भारत-पाक सीमेवरून जवानाने  दिली ऑनलाइन परीक्षा

 देवणी / प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षा सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. या परीक्षा विद्यार्थी विविध ठिकाणाहून देत आहेत. कै. रसिका महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्रातंर्गत प्रवेश घेतलेला सुनील बालाजी सूर्यवंशी  ( रा. कमालनगर - ता. भालकी )  हा विद्यार्थी सध्या भारत-पाक सीमेवर जम्मू  (जि.राजौरी )येथे कर्तव्यावर कार्यरत आहे. आणि तो सध्या तिथूनच भारतमातेची सेवा  करत बी.कॉम. तृतीय वर्षाची ऑनलाइन परीक्षा देत आहे.
     या आॅनलाईन परीक्षा सुरळीतपणे संपन्न होण्यासाठी संस्थाध्यक्ष मा. श्री. गोविंदरावजी  भोपणीकर साहेब व संस्था सचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब यांनी सुसज्ज अशी सर्व  सोयींनीयुक्त  संगणक लॅब उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  चंद्रकांत जावळे यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांची झूम ॲप द्वारे ऑनलाईन मिटिंग घेण्यात आली. या बैठकीत केंद्र संयोजक प्रा.डॉ. प्रशांत भंडे व केंद्र सहाय्यक प्रा. डॉ. गोपाल सोमाणी यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयात विशेष परीक्षा  सहायता कक्षाची स्थापना करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्परतेने सोडवण्यासाठी मदत व मार्गदर्शन करण्यात येत आहे. 
       नांदेड विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ. बी. के. मोहन व सहाय्यक कुलसचिव डॉ. चंद्रकांत पवार यांचेही वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. या अभ्यास केंद्रांतर्गत पूर्वतयारी, बी.ए.,  बी.कॉम., जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या, एम.ए. इंग्लिश, एम.बी.ए. अशा विविध अभ्यासक्रमासाठी अनेक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. 
      यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीतपणे संपन्न होत असल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे.