सात प्रकारच्या गृहणी : बुद्ध आणि सुजाता संवाद
-----------------------------------------------------------
सुजाता हिने एका श्रीमंत कुटुंबात जन्म घेऊन तिने अनाथपिंडिकाच्या मुलाशी लग्न केले होते. ती गर्विष्ठ होती, अभिमानी, भांडकुदळी, इतरांचा आदर करीत नव्हती आणि तिचा पती आणि कुटुंबातील परिवारांचा अनादर करीत असे. 

ती कुणाचेच ऐकत नसे. या वृत्तीचा परिणाम म्हणून दररोज कुटुंबात भांडणे होत असत.

ज्ञानप्राप्तीनंतर खिरदान केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी एके दिवशी, भगवान बुद्ध जेव्हा अनाथपिंडिकाच्या घरी गेले, ते श्रेष्ठींसोबत बातचीत करत होते, तेव्हा त्यांना त्या घरातुन मोठ-मोठ्या आवाजात झगडा-गोंधळाचा आवाज ऐकू आला. 

तथागतांनी या बाबत विचारले असता अनाथपिण्डीकाने सांगितले की, "भगवंत, माझी सुन सुजाताच्या वागण्यामुळे तो आणि सर्व कुटुंब परेशान आहे. 

ती आपली सासू, सासरा किंवा तिचा पती यांचे ऐकत नाही. त्यांचा सन्मानही करीत नाही किंवा त्यांचा आदरही करत नाही.

बुद्धांनी सुजाताला त्यांच्याजवळ बोलावले आणि तिच्याशी करुणामय मधुर शब्दात बोलले, "सुजाता, पुरुषाला सात प्रकारच्या पत्नी असतात. त्यापैकी तू कोणत्या प्रकारात मोडते?

भगवंत मी आपल्या बोलण्याचे तात्पर्य समजु शकले नाही, सात प्रकारच्या पत्नी कोणत्या आहेत?, कृपया स्पष्टकरुन सांगावे," सुजाताने विचारले.

१) सुजाता, जी गृहिणी नेहमी क्रोध करते, जी पतीवर अजिबात प्रेम करीत नाही, आपल्या पतीसोबत सतत बदला घेत असते, जीचा पतीवर अजिबात विश्वास नाही, जी पतीचा आणि कुटूबीयांचा अपमान करते, आणि परपुरूषात खुशी पाहते, ती एक हत्यारिणि समान असते.  त्यामुळे अशा त्रीला  'वधिकसमा' असे म्हटले जाते.

२) जी पत्नी आपल्या पतीची संपत्ती आपल्या स्वत:ची मौज, शौक पुर्ण करण्यासाठी खर्च करते, जी पतीच्या संपत्तीचा सदुपयोत करत नाही, परंतु ती संपत्ती चोरुन आपल्या उपयोगात आणते अशा स्त्रीला ‘चोरसमा’  असे म्हटले जाते. 

३) अशी एक पत्नी आहे जी एखाद्या धन्यासारखी पतीसमोर बढाई आणि मोठेपणा मारत असते. ती आळशी आहे आणि ती फक्त आपल्याबद्दलच विचार करते. ती निर्दयी असुन दयाळू नसते, नेहमी पतीची निंदा करते किंवा कर्कश गप्पा मारत असते. ती ‘आर्यसमा’ किंवा  “प्रमादसमा” असे तिला म्हटले जाते.

४) सुजाता, चांगल्या व प्रशंसनीय स्त्रीया असतात, ज्या आपल्या पतीची आईसमान काळजी घेतात.  मुलासारखी पतीला वागवतात, आपल्या प्राणापेक्षाही ती पतीची रक्षण करते, दयाळू असते, आणि आपल्या पैशाची काळजी घेते. अशा स्त्रीला ‘मातृसमा’ असे म्हटले जाते.

५) एक पत्नी आहे जीचे बहिणीसारखे पतिवर स्नेह आहे. तिचा तिच्या पतीबद्दल आदर आहे, जशी तिच्या भावाची लहान बहीण आहे, तशीच ती विनम्र आणि पतीच्या इच्छेस आज्ञाधारक आहे.  ती  'भगिनीसमा' पत्नी होय.

६) अशी एक पत्नी आहे जी मित्रासारखी आहे. तिच्या पतीकडे पाहून तिला आनंद होतो, ज्याप्रमाणे बराच काळाने मित्र भेटतो व आनं्द होतो त्याप्रमाणे पतीला पाहून ती आनंदित होते. ती उदात्त जन्मलेली, सदाचारी आणि विश्वासू आहे. जी मित्रभाव राखते ती 'सखीसमा' पत्नी असते.

७) अशी एक पत्नी आहे जी पतीचे सारे कष्ट सहन करुन नेहमी पतीची आज्ञापालन करते. जेव्हा तिच्या उणीवा समजून घेतल्या जातात तेव्हा ती समजूतदार पत्नी म्हणून वागते. तिचा पती काही कठोर शब्द वापरत असला तरी ती शांत राहते आणि राग व्यक्त करत नाही. ती आपल्या पतीच्या इच्छेस आज्ञाधारक आहे. ति ‘दासीसमा’ पत्नी असते.
 
मग भगवंतांनी सुजाताला विचारले, "सुजाता, तुला कोणत्या प्रकारची पत्नी होणे आवडते?"

भगवंतांचे हे शब्द ऐकून सुजाताला तिच्या पूर्वीच्या आचरणाची लाज वाटली. ती तथागतांच्या चरणावर झुकली आणि म्हणाली, 

"भगवंत मला क्षमा करावी, यापैकी मी कोणत्या प्रकारात मोडते हे सांगण्यास माझी वाणी असमर्थ आहे.  परंतु आपणांस विश्वास देते कि, आजपासून मी माझ्या पतीचा आणि मोठ्यांचा आदर करीन, कोणालाही दुखावणार नाही. आजपासुन मी एक चांगली आणि समजूतदार पत्नी होईन, एक चांगली स्त्री बनुन माझे जिवनयापन करेन."

त्या दिवसापासुन सुजातने खरोखरच आपले वागणे बदलले आणि ती पतीची सहाय्यक झाली. पतीची मदतनीस बनली. आणि त्या पती-पत्नी दोघांनीही एकत्रितपणे निर्वाणाच्या मार्गाने वाटचाल करायला सुरुवात केली.