मॉन्सून ३१ मे रोजी केरळात

पुणे - नैॡत्य मोसमी पाऊस यंदा ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी कळवले आहे. फारतर यामध्ये चार दिवस पुढे-मागे होण्याची शक्यता आहे. यंदा मॉन्सून वेळेवर दाखल होणार असल्यामुळे शेतीसाठी आश्र्वासक गोष्ट आहे.
देशात मॉन्सूनची सुरवात दक्षिण अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर मोसमी वारे हे वायव्य दिशेने बंगालच्या उपसागराकडे प्रवास करतात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा अंदमानात २२ मे च्या आसपास मॉन्सून पोचेल. गेल्या वर्षी १७ मे दरम्यान अंदमान-निकोबार बेटांवर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेला म्हणजे १ जूनला मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही ३१ मे पर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो.
२१ मेपासून दक्षिणेकडील बंगालच्या उपसागर आणि अंदमान व निकोबार बेटांवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील आकडेवारीवरून असे दिसून येते, की केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याची तारीख आणि अंदमान समुद्रावर मॉन्सूनच् आगमनाच्या तारखेचा कोणताही संबंध नसल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.
मॉन्सूनचे केरळमधील आगमन
वर्ष - मॉन्सून दाखल होण्याची तारीख - हवामान खात्याचा अंदाज
२०१६ - ८ जून - ७ जून
२०१७ - ३० मे - ३० मे
२०१८ - २९ मे - २९ मे
२०१९ - ८ जून - ६ जून
२०२० - ५ जून - १ जून