ग्राम बीजोत्पादन मोहीम
पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्रात खरिपामध्ये सोयाबीन हे एक महत्त्वाचे पीक आहे. मागील वर्षी या सोयाबीनच्या पेरणीनंतर अनेक ठिकाणाहून निकृष्ट बियाण्यांची ओरड झाली होती. निकृष्ट बियाण्यांबरोबरच त्याची टंचाई देखील मोठय़ा प्रमाणात जाणवली होती. यंदा असे होऊ नये यासाठी राज्याच्या कृषी विभागाने ग्राम बीजोत्पादन मोहीम हाती घेतली. त्याला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत असून यातून ३० लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध झाले आहे.
सोयाबीनची वेळेवर पेरणी, योग्यप्रकारे मशागत करूनही उगवण न झाल्याने गेल्या वर्षी राज्यभरात शेतकरी संत्रस्त झाले. अनेक अडचणी उद्भवल्या. त्याची दखल शासनाला, न्यायालयाला घ्यावी लागली. त्यावर शेतकऱ्यांनी स्वत:कडीलच बियाणे वापरावे, जादाचे बियाणे इतर शेतकऱ्यांना पेरणीसाठी द्यावे असे अभियान कृषी विभागाने राबवले. ग्राम बीजोत्पादन मोहीम व शेतकऱ्यांनी घरचे राखून ठेवलेले बियाणे याचा चांगला फायदा होत असल्याचे यंदाच्या हंगामात दिसत आहे. ही एक प्रकारची इष्टापत्तीच म्हणावी लागेल.
राज्यात कापसापाठोपाठ सर्वाधिक पीक सोयाबीनचे घेतले जाते. मराठवाडा. विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, खानदेश येथे प्रामुख्याने सोयाबीन उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिला आहे. अन्न व औषध असा दुहेरी वापर सोयाबीनचा केला जातो. सोयाबीन हे सरळ वाढणारे पीक आहे. स्वयमपरागीकरण होणारी फुले पांढरी व जांभळट छटा असलेली असतात. एका झुडपावर चारशे शेंगा लागतात. सोयाबीनची बाजारपेठही चांगली आहे. सोयाबीनचा आहारातील वापर वाढत चालला आहे. पोषक आणि सहज पचन होणारे अन्न म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामध्ये १७ टक्के तेल व ६३ टक्के खाद्य घटक असतात. त्यात कबरेदके दहा ते पंचवीस टक्के आणि पन्नास टक्के प्रथिने असतात. उच्च प्रथिनांच्या क्षमतेमुळे मांसासाठी पर्याय म्हणून सोयाबीन वापरले जाते. कुपोषण, उपासमारी व भ��केचे प्रमाण कमी होण्यासाठी सोयाबीन पिकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सोयाबीनचे असे फायदेही दिसत असतात.
निराशाजनक गतानुभव
राज्यात साधारण ४० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते. (यंदा खरिपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.) त्यासाठी ११ लाख ३५ हजार क्विंटल बियाणांची गरज असते. यापैकी पन्नास टक्के बियाणे हे शेतकरी स्वत: कडील वापरत असतात. उर्वरित ५० पैकी महाबीज व राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्याकडील बियाणे वापरात आणले जाते. गतवर्षी पावसाने चांगली साथ दिली होती. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा करण्यावर भर दिला. करोना संकट, टाळेबंदीचे नियम, रखडलेली कर्जमाफी अशा अडचणी असतानाही सोयाबीन पिकाचा आधार मिळेल या अपेक्षेने शेतकरी या पिकाकडे मोठय़ा अपेक्षेने पाहत होता. मात्र त्याच्या अपेक्षा फोल ठरल्या. सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला. महाबीजच्या बियाणा बाबतीत तक्रारीचा ओघ सातत्याने वाढत गेला. यामुळे काही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. याची दखल घेऊन कृषी मंत्री दादा भुसे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यपीठाचे सोयाबीन तज्ज्ञ व कृषी अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली. महाबीज व खासगी कंपन्यांच्या बियाणांची चौकशी करण्याचा निर्णय झाला. महाबीजचे बियाणे उगवले नाही तेथे पर्यायी बियाणे देण्याचे आदेश दिले गेले. निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. सोयाबीनची उगवण क्षमता ६० टक्के अपेक्षित असताना ती अनेक ठिकाणी २५ टक्के असल्याचे प्रयोगशाळेत निष्पन्न झाले. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेते यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या सर्व घडामोडी पाहता गतवर्षीचा अनुभव सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूर्णता निराशाजनक ठरला.
माझं शेत माझं बियाणे
सोयाबीन बियाणांची उपरोक्त अडचण लक्षात घेऊन राज्याच्या कृषी विभागाने ग्राम बीजोत्पादन मोहीम व शेतकऱ्यांनी घरचे राखून ठेवलेले बियाणे वापरात आणण्याची मोहीम हाती घेतली. सोयाबीनचे बियाणे तीन वेळा वापरता येते. शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वत:कडील बियाणे वापरावे, बियाणे राखून ठेवावे. गरजू शेतकऱ्यांना बियाणांची विक्री करावी; यादृष्टीने प्रोत्साहित करण्यात आले. त्याला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कृषी विभागाने त्यासाठी गावपातळीपर्यंत याचे नियोजन केले आहे. गावातील कृषी सहायक यांनी गावातील शेतक ऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडील उपलब्ध असणाऱ्या सोयाबीनचे वाण, त्याचे प्रमाण याच्या नोंदी संकलित केल्या. त्या जिल्हापातळीवर आणि त्यातून कृषी आयुक्त कार्यालयापर्यंत संकलित केल्या. त्यातून यंदाच्या हंगामात गरजेपेक्षा ही अधिक बियाणे उपलब्ध झाले आहे. यामुळे यंदा सोयाबीन बियाण्यांची टंचाई होण्याची शक्यता नाही. उगवण क्षमताही चांगली होईल असा विश्वास कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
बियाणांची साठवणूक लाभदायक
गतवर्षी सोयाबीनची उगवण झाली नाही. यामुळे जिथे उगवण झाली तिथे बियाण्यांची पुन्हा मागणी झाली. मात्र मागणी इतका पुरवठा होऊ शकला नाही. यामुळे सोयाबीनचे दर वाढले. ३८०० रुपये क्विंटल हमीभाव होता. प्रत्यक्षात बाजारात आठ हजाराहून अधिक दर मिळू लागला. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा सोयाबीनकडे वळताना दिसू लागला. आता बाजारात सोयाबीन पेरणी साठी बियाणाचा दर १०० ते १२० रुपये किलो आहे. ज्या शेतकऱ्या���नी बियाणांचा साठा करून ठेवला आहे; त्यांना या दरामुळे चांगला फायदा होताना दिसत आहे. बियाणांचा साठा करून ठेवण्याचे प्रमाण शेतकऱ्यांमध्ये यापुढे वाढत जाण्याची चिन्हे आहेत. दरवर्षीचा शिरस्ता पाहता शेतकरी उत्पादित होणारे सोयाबीन सरसकट विकत असे. सोयाबीनची काळजीपूर्वक चाळणी करणे, त्याची उगवण क्षमता तपासून पाहणे यात सापडण्यापेक्षा थोडे जादा पैसे देऊन बियाणे खरेदी केले की बाकीच्या त्रासातून मोकळे अशी एक मानसिकता शेतकऱ्यांमध्ये दिसते. परंतु यावेळी बियाणे कमी पडल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील बियांचा साठा करून ठेवावा असे आवाहन केले गेले. त्याला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.
सोयाबीनचे दर वाढल्याने यंदा राज्यातील या खालील खरिपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ते ४३ लाख हजार हेक्टर क्षेत्र होण्याचा अंदाज असून यासाठी ३२ लाख ६२ हजार क्विंटल बियाणे आवश्यक आहे. ग्राम बीजोत्पादन मोहिमेअंतर्गत निवडलेल्या शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ११ हजार असून त्यांच्यासाठीचे क्षेत्र ५ लाख ७७ हजार हेक्टर आहे. ग्राम बीजोत्पादन मोहिमेद्वारे या शेतकऱ्यांनी घरचे राखून ठेवलेले बियाणे २९ लाख ८७ हजार क्विंटल आहे. या शेतक ऱ्यांकडील बियाण्यांचा हा साठा ते त्यांच्या क्षेत्रासाठी वापरत ते उरलेला साठा अन्य शेतकऱ्यांना विकतील. यामुळे एकप्रकारे यंदा खरिपासाठी शेतक ऱ्यांना शेतकरीच बियाणे पुरवतील. यामुळे त्यांना एकतर दर्जेदार बियाणे मिळेल तसेच त्याची टंचाई देखील जाणवणार नाही.
जनजागृतीमुळे यश
कोल्हापूर जिल्ह्यात १२ हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज असते. परंतु यावर्षी सुमारे १३ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यासाठी शेतकऱ्यांकडील बियाणे राखून ठेवण्याच्या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद उपयुक्त ठरला आहे. शेतकऱ्यांचे मेळावे, शेतकऱ्यांच्या भेटी, प्रचारसभा, प्रसिद्धीमाध्यमे, गावोगावची नोटीस फलक यावर सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी काही चित्रफितीही प्रसारित केल्या होत्या. शिवाय बियाणांची निगराणी कशी करायची याची प्रात्यक्षिके गावोगावी घेतली होती. त्याला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातून शेतकऱ्यांना बियाणांना दरही चांगला मिळाल्याने त्यांना फायदा होताना दिसत आहे,’ असे कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले.
0 Comments