भगवान बुद्धाचे शिक्षणशास्त्र

सर्वसाधारणपणे सजीवाला पाच ज्ञानेंद्रिये असतात. त्या पाचही ज्ञानेंद्रियांच्या साह्याने मिळणारी माहिती व अनुभव म्हणजे ज्ञानप्राप्ती. ज्ञान संपादन करणे म्हणजे डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे, हातांनी स्पर्श करणे, जिभेने चव घेणे आणि नाकाने वास घेणे. या पाच ज्ञानेंद्रियांच्या साह्याने मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची माहिती म्हणजे ज्ञान. परंतु ही प्राप्त होणारी सर्वच माहिती लक्षात रहात नाही. त्यातील जे आपल्या कामाचं असते; ते आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो; व बाकीचं विसरून जातो. त्यामुळे विविध मार्गाने मिळालेल्या माहितीपैकी विसरून गेल्यावर जी स्मरणात राहते ती माहिती म्हणजे ज्ञान; अशीही त्यात सुधारणा करता येईल. परंतु हे ज्ञान म्हणजे अध्ययन किंवा शिकणं नव्हे. कारण पाठांतर करूनही काही माहिती लक्षात ठेवली जाते. ती सर्वच आपल्या कामाची असते असे नाही. अशी पोपटपंची करून लक्षात ठेवलेल्या माहितीच्या आधारे मिळालेल्या प्राप्तांकास गुणवत्ता म्हणणे म्हणजे केवळ फसवणूक होय. म्हणूनच आपल्या देशात असे गुणवत्ता प्राप्त करणारे प्रशासकीय अधिकारी उत्कृष्ट भ्रष्टाचारी असतात. त्यांच्यात नीतिमत्ता व चारित्र्य असल्याचे दिसत नाही. कारण इथल्या शिक्षण पद्धतीत ते शिकण्याची सोय नाही. म्हणूनच भ. बुद्धाने शिक्षणाची म्हणजे अध्ययनाची त्रिसूत्री सांगितली आहे; ती लक्षात घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे "प्रज्ञा, शील, करुणा" होय. शिक्षणात व अध्ययनात ही त्रिसूत्री अत्यंत आवश्यक आहे. परंतु बुद्धाचे तत्वज्ञान म्हणजे "धार्मिक तत्वज्ञान" असे समजून त्यास शिक्षणापासून दूर ठेवले जाते.*

*माहिती दोन प्रकारची असते. एक सत्य व उपयुक्त आणि दुसरी असत्य व अनुपयुक्त; कधी कधी ती धोकेदायक सुद्धा असते. म्हणून माहिती कोणती व कशी द्यावी याच्या तंत्राला अध्यापन शास्त्र (pedagaugy) म्हणतात. भ. बुद्धाने शिक्षणाच्या तत्वज्ञाना सोबतच अध्ययन शास्त्र व अध्यापन शास्त्र सुद्धा विकसित केले होते. पण त्याकडे कथित शिक्षण तज्ज्ञांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा समावेश शिक्षणात झाला नाही.*

*मनाने जाणणे आणि ज्ञान मनोमय करणे म्हणजे एखाद्या विषयाचे आकलन करून घेणे होय; माहिती मिळविणे इतकेच पुरेसे नाही. आकलन होणे, जाणतेपण येणे, अनुभव होणे व त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होणे; याला प्रज्ञा म्हणतात. हेच खरे अध्ययन होय आणि ज्ञान म्हणजे केवळ माहिती होय. माहिती सोबतच अनुभव घेतले तरच त्याचा उपयोग होतो. अश्या ज्ञानामुळे विचारशक्ती, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती व स्मरणशक्ती विकसित होते. त्यामुळे मनोबल वाढते आणि विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक संपादित केलेल्या ज्ञानाने जीवनाचा अर्थ बऱ्यापैकी उमगलेला असतो आणि कशासाठी जगायचे याचे भान आलेले असते. तेच खरे शिक्षण होय.*

*ज्ञान किंवा माहिती ही आपणास घरात, शाळेत, समाजात आणि निसर्गाच्या सान्निध्यात ही मिळते. ती सतत मिळत असते; म्हणूनच अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे; असे म्हटले जाते. परंतु माणसाचं वय फार थोडे असते. विश्वाचे ज्ञान अनंत आहे. या थोड्याशा आयुष्यात अनंत ज्ञान मिळवणे शक्य नाही. साठ-सत्तर वर्षांच्या आयुष्यात माणूस किती विषयांचा अभ्यास करणार? म्हणून माणसाने आदर्श नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढे सर्वसाधारण ज्ञान प्राप्त करावे आणि कुटुंब चालविण्यासाठी आपल्या आवडीच्या विषयाचे ज्ञान संपादन करून आपला उदरनिर्वाह करावा व सोबतच ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाची सेवा करावी. सर्वसाधारण माणसाकडून एवढीच अपेक्षा असते.*

*ज्या प्रमाणे भ. बुध्दाने "प्रज्ञा, शील, करुणा" ही शिक्षणातील त्रिसूत्री सांगितली त्याच प्रमाणे डॉ. बेंजामिन बलूम ने अध्ययनाचे तीन क्षेत्र सांगितले. बोधात्मक क्षेत्र, क्रियात्मक क्षेत्र व भावात्मक क्षेत्र. परंतु या तिन्ही क्षेत्रातील अध्ययनात भ. बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलेले प्रज्ञा, शील, करुणा हे तीन तत्व अग्रेसर व प्रागतिक (advanced) आहेत. डॉ. बेंजामिन बलूम ने सांगितलेले बोधात्मक क्षेत्र हे फक्त ज्ञान व अाकलनापुरतेच मर्यादित आहे. बुद्धाची प्रज्ञा त्यापुढे जाऊन सद्विवेकाने निर्णय घेणे शिकवते. डॉ. बेंजामिन बलूम ने सांगितलेले दुसरे क्रियात्मक क्षेत्र हे फक्त व्यवहार व कृती कौशल्या पुरतेच मर्यादित आहे. बुद्धाचे शील त्याही पुढे योग्य निर्णय घेऊन; योग्य व चांगली कृती करायला शिकवते. डॉ. बेंजामिन बलूमने सांगितलेले तिसरे भवात्मक क्षेत्र हे फक्त भावनात्मक विचार करायला शिकवते पण बुद्धाची करुणा त्यापुढे जाऊन मानवता, बंधुता, मैत्री शिकवते. म्हणून आधुनिक काळात देखील शिक्षण प्रक्रियेत जर बद्धाच्या या त्रिसूत्री प्रमाणे अध्यापन व अध्ययन झाले असते तर हे गुणवत्ताधारक भ्रष्टाचारी निर्माण झाले नसते व समाजात अनिती, भ्रष्टाचार व दुराचार दिसला नसता. बुद्धाच्या काळापासून तर बृहद्रथ मौऱ्याच्या काळा पर्यंत सुमारे चारशे साडे चारशे वर्ष फक्त शीलवान व चारित्र्यवान पिढ्या घडत होत्या; असे दिसून येते. तेच खरे शिक्षण व तेच खरे अध्ययन होय. त्या नंतर देखील शेवटचे नालंदा विद्यापीठ नष्ट होईपर्यंत म्हणे ई.स. १२०० पर्यंत (१७०० वर्षे) बुद्धाच्या शिक्षण पद्धतीचा प्रभाव या भूमीवर टिकून होता.*

*बुद्धाच्या काळात आजच्या सारख्या प्रयोग शाळा, ग्रंथालये वा पुस्तके उपलब्ध नव्हते. त्यामुळे मौखिक स्वरूपात ज्ञान प्राप्त होत असे. त्या शिवाय ज्ञानप्राप्तीचा आणखी एक  मार्ग म्हणजे चिंतन, मनन व ध्यान धारणा. प्राप्त माहितीच्या आधारे व अनुभवाच्या आधारे चिंतन, मनन करून पुढील ज्ञान विकसित करणे. परंतु या मार्गाचा अवलंब करणे सर्वांसाठी शक्य नव्हते. त्यासाठी उच्च कोटीची अध्ययन क्षमता असणे आवश्यक आहे. ही क्षमता विपस्सना करूनच प्राप्त करता येते. बुद्धाने त्या काळी उपलब्ध असलेले सर्व सांख्य दर्शन, तपश्चर्या, समाधी मार्ग, वैराग्य मार्ग अशा सर्व प्रकारचे खडतर मार्ग स्वीकारून व स्वतः अनुभव घेऊन ही विश्वातील सत्य ज्ञान उमजत नव्हते, दुःखाचे कारण व दुःख मुक्तीचा उपाय सापडत नव्हता; तेव्हा त्यांनी सर्व मार्गांचा त्याग केला व चिंतन मनन करण्यावर भर दिला. त्यासाठी विपस्सना मार्ग शोधून काढला व त्या आधारे  दुःखाचे कारण "अरिय सत्ये" व दुःख मुक्तीचा "अरिय अष्टांगिक मार्ग" शोधून काढला. हाच तो स्वयं अध्ययनाचा प्रागतिक (advanced) मार्ग होय. यालाच आपण संशोधन असेही म्हणतो*

वरील विवेचनावरून अध्ययन म्हणजे काय व शिक्षण प्रक्रिया कशी असते हे लक्षात येईल. तसेच भ. बुद्ध हे एक शिक्षण तत्वज्ञानी व संशोधक देखील होते; हे लक्षात येते. म्हणूनच त्यांचे विचारधन शिक्षण शास्त्रात अभ्यासण्यासाठी D.Ed.,B.Ed., व M.Ed. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे.

शिवानंद सुर्यवंशी