विनोदाचे बाबा : श्रध्देय वै.बाबासाहेब महाराज इंगळे
(आज दि.१४ मे २०२१ अक्षय तृतीयेच्या दिवशी परम श्रध्देय वै.बाबासाहेब महाराज इंगळे यांचे देहावसान झाले.त्या नीमित्य त्यांना वाहीलेली ही शब्दपुष्पांजली.)
वारकरी सांप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ही कीर्तनकारांची आहे. संत नामदेव महाराजांनी ही परंपरा सुरू केली असे सांगितले जाते. स्वतः नामदेव महाराज सांगतात कि' नाचू कीर्तनाचे रंगी l ज्ञानदीप लावू जगी ll' खऱ्या अर्थाने कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दिवा जगामध्ये लावण्याचे काम याच कीर्तनकारांनी केले आहे. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचा सार संत साहित्यात पहावयास मिळतो पण हा सार सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम गेली कित्येक शतके अनेक कीर्तनकार अत्यंत प्रामाणिकपणे करताना दिसतात. त्यातीलच एक महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार परम श्रद्धेय वै. बाबासाहेब महाराज इंगळे हे होत.
गेल्या अर्ध्या शतकाहून अधिक काळ ते वारकरी संप्रदायाची निष्ठेने सेवा करताना दिसत होते.महाराष्ट्राला प्रबोधनकारांची खूप मोठी परंपरा लाभली आहे.इंगळे महाराजांनी देखील आपल्या कीर्तनातून अध्यात्माचे सिद्धांत मांडताना चपलकपणे वर्तमानातील विनोद वापरून कीर्तनात एक प्रकारचे चैतन्यदायी वातावरण निर्माण करत असत. त्यातून समाजप्रबोधनाचे खूप मोठे काम मागील कित्येक वर्षांपासून त्यांनी केल्याचे दिसून येते.
सांप्रदायाला समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचे काम जी मोजकी कीर्तनकार मंडळी आज करताना दिसत आहेत. त्यात बाबासाहेब इंगळे महाराजांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. महाराष्ट्रातच नव्हे तर तेलंगणा, कर्नाटक व गुजरातच्या काही भागात महाराजांची कीर्तन होत असत.युवावर्ग,शिक्षित-अशिक्षित वर्ग, प्रोढ,वृध्द, स्त्रीवर्ग या सर्वांनाच महाराजांच्या कीर्तनाने मोहिनी घातली होती. कॅसेटच्या जमान्यात महाराष्ट्रात कुठलाही (धार्मिक असो वा अन्य)कार्यक्रम असो तिथे बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या कीर्तनाचे कॅसेट ध्वनिक्षेपकावरून ऐकावयास मिळत असे.प्रवासात सूध्दा जीप,कार यातही कीर्तन ऐकावयास मिळायचे. आता यू ट्यूबवर त्यांची अनेक कीर्तन उपलब्ध आहेत. मी जवळजवळ ५० पेक्षा अधिक कॅसेटस माझ्याकडे संग्रही ठेवली होती.
महाराजांचे स्वरज्ञान खूपच चांगले होते.आवाज ही पहाडी होता. त्याचबरोबर वारकरी जुन्या चाली ते स्वतः गाऊन म्हणायचे त्यामुळे त्यांच्या कीर्तनात चैतन्यमय वातावरण निर्माण व्हायचे. अभंग सोडविण्याची त्यांची पद्धती अत्यंत उत्तम होती. सूरुवातीला अभंगाचा भावार्थ सांगायचा, त्यासाठी संतांचे अनेक प्रमाण ,ओव्या, घ्यायच्या, मध्येच वारकरी चालीवर प्रमाण उचलायचे, सिद्धांत लक्षात आणुन देण्यासाठी तितकाच चपलख व्यावहारिक विनोदी दृष्टांत सांगायचा व शेवटी अभंगावर प्रश्न (शंका)उपस्थित करून त्याची उत्तरे संतांच्या प्रमाणानेच द्यायची.अशी त्यांची शैली होती.ते दृष्टांत देताना विषय सोडून जाताहेत असे वाटायचे पण लगेच ते मुळ विषयावर यायचे.त्यांची स्मरणशक्ति अफाट होती. ते सुरुवातीच्या काळात सलग तीन तीन तास कीर्तन सेवा करत असत. त्यांच्या किर्तनातील लोकांना वेळ कधी गेला कळायचेच नाही.नंतर नंतर त्यांनी वयाच्या मानाने म्हणा की अधिकचे कार्यक्रम होत असल्यामुळे म्हणा ते एक ते दीड तासच कीर्तन सेवा करत असत. एखदा एखाद्या माणसाचा परिचय झाला की तो न विसरणे हा त्यांचा स्वभावधर्म होता. महाराजांची सर्वात मोठी उपलब्धी ही त्यांच्या विविध कीर्तनाची कॅसेटस आहेत, त्यांचे हरिपाठ व काकडा भजनाची कॅसेट आहेत. यू ट्यूबवर असलेली कीर्तन,त्यांनी आपल्या जन्मगावी उभारलेला परमार्थ आश्रम आहे. त्याचबरोबर त्यांनी दृष्टांत सागर नावाचा ग्रंथ जो भाग एक ते पाच अशा खंडात प्रकाशित केला आहे, जो नवख्या अनेक कीर्तनकार,प्रवचनकार व वक्त्यांना कामी येतो आहे.त्यात त्यांनी पहिल्यांदा संत वचन दिले आहेत व त्याला अनुरूप दृष्टांत दिले आहेत. त्यांची अनेक कीर्तन ऐकण्याचा मला योग आला.सूरुवातीच्या काळात मी शंभर दोनशे वारकरी कीर्तन केली. या कीर्तनांच्या वरती सर्वाधिक छाप इंगळे महाराजांचीच होती. माझे गाव देवकरा ता.अहमदपुर व पंचक्रोशीत महाराजांची दरवर्षी अनेक कीर्तन व्हायची.मी त्यांचे पहीले कीर्तन माझ्या आजोळी हिंगणगाव ता.अहमदपुर येथे ऐकले होते.नंतर आम्ही लहाणपणी १५ की.मी. पायी जाऊन त्यांची कीर्तने ऐकत असू.माझ्या गावी ते मागील ३० वर्षांपासून किर्तन सेवेसाठी यायचे. तसेच एखाद्या व्यक्तीने महाराजांचे कीर्तन एखदा ऐकले की तो महाराजांच्या कीर्तनाच्या प्रेमातच पडायचा व मग आजूबाजूला ५० कि.मी. पर्यंत जरी महाराजांचे कीर्तन आहे असे कळाले तरी तो मिळेल त्या वाहनाने जाऊन तिथे उपस्थित होत असे.याला मी ही अपवाद नव्हतो. अलीकडे माणसे जमा करण्यासाठी पैसे द्यावे लागतात असे ऐकतो पण महाराजांच्या कीर्तनाचे एक वैशिष्ट्य होते की किर्तनाला अमाप जनसागर लोटायचा. महाराजांना बघीतल्या पासून श्रोत्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलायचे ते कीर्तन संपेपर्यंतच नाही तर ते कार्यक्रमस्थळ सोडून जाईपर्यंत तसेच वातावरण त्या गावात या त्या स्थळी प्रफुल्लित स्वरूपात पाहावयास मिळायचे.
बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव हे त्यांचे मूळ गाव. महाराजांनी आपल्या मातृभूमी प्रति खूप प्रेम व्यक्त केले. त्यांनी आपल्या जन्मगावी श्री इंगळे महाराज परमार्थ आश्रमाची स्थापना मागील काही वर्षापासून करत होते. तिथे त्यांनी आपल्या कीर्तनातून मिळालेल्या मानधनातून व लोकांच्या देणगीतून भव्य अशी मंदिरे उभी केली आहेत. विठ्ठल रखूमाई मंदीर,गुरु शिष्य मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, नामजप यज्ञ मंडप, श्री हनुमान मंदिर, महादेव नंदी मंदिर, भक्तनिवास, इंगळे महाराज मंदिर अशी मंदिरे उभी केली आहेत. निसर्गरम्य वातावरण या स्थळी आल्यावर आपणास पंढरपूर आळंदी ला आल्याचा भास व्हावा असे भक्तिमय वातावरण त्यांनी निर्माण केले आहे. आपले गुरु श्री. ह.भ. प. परम पूज्य गुरुवर्य वै.महंत भीमसिंह महाराज व तसेच आपले पिता तीर्थस्वरूप बाबुराव कोंडीबा इंगळे व मातोश्री सौ. सावित्रीबाई बाबुराव इंगळे यांचे ते सतत स्मरण करत असायचे.
ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील वाडी तांड्यां पासून ते महानगरापर्यंत कीर्तन सेवा देत आलेत. निष्ठावंत वारकऱ्याचे सर्व नियम ते पाळत असत. आषाढी-कार्तिकी वाऱ्यांपासून ते सर्व व्रत उपवासही ते नित्य नेमाने करीत असत. खरेतर तर वारकरी भूषण होते.जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांनी आपले मन व काया देवाच्याच कामी लावले. असी महान विभूती आज अक्षय तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर आपणास सोडून वैकुंठवासी झाली. त्यांनी त्यांचा शेवटचा दिस गोड केला पण तुम्ही आम्ही मात्र पोरके झालो.महाराष्ट्रात त्यांच्या जाण्याने संप्रदायाची मोठी हानी झाली. ती कशानेच भरून येऊ शकत नाही. ही हानी भरून काढण्यासाठी त्यांनाच
आम्ही वैकुंठवासी l
आलो याचि कारणास l
बोलिले जे ऋषी l
साच भावे वर्ताया ll
या न्यायाने पुन्हा यावे लागेल. अन्यथा ही पोकळी तशीच राहील. असे असले तरी त्यांचे कॅसेटच्या माध्यमातून, यू ट्यूबच्या माध्यमातून, त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून,परमार्थ आश्रमाच्या माध्यमातून किंवा वेळोवेळी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून दिलेले विचार आहेत ते विचार आपण आचरणात आणून त्यांना सतत स्मरणात ठेवण्याचं काम करू शकतो.ते काम माझ्यासह आपण सर्वांनी करावे अशा प्रकारची अपेक्षा आणि आश्वासन महाराजांना देऊन.पुनश्च एकदा त्यांच्या प्रती शब्दपुष्पांजली अर्पण करून.शब्दप्रपंच थांबवतो.
प्रा. डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर
ता.मुखेड जि.नांदेड
९४२३४३७२१५
0 Comments