देवणी - बोरोळ रस्त्यावर कार अपघातात दोघांचा मृत्यू....
देवणी / प्रतिनिधी : देवणी ते बोरोळकडे भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याशेजारी असलेल्या झाडाला आदळल्याने या अपघातात कार चालक तथा मालक यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील अन्य एकाचा उपचारादरम्यान लातूर येथे मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवार दि.२६ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर येथून बोरोळ येथे निघालेली कार क्रमांक एम.एच.४८-ए.५१९८ ही कार देवणी ते बोरोळ दरम्यान बापुणे यांच्या शेताजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात घटनास्थळी शरद रामचंद्र पाटील वय ४६ वर्षे राहणार बोरोळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील सतीश वैजनाथ कोयले वय ३५ वर्षे राहणार बोरोळ यांना गंभीर अवस्थेत झाल्याने ग्रामीण रुग्णालय देवणी येथे प्राथमिक उपचार करून लातूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा मंगळवार दि.२७ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले.
दोन्ही मयतांवर बोरोळ येथे मंगळवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील व कोयले यांच्या आक्समिक निधनामुळे बोरोळ गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा आक्समिक नोंद करण्यात आली आहे.
0 Comments