"सापळा" - लेखक अण्णाभाऊ साठे


लेका म्हारांनी पायरी सोडली,त्येस्नी आता गावचा इंगा दाखवू या,नायतर महार जात डोक्यावर बसल, 
अस सांगत दादा देशमुख आळीपाळीने फिरला'.
        त्यानं महारांविरुध्द आग पेटवली आणि एकदम भडका उडाला.उभा गाव पिसाळला. महारांवर इंगा फिरवण्याची भाषा जो तो बोलू लागला.महार वाड्यावरुन गाढवाचा नांगर फिरवून तरच नावाचा दादा देशमुख! अशी दादाने डिरकी टाकली.एकून एक लहान थोर चावडीवर जमले.महाराना घेवून येण्यासाठी बज्या रामोशी दांडालला गेला आणि महार चावडीवर आले की त्यांना झोडपूनच काढायचे असा विचार करित गाव चावडीवर बसला.
            कारण दादादेशमुखाच्या वाड्यात मरणकळा पसरली होती.आज दोन दिवस झाले देशमुखाचा प्रचंड बैल मरून  पडला होता. तो लोखंडा प्रमाणे ताठला होता आणि भोपळ्याप्रमाणे फुगून डोळे वटारून पडला होता.
भुंग्यासारख्या मोठाल्या माशांनी त्या बैलावर झाकण घातलं होतं. तो मेलेला बैल पाहून देशमुखाची बायका पोरं हवालदिल झाली होती.भयभीत झाली होती. दादा रडकुंडीला आला होता.आपला बैल मेला या दुःखाऐवजी त्याचा मृतदेह दोन दिवसांपासून वाड्यातुन हालत नाही,याचेच त्याला भयंकर दुःख झालं होतं,आणि त्याच्या दुःखाला गरिब महार आणि त्यांची भाऊकीच जबाबदार आहे म्हणून तो चिडला  होता.
       कारण महारांनी मेलेली ढोरं ओढणं एकाएकी बंद केलं होतं.म्हणून दादा देशमुख महारांच्या नावानं खडे फोडत होता.त्यानं शेवटी दत्ता पाटलाला भडकाऊन दिला होता. महारांना समोपचारानं बोलून भागणार नाही,एकदम जोडाच काढला पाहिजे, असं तो सर्वांना सांगत होता. दत्ता पाटील हा पोलिस पाटील,न्यायनिवाडा करून महारांना शासन करण्यासाठी  टपला होता. तो डोळे झाकून बसला होता.आत्ता महार लोकं आले की आपण कस बोलायचं याचा तो विचार करित होता.शब्द जुळवित होता. गुणपाल शेट्ये  गाल फुगवून महारांची वाट पाहत होता.तो जमलेल्या सर्व बड्या धेडांना महारांच्या अन्यायाची कथा आणि तिचे भावी परिणाम सांगत होता. महार जर नमले नाहीत तर उभ्या गावचा महारवाडा होईल, असं तो सर्वाना पुन्हा पुन्हा सांगत होता.
          आणि सर्वांच्या डोळ्यापुढे देशमुखाचा तो मेलेला बैल तरळत होता.आणि त्यामुळे सारा गाव दबला होता. या बैलाने सर्वांची मती गुंग करून सोडली होती.आणि खरच तिथं जमलेला प्रत्येक माणूस मनात म्हणत होता-जर आपली ढोरं दावणीत मरून पडली तर काय होणार?.नुकसान होईल ही गोष्ट ते आपोआप विसरून जात. ती जर महारांनी ओढली नाहीत तर स्वतःलाच ओढावी लागतील याचीच त्यांना भीती पडली होती.आणि म्हणूनच सारी डोकी गरम झाली होती.एकेरीवर आली होती,जनावर मरून पडलं परंतु त्याच्या मृत देहाशेजारी बसून अन्न कस खावं याचं एका विचारानं सर्वाचे चेहरे कळवंडले होते. आणि रागावले होते. 
          गुंडा चाळका  मध्येच उठून म्हणाला,
      मंडळी , म्हातारी मेल्याच दुःख न्हाय परं काळ सोकावतोय , ह्येचा आज इचार झाला पाहिजेत, म्हारांस्नी ठोकून—
           इतक्यात पाटील डोळे उघडून म्हणाला, म्हणजे असं ढोरं मरू द्या,परं म्हारं डोक्यावर बसू देऊ नका,असचं नव्ह' ?
             हो, हो,  असचं, चाळकानं मोकाट मान डोलावली आणि म्हणाला.ह्या उभ्या गावात दत्ता पाटीलावानी शेना माणूस कवाच कोणी झाला नव्हता.माझ बोलणं त्यांनी चटकन हेरलं.आत्ता महारांस्नी तेवढा इंगा दाखवू या,म्हणजी झालं, इंगा या शब्दावर त्यानं जोर दिला.
                            दाखवलाच पाहीजे, देशमुख नाक फुगवून आणि आवाज उंचावून म्हणाला.जातीनं पायरी सोडली. 
कुत्र,मांजरं जनावरं नव्ह
 आणि मांगं,म्हारं माणसं नव्हं,ही वडीलांची म्हनं हाय.परं ह्या भडविच्यांनी माझ्या दावनित बैल कुजाया लावलाय.पोरंबाळ नुसती हंबकुटीला आल्याती. शेंदाडावानी बैल फुटण्याची येळ आलिया नि म्हाराचा डोळाच उघड ना. 
           वाईच कळ काढा, दत्ता पाटील म्हणाला, म्या सारी म्हारं हुंबरावानी गोळ्या घालून पाडली असती, परं काय करू, माझा बैल मरनां गां.
             एवढ्यात म्हारांना बोलवायला गेलेला बज्या रामोशी एकटाच रिकामा आलेला पाहून देशमुखाचे पित्त खवळले.तो रामोशावर बिथरून म्हणाला.
    'ए बेरडा, काय रं म्हणती म्हारं?.'
        येत्याती नव्हं का? रामोशी उत्तरला आणि सुतारानं पडल्या आवाजात विचारल.
       ए नाईक। ती म्हारं भेदरली असतिल न्हाय काय.? 
         ती का भेदरत्याती.? रामोशी म्हणाला.त्येस्नी का दरोडा घातलायं? का कुणाचं घर फोडलं.?
           शंकर सुतार पुटपुटला.त्याचा कण्हत निघालेला सुर ऐकुन तरकटला.
           काय खरं हाय रं शंकऱ्या ? मग ही मेलेली ढोरं का आपल्या बानं ओढायची.
न्हाव्याच्या चढत्या आवाजाने पाटलाची मान ताठ झाली.तो सर्वांना धीर देत म्हणाला.
     मंडळी गप्प बसा,वाचू नका. 
            एवड्यात सारी म्हारं जमून आली.त्यांना पाहून गावकरी आपसात कुजबुजले,खाकरुन सरळ झाले.कोणी मारामारीची तयारी केली.त्यांनी हारिबा म्हाराला पाहीला आणि सर्वांनी पापण्या पडल्या.सर्व महार समोरच बसले,आणि गावकरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.पाटिल,शेट्ये,चाळका,
देशमुख  ह्यानी माना ताठ केल्या. आजूबाजूला कुजबुज वाढली,ति हाताने शांत करत पाटील महारांना म्हणाला,
            हं बोला गां म्हारांनो,ह्ये भूत का बरं उठवलय? आत्ता आम्ही गावांनी ढोरगुरं पाळावी का नगं बोला.?
        हे एकून  हारिबा महार शांतपणे म्हणाला.
              पाळावी की,ज्यात गुरं पाळया बळ असेल त्यांस्नी खंडीनं पाळावी,आम्ही कुठ नगं
 म्हणतुया.?
        तु नगं म्हणत न्हाईस.पाटील म्हणाला,आत्ता रितीनं बोला,तुम्ही ढोरं पाळा म्हणताया,आणि मेलेली ढोरं ओढत नाही,ह्ये च नाव काय.?
        ह्ये च नाव सांगु.? *हारिबा म्हणाला.ढोरं तुमची, दुध तुम्ही खायचं, बैल तुमची* *जिवंतपनी वैरनकाडी तुम्ही* *घालायची,त्या ढोरानं तुमची आऊतकाटी वढायची.आणि* *जिती ढोरं मेली की आम्हाला फुकट रोजगार*.?
         म्हंजी तुमची ढोरं आम्ही वढावी,बाळू महार मध्येच म्हणाला.आणि पाटील बोलणार तोच देशमुख ताडकन उठून म्हणाला.
           आरं ए शून्याच्या कांद्या आज पातुर त्वा मेलेली ढोरं का वढलांस,बोल.?
वढली की,आम्ही नाय कव्हा म्हणतुया,?हरिबा म्हणाला. पर तवा आम्हास्नी कळत नव्हतं आत्ता कळतया हो. 
          काय कलतया रे शेन्या?शेट्ये मान वाकडी करुन गुरकला, *आरं देवानच तुला मेल्याली ढोरं वढायपाई म्हारं केलंया*.
        *असं का? हरिबा पागोटं* *मागं सारून शेट्यावर बिथरला।कंच्या देवानं आम्हास्नी महार केलं व? मग जावा त्या देवालाच मनावं चल वढ आमची ढोर,जां.*
        आत्ता व? ऐका रं गावकर्यानु, देशमुख किंचाळत म्हणाला.एका,ह्यो महार कसा  तंडाय लागला. बघा, हरया आडवा बोलु नगं.
              मि सरळच बोलतुया,हरिबा म्हणाला,
आणि पाटील गुरकला.
         मग देशमुखाचे काय करावं बोल?. 
      मि काय सांगू? हरिबा महार म्हणाला. देशमुखाने पायीजे तर त्याचं-
       अरं काय करावं।पाटील मध्येच खेकसला,काय कराव? काय लोणचं घालावं? सांग कि.
          पाहीजे तर दावनीत पुरावा,जिता व्हता तोवर वैरण घातली,शान काढलं,आणि आत्ता पुरायला भ्या वाटतंय?. पुरा कि म्हणावं. 
          सर्व मंडळी एकदम बोलू लागली.सर्वत्र कालवा सुरू झाला.हाणामारिला तयार झालेली  माणसं एकत बसली.कुणाचाच धीर झाला नाही.आत्ता शेवटी, आपापली जनावरं कोठ्यात पुरावी ही हरिबा महाराची सुचना ऐकून सारेच गोधळात पडले.परंतु हरिबाचं बोलणं देशमुखांच्या काळजालाच भिडंल,तो उठून एक हात कमरेवर ठेऊन वाकला, नी एका हाताची मूठ उलटी करुन तोडा पुढे धरुन रडक्या सुरात म्हणाला.
          ए हरया म्हार।आता तुझ्या म्होरं काय बोंबलु का? 
          बोंबला, पर एका बाजूनं बोंबला.। हरिबा म्हणाला. 
       म्हंजी मि दोन्ही बाजूनं बोंबलतोय? त्ये कसं,सांग बरं?देशमुख म्हणाला.सारर्या गावानं विचारलं.
           ए हरिबा,नीट बोल।दोन्ही बाजूंनी बोंबलू नका म्हजी काय रं? 
  म्हजी असं,हरिबा चढत्या सुरानं म्हणाला,आम्ही ढोरं ओढली म्हंजी बी बोंबलतोय वढीना म्हणल म्हंजी बी बोंबलताय.
        आरं पर कसं त्ये सांग?चावडी ओरडली आणि हरिबा म्हणाला.
        *तुम्ही आम्हास्नी शिवून का घेत न्हाय*?.
        *तुम्ही घान काम करतारं।पाटील हुंकारला.*
 *म्हणून आम्ही ते सोडलं आता,हरिबा म्हणाला.*
       *तुमच्या वडीलांनी ढोरं वढली  व्हंती.त्येचं काय*.?
       *तुमच्या वडीलांनी पडलीचा दरोडा घातला व्हंता।त्याचं काय*.? *हरिबा म्हणाला*.आणि पाटील चाचरत म्हणाला.
     सरळ बोल.
न्हाय बोलत.........आपापली ढोर   वढा.आम्हास्नी सांगु नका.असं म्हणून हरिबा उठला आणि आपल्या वाटेला लागला. सारी म्हारं त्याच्या मागून चालायला लागली.गाव एकदम गप्प झाला, पाहात राहीला. 
           *आत्ता महारांच्या अंगातला पीळ असातसा निघणार नाय। काहीतरी जालिम उपाय करूनच महारांना नामवलं* *पाहीजे।त्यांचा दारकोंड झाला पाहिजे.नाकेबंदी झाली पाहिजे,महाराचं माणुस रानात* *हिंडू देवू नका.जनावर*
*फिरकू देवू नका भडाडा जनावरं कोंडवाड्यात घाला. कुणाला* *गावात दुकानावर उभं करू नका;याचाच* *विचार झाला आणि असंच* *करायचा असा निर्धार करून महाराभोवती सापळा  लावण्याचा* *विचार करित बैठक मोडली*.
      ति सारी माणसं तसीच दादा देशमुखाच्या वाड्याकडे गेली,दोन दिवसाचा ताठून पडलेला बैल त्यांनी पाहीला आणि मगं पुन्हा सर्वानी विचार केला.मग वीस गड्यांनी तो बैल वाड्याबाहेर काढला ,आणि रिकाम्या बैलगाडीत ते धुड कसतरी चढवलं ,आणि बैल जुपूनं ती गाडी रानात नेली. पुढं दहा गड्यांनी डबा काढला होता,त्यात त्यांनी तो बैल शेवटी लोटून दिला. 
सर्वानी घामगळे पर्यत माती ओढून तो खड्डा अखेर बुजवला आणि सुटकेचा निःश्वास टाकला.
*चार महारांचं काम, त्याला सारा गाव लागला नि दमला.तेव्हा कुठ तो बैल मातीआड झाला*.
            गावातील ती सभा सोडून हरि महार महारवाड्यात आला आणि गंभीर आवाजात म्हणाला.केश्या,बाळ्या ती मेलेली ढोरं लढण्याची कावडनी आणि अरुसं आना,लाकडं फोडायची कुर्‍हाड घ्या. 
   बाळूनं कुर्‍हाड आणली आणि विचारलं,आणली कुर्‍हाड,काय करू म्हणता?. 
     फोडा ती कावडणी,बारिक करा, 
      हरिबानं हुकमी स्वरात सांगताच बाळ्यानं कावडणीचा बुकणा केला आणि त्याचा ढिग करुन हरिबानं त्याला आग लावून दिली.
     त्या दिवसापासून गावचं रूपच बदललं,गावची ती बडी माणसं जागोजाग महारांवर टपूनं बसली. महार कधी पेचात सापडतो याची वाट पाहु लागली.
उभ्या महारवाड्यावरच त्यांनी करडी नजर ठेवली.आणि महारांनी ती परिस्थिती जाणली होती. ते ही प्रत्येक पाऊल जपून टाकतं होती.कुणाला कसलाही वाव देत नव्हते.दुसर्याच्या वावरात पाय देत नव्हते.सर्व काही सावधगिरीने करित होते.
             परंतु त्यांच्या मागे गावचा सापळाच लागला होता. एखांदा लांडगा झुडपात दबा धरून बसावा आणि खांडा वगेळे होताच त्यांनी मेंढरू पळवावं तशी स्थिती झाली होती. *बांधाच्या आत महारांनी पाऊल टाकताच दांडगीसराची काठी फिरू लागली*. *शेळ्या-मेंढ्या,गुर-ढोरं,जे जे त्यांच्या हद्दीत शिरलं त्याला कोंडवाडा दाखवला जाऊ लागला*. *कोंड भरुन महार  एरमेठी झाले.गावची आणि महारांची तेढ विकोपाला गेली*.
            घरापासून शेतापर्यत महार सरकारी सडकेवरच वावरतांना दिसू लागले.त्यांची गुरं उपाशी मरू लागली. सर्व महारांनी तक्त्यात बैठक घेतली.हरबाला बोलावलं। दारकोंड कसा उठवायचा याचा ते विचार करू लागले. सर्व महार दुःखी होऊन हरिबा काय सांगतो ते ऐकू लागले.
           केसू महारानं प्रथम सुरूवात केली.
            हरिआबा,आता जगायचं कसं?गावानं भलतीच करडी कमानं धरली,आता जगनं कठिन झालं.
      त्यावर हरिबा शांतपणे म्हणाला, जर आपून कावडणी घेवून गावची मेल्याली ढोरं वढू लागलो तर उद्याच आपला दोरकोंड उठलं, तवा तुमचं मत काय हाय ते सांगा. 
          छा। छा।तसं कसं?तुमचं मत ते आमचं मत,तुम्हीच सांगा, बाळू म्हणाला. 
                *मग एका तर, हरिबा म्हणाला, एक मोठ वडाच झाड होत,त्या झाडाला मुळासगट उपटून टाकण्याचा* *ब्येत वार्‍यानी केला. आणि मोठं कावदूर घेवून वारा आला.तवा* *झाडानी हेरललं आत्ता आपून जगत न्हाय. आणि चटकन त्या झाडानी आपल्या फांद्या फेकून दिल्या आणि नुसता खुंटच उभा राहिला.वारा जोरात* *आला. पण तो खुंट काई हलला न्हाय.* *आपून बी त्या झाडावानी करू या, खुंटावानी उभं राहू या.*
        काय करु या बोला? सर्वानी विचारलं ,आणि हरिबा म्हणाला,
 आठ दिवसांत समदी मेंढर,शेरडं,ढोरं इकून मोकळ व्हा त्या झाडावानी,झडझडीत खुंट. 
ठरलं, बुधवारी बाजारात इकतो आम्ही,सर्वानी कबुल केलं,आणि हरिबा पुन्हा म्हणाला,
     मि उद्या तालुक्याला जाऊन सरकारात दाद मागतो. 
पहाटेला हरिबा तालुक्याला निघाला होता.तो घराबाहेर पडला तेव्हा अंधारच होता. अजून तोंडओळख झाली नव्हती.नुकताच पूर्वेला उजाळा येत होता.सृष्टी आणि आकाश यांच्या मध्ये प्रकाशमय पट्टा निर्माण झाला होता.ढगांच्या प्रचंड आकृत्या भ्यान दिसत होत्या.त्या एकमेकांवर हळूच जाऊन आदळत होत्या. सडके कडच्या झाडांवर पाखरं किलबिलाट करित होते.हरिबा मनात चरकला होता.आपण एवढ्या अंधारात घर  सोडलं हे बरं झालं नाही,असं त्याला वाटू लागलं. तो मागं पुढं पाहात पाय उचलुन माळावर आला. दुतर्फा पळसाच्या झुडपा मधून चालु लागला.
          पळसाच्या झाडांनी त्या माळावर गर्दी केली होती.जागोजाग पळसाची झाडं उभी होती,
       पारगावचा तो माळ पळसासाठी प्रसिद्ध होता. तो सरकारी माळ होता.पत्रावळ्या- द्रोण यासाठी गुरव त्या माळाचा लिलाव घेत होते.कैक गुरव त्या माळावर सावकार झाले होते.त्या माळावर खून होत असत. कित्येक  चोर दबा धरून बसत आणि वाटसरूना लुटत. कोणीही त्याची  दाद घेत नसे. 
       दर पाच वर्षांनी त्या माळाचा लिलाव होत होता.खुनी माळ, पळसाचा माळ म्हणून लोक त्याला ओळखत होते.गावची गुर तिथं चरत असत. हरिबा त्या माळाला आला आणि एकदम भ्याला. जवळच दोन गडी दिसले. ते काहीतरी बोलत हरिबाच्या पुढं निघाले होते .त्यांना पाहून हरिबानं  पाय गाळले आणि त्याच वेळी त्या दोघांनी हरिबाला पाहील आणि हाक मारली,
     कोण येत त्ये?
  मि हाय हरि- कोण हाय त्ये? 
 आम्ही हाय,ये कि नारू गुरव हाय मी,  नारू गुरवाचा आवाज ऐकून. हरिबाला धीर आला, तो भर्रकन जाऊन त्यांच्यात मिसळून चालु लागला.नारू आणि शंकर हे दोघे तालुक्याला निघाले होते.आजच तालुक्याला पारगावच्या पळसाच्या  माळाचा सरकारी लिलाव होणार होता,त्यासाठी ते दोन्ही गुरव रकमा घेऊन निघाले होते.दोघांचे तिघे होताच त्याना ही बरे वाटलं. दुसर्‍याच्या भीतीमुळं ते गावाचं आणि महारांचं भांडण विसरून ते वाट चालू लागले. परंतु एवढ्या सकाळी हरिबा निघालेला पाहुन त्यांना किंचीत शंका आली,आणि तो  तालुक्याला निघाल्याचे त्यांना जेव्हा समजले तेव्हा ते अधिकच विचारात पडले.
             तालुक्याला पोचल्यानंतर गुरव तालुक्याला गेला आणि पारगावावर खटला करण्यासाठी हरिबा चांगला वकिल शोधत फिरू लागला.आपली बाजू निट मांडणारा,आपल्या पोराबाळांचा दोरकोंड उठवणारा,शहाणा वकिल त्याला हवा होता, तो जागोजाग चौकशी करून मामलेदार कचेरीपुढं येऊन दाखल झाला.
           त्यावेळी त्या पारगावच्या पळसाच्या माळाचा लिलाव नुकताच उभा राहिला होता.गावोगावचे फक्त गुरव आले होते. कमरेच्या रकमा सैल करून सवाल चढवण्याची ते तयारी करित होते.कोण किती चढणार याचा अंदाज घेत होते. आणि सरकारी कारकून जाहिर झालेला आकडा पुन्हाःपुन्हा घोकत होता. एकशे पाच रुपया पर्यंत एक गुरव चढला होता.बाकीचे एकमेकांकडे  तिरप्या नजरेने पाहत धीर करत होते. हरिबा गर्दीत येऊन ऐकत होता. आपणच जर माळाचा लिलाव घेतला तर काय होईल.असा विचार त्यांच्या मनात आला. आणि सरकारी कारकून  दमून म्हणाला.एकशे पाच रूपये एकवार -
        दोनशे दहा रुपये,एकदम आवाज आला. सर्व गुरव एकदम भुर्रकन फिरले. कित्येक डोळे हरिबावर भिरभिरले.हरिबानं दुप्पट आकडा चढवल्यानं सर्वानां आश्चर्य वाटलं. पारगावचे गुरव त्याच्या कडे पाहतच राहिले,शेजारच्या गावाचा एक श्रीमंत गुरव पुढं आला.त्यानं टवकारून आवाज काढला,तिनशे रूपये.
       आणि हरिबा ओरडला,पाचशे रूपये।
          आणि  हरिबाच्या त्या आवाजानं सर्वाची ईष्या आणि धूम एकदम गारठली.
      हरिबाच्या नावाचा लिलाव जाहीर झाला आणि लगेच हरिबा महारानं कमरेचे पाचशे रुपये भरले. 
     तो दिवस महारांसाठी भाग्याचा ठरला, त्यांनी आपली गुर-ढोरं विकण्याचा बेत रद्द केला. 
सारी पोरंबाळ, आपली शेरडं- मेंढरं त्या पळसाच्या माळावर चारू लागली.महारांना पाय ठेवायला भरपूर जागा मिळाली. पळसाला पानं तीन असं उपहासान म्हटलं जात, परंतु त्याच पळसान माहरांचं जीवन सुखी आणि निर्भय केलं;एवढच नव्हे तर परिस्थितीचं
चक्र महारांच्या दिशेने अती वेगानं फिरली.महारांची चढाई सुरु झाली.
     पळसाच्या माळ म्हणजे पारगावाच्या पायाखालची भक्कम जमिन होती,आज पर्यत गावची गुरं ढोरं त्या माळावर जात होती.लिलाव घेणारे गुरव फक्त पळसाच्या पानांपुरत पाहत. 
          जमिनीवरचे करडं गवत त्यांना नको होते। ते गावच्या गुरांना आडकाठी करत नसत।खुशाल चरु देत, गावची गुरं जगवत.परंतु हरिबानं लिलाव घेवून डाव उलटवला, माळावर चरायची सवय झालेली गावची जनावरं कुठचं ठरत नव्हती,दाव्याचं पेंड पडलं की ती सरळ त्या माळावर चरू लागत आणि हरिबा एकून एक जनावरं हाणून कोंडात घालू लागला.माहारांचा कोंड वसुल करणारा दत्ता पाटील गावाचा कोंड वसुल करू लागला.दोन वर्षात गाव काजबारला,जेरिला आला.
 एकदा दिवस वर आला होता. पळसाच्या माळावर महारांची गुरं चरत होती,हरि महार हातात काठी घेऊन पळसाच्या झुडपात बसला होता. एवढ्यात दत्ता पाटीलाची बारा जनावरं मुरकुंडी ने येऊन पळसाच्या माळावर चरू लागली,पाटलाचा गडी जनावरांपासून बराच दूर होता.ती ढोरं पाहुन हरिबाला आनंद झाला.
    त्या दिवसाची आणि त्या गुराची तो कैक दिवसापासून वाट पाहत होता. ती गुर हाकत हरिबा चावडीवर गेला आणि पाटलाला म्हणाला,
     पाटील कोंडाची किल्ली घ्या।
          का कशाला पाहिजे? पाटील बावरून म्हणाला.
तुमची गुरं कोंडात घालाय.........हरिबा म्हणाला आणि पाटील चमकला,त्यानं जोत्यावर येऊन गुरं मोजली आणि त्याचा चेहरा खर्रकन उतरला पेठेतील लोक जमले, कोंड भरुन दमलेले गावकरी आले. गोरगरिबांनी चावडीसमोर गर्दी केली, त्या गर्दीत हरि महार एकटाच उभा होता.
       तोच पाटील म्हणाला,काय करुतुस हो हरिबा?
   तुम्ही केल त्येच करतुया मी हरिबा म्हणाला.
 गाव धून निघाला या वादात,सरकारी खजिना फुगला हे तुला पटतंय का? पाटलानं शांत पणे विचारल,आणि हरिबा शांतपणे म्हणाला, *भांडी विकून महारांनी कोंड भरलाय पाटील*.
   हो, हो खरं हाय त्ये-पर गावा शिवाय महारवाड्याला किंमत, शोभा न्हाय आणि महारवाड्या शिवाय गावाला कळा न्हाय. ही पांढर  सार्‍याचीच हाय,सार्‍यानी एका आईच्या लेकरावानी राहावं,
तस कस हरिबा दुःखी आवाजात म्हणाला, जर तस असत तर गावानी आमच्या भवती हा सापळा लावलाच नसता. आत्ता तो सापळा आम्ही काढून टाकतो,पाटील म्हणाला, हातनं म्होरं आपन सरळ वागू.?पाटील म्हणाला. 
सरळ कसं ?लगेच हरिबा ने विचारलं आणि पाटील म्हणाला.आरं बाबा माणसावानी हे शब्द ऐकून हारिबाने निःश्वास टाकला.तो निःश्वास हरिबानं कितीतरी दिवस दाबुन धरला होता.

क्रांतिकारी जयभिम...
नवीन पिढीसाठी प्रेरणादायी