वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।।
- डॉ.बालाजी जाधव
प्रस्तुत ओळ ही तुकोबांच्या एका विख्यात अभंगातील आहे. या अभंगात तुकोबांनी *वेदांचा खरा अर्थ कुणाला माहित आहे आणि कुणाला माहित नाही* या दोन पक्षांबद्दल चर्चा केलेली आहे. ते म्हणतात, वेदांचा खरा अर्थ *'आम्हांसीच'* म्हणजे आम्हालाच ठाऊक आहे. ते असे म्हणत नाहीत की *वेदांचा अर्थ जसा तुम्हाला माहित आहे तसा तो 'आम्हाला सुद्धा' माहित आहे.* कारण तुकोबांना तसे म्हणायचे असले असते तर ते वेदांचा तो अर्थ *'आम्हालाही'* ठावा असे म्हटले असते. म्हणजे जसा तो तुम्हाला ठाऊक आहे तसा तो आम्हालाही ठाऊक आहे असे म्हटले असते. पण प्रस्तुत अभंगात तुकोबांनी स्पष्टपणे *'आम्हालाच'* ठावा असे म्हटले आहे. आम्हाला या शब्दाला लावलेल्या 'च' या प्रत्ययावरून तुकोबांना *वेदांचा खरा अर्थ कुणी जाणलेला आहे हे ठासून सांगायचे आहे असे लक्षात येते.*
आता ज्या अर्थी तुकोबा वेदांचा अर्थ आम्हालाच ठाऊक आहे असे म्हणत आहेत त्या अर्थी जे लोक हजारो वर्षांपासून वेदांचा अर्थ लावण्याचे आणि इतरांना सांगण्याचे कार्य करत आहेत त्यांना तो समजला नाही असा त्याचा अर्थ होतो. *आता जेव्हा एखाद्या गोष्टीचा अर्थच समजला नसेल तर ते लोक जे काही सांगत आहेत ते खोटे आहे असेच म्हणावे लागेल.* आणि तुकोबांनाही तेच म्हणायचे आहे हे पुढील विवेचनावरून लक्षात येईल.
या अभंगाच्या पहिल्याच ओळीत तुकोबांनी वेदांचा अर्थ जाणणाऱ्या दोन पक्षांबद्दल (बाजू) तुलना केलेली आहे हे उघडच आहे. तर हे दोन पक्ष कोणते आहेत? तर पहिला पक्ष हा वेदांना आपल्या अखत्यारीत ठेवणारा आहे, हजारो वर्षांपासून वेदांना आपली मक्तेदारी समजणारा आहे. आम्हीच खरे वेदांचे मालक आहोत असा तोरा मिरवणारा आहे. नव्हे तर जे ब्राह्मण नाहीत त्यांनी वेद वाचू नये असे हजारो धार्मिक कायदे बनवणारा आहे आणि या वेदांच्या अधिकाराच्या जोरावरच आपले वर्चस्व अबाधित ठेवणाराही आहे. *तुकोबांना जो पहिला पक्ष अभिप्रेत आहे तो हा असा वेदशास्त्रसंपन्न, वेदांची मिजास मिरवणारा प्रसंगी त्या अधिकाराचा (गैर) फायदा घेत इतरांना दूर लोटणारा आहे.* हा झाला एक पक्ष.
तुकोबांना जो दुसरा पक्ष अभिप्रेत आहे तो त्यांनी *'आम्ही'* या शब्दात मांडला आहे. हे *'आम्ही'* म्हणजे कोण? तर *ज्यांना पिढ्यानपिढ्या वेदांच्या अधिकारापासून वंचित केल्या गेले ते लोक.* ज्यांना वेद वाचण्याचाच काय पण वेदांची उच्चवर्णीयांनी उच्चारलेली अक्षरे सुद्धा ऐकण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता असे लोक. एका अभंगात तर तुकोबांनी हे तत्कालीन समाजवास्तव बोलूनही दाखवलेले आहे. ते लिहितात, *'वेदांची अक्षरे याज्ञीके आयकावी । आम्ही न आयकावी श्रावणी ती ।।.'* _म्हणजे वेदांची त्यांनी उच्चारलेली अक्षरे सुद्धा आम्हाला ऐकण्याचा अधिकार नाही मग आम्हा लोकांना वेद वाचण्याचा अधिकार असण्याचा प्रश्नच येत नाही._ अर्थात हे सत्यसुद्धा तुकोबांनी अजून एका अभंगात उजागर केले आहे. ते लिहितात, *'घोकावया अक्षर । मज नाही अधिकार ।।'* म्हणजे मला अक्षरे घोकण्याचा, ती वाचण्याचा अधिकार ही व्यवस्था देत नाही असा याचा अर्थ होतो. एवढ्या विवेचनावरून तुकोबांना, ते वर्णव्यवस्थेत ज्या समूहात येत होते त्या सुमहाला वेदांची अक्षरे वाचण्याचाच काय पण ऐकण्याचा अधिकार सुद्धा या व्यस्थेने नाकारला होता हे सत्य लक्षात यायला असे हरकत नसावी.
म्हणून ज्या वेळी तुकोबा वेदांचा अर्थ आम्हालाच ठाऊक आहे असे म्हणतात त्यावेळी त्यांना वर्णव्यवस्थेत *'वेद वाचण्याचा अधिकार असणारे'* आणि *'वेद वाचण्याचा अधिकार नसणारे'* असे दोन पक्ष अभिप्रेत आहेत हे उघड आहे. काही लेखक, अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार म्हणतात तसे *'वेदांचे अभ्यासक'* एवढाच मर्यादित अर्थ तुकोबांना अभिप्रेत नाही. कारण केवळ *'अभ्यासक'* असा शब्दप्रयोग केल्याने वेदांचा अभ्यासक कुणीही असू शकतो, वेदांचा अभ्यास कुणीही करू शकतो त्याला जाती-धर्म-वर्णाचे बंधन नाही असा त्याचा अर्थ निघतो. पण स्वतः तुकोबांनीच वेदांचा अधिकार कुणाला आहे आणि कुणाला नाही याबद्दल स्पष्टपणे भाष्य केलेले असल्यामुळे *वेदांचे अभ्यासक म्हणजे उच्चवर्णीय ब्राह्मणच होत हे लक्षात घ्यायला हवे.*
मला वाटते या ठिकाणी तुकोबांनी वरील अभंगात उल्लेख केलेले दोन पक्ष कोणते आहेत हे स्पष्ट झाले असेल. तर आता पुढील विवेचनाकडे वळू या.
तुकोबा लिहितात की वेदांचा अर्थ आम्हालाच माहित आहे. आणि जे *'येर'* लोक आहेत ते केवळ वेदांच्या अर्थाचा भार वाहत आहेत. वेदांवर ज्यांची मक्तेदारी होती त्यांचा उल्लेख तुकोबांनी येर (म्हणजे इतर लोक) या शब्दात केलेला आहे. म्हणजेच इथे तुकोबांनी स्पष्टपणे शोषक आणि शोषित यांच्यात असलेला फरक अधोरेखित केलेला आहे. आता जेव्हा वेदांचा अर्थ आम्हालाच माहित आहे असे तुकोबा अत्यंत निर्धारपूर्वक म्हणतात त्यावेळी त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की *'तुम्हाला तो माहित नाही.'* तुम्हाला म्हणजे दुसऱ्या पक्षाला, वेदांची मिजास मिरवणाऱ्या लोकांना, ज्यांचा उल्लेख तुकोबांनी 'येर' असा केलेला आहे त्या लोकांना. वेदांची मिजास बाळगणाऱ्या, आम्हीच वेदांचे खरे मालक आहोत अशी प्रौढी मिरवणाऱ्या लोकांना वेदांचा खरा अर्थच समजला नाही *तर ते लोक केवळ त्याचा भार आपल्या डोक्यावर वाहत आहेत.* तुकोबांचा हा आशय याच अभंगाच्या पुढील ओळीवरूनही लक्षात येतो. ते लिहितात, *'खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाही मजुरीचे ।।'* म्हणजे एखादा खाद्य पदार्थ खाल्ल्यानंतरच त्याची खरी चव कळते. केवळ तो पदार्थ नजरेने बघून त्याची चव समजत नाही. चव समजण्यासाठी तो पदार्थ प्रत्यक्ष खावाच लागतो तर आणि तरच त्याची खरी चव एखाद्याला समजते. म्हणजे या उदाहरणावरून तुकोबांना असे म्हणायचे आहे की तुम्ही लोकांनी (गैर) अधिकाराच्या जोरावर वेद भलेही भारंभार पाठ केले असतील पण त्याचा अर्थ जाणून घेण्यात मात्र तुम्ही कमी पडला आहात. कारण तुमचे पाठांतर हे एखादा खाद्य पदार्थ केवळ नजरेने पाहणे अशा तोडीचे आहे. तो पदार्थ खाऊन, पचवून त्याच्या चवीसंबंधी अधिकारवाणीने बोलण्याएवढे तुम्ही लोक अनुभवसिद्ध नाही. *मग ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभवच घेता आला नाही त्या गोष्टीबद्दल तुम्ही जे काही सांगत आहात ते निःसंशय खोटे आहे.* त्यामुळे तुमचे पाठांतर हे एखाद्या भार वाहणाऱ्या मजुरा सारखे झालेले आहे.
मजूर लोक जसे एखाद्या मालाची ने-आण करतात पण त्या मालाचा त्याला काडीमात्रही उपयोग होत नाही तशी तुमची गत झालेली आहे. दुसऱ्या एका अभंगात अर्थहीन पाठांतर करणाऱ्या वैदिकांची तुलना तुकोबांनी ओझे वाहणाऱ्या घोड्याशी केलेली आहे. ते लिहितात, *'घोडे काय थोडे वागविते ओझे । भावेवीन तैसे पाठांतर ।।'* भाव नसताना केलेले पाठांतर हे ओझे वाहणाऱ्या घोड्या सारखेच आहे असे तुकोबा म्हणतात. अजून एके ठिकाणी तुकोबांनी वैदिक पंडितांची तुलना बैल आणि उंट यांच्यासोबत केलेली आहे. ते लिहितात, *'साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । तयासी सेवटी करबाडे ।।'* आणि *'मालाचे पै पेटे वाहाताती उंटे । तयालागी काटे भक्षावया ।।.'* याचा अर्थ उघड आहे की अर्थ न समजून घेता, अनुभव न घेता भाराभर पाठांतर केलेल्या वैदिक पंडितांची अवस्था ही भार वाहणाऱ्या मजूर, घोडा, बैल आणि उंट यांच्या सारखी आहे.
म्हणूनच तुकोबा अत्यंत आत्मविश्वासाने म्हणतात की वेदांचा खरा अर्थ हा *'आम्हालाच'* समजला आहे. भलेही तुम्ही आमचा वेद वाचण्याचा अधिकार हिरावून घेतला असेल, अन्यायकारक मार्गाने वेद आपल्या ताब्यात ठेवले असतील किंवा अजून काही केले असेल. पण त्याचा खरा अर्थ मात्र आम्हीच जाणतो. तुमची अवस्था तर शेवटी त्या बैलासारखी झालेली आहे.
समारोपाकडे वळत असताना अजून एका गोष्टीचे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. वेदांचा खरा अर्थ आम्हालाच माहित आहे तो येरांना माहित असण्याचे काहीही कारण नाही. कारण त्यांनी केलेले कृत्य म्हणजे *'भावेविन पाठांतर'* आहे. आम्ही म्हणजे कोण आणि येर म्हणजे कोण हेही स्पष्ट झाले. शेवटी राहतो प्रश्न तो वेदांचा खरा अर्थ काय आहे तो जाणून घेण्याचा. वेदांचा अर्थ आम्हालाच समजला आहे म्हणजे तो तुम्हाला समजला नाही हे उघड आहे. तरीही तुम्ही वेदांचा जो अर्थ सांगत आहात तो अर्थ निःसंशय खोटा असला पाहिजे. तुकोबा म्हणतात की खरा अर्थ आम्हालाच समजला आहे. *तर तो अर्थ काय आहे आणि तुकोबांनी त्याची अर्थ संगती कशी लावलेली आहे हे समजण्यासाठी मात्र तुकोबांचे चरित्र आणि त्यांच्या गाथेचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास आणि आकलन होणे गरजेचे आहे.*
धन्यवाद !
@ डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद
_(डॉ. बालाजी जाधव यांची विविध विषयांवर एकूण १४ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्या पुस्तकांसाठी ९४२२५२८२९० या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क करा.)_

0 Comments