लोकमाता अहिल्याबाई होळकर : बहुजन हितदक्ष राज्यकर्ती 

रयतेच्या राज्याचे संस्थापक व बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर महाराष्ट्रात बरीच राजकीय उलथापालथ झाली. इथल्या वैदिक ब्राह्मणांनी शिवशाहीचे रूपांतर पेशवाईत करण्याचे खटाटोप चालू ठेवले आणि शेवटी त्यात ते यशस्वी सुद्धा झाले. बहुजनांची चिंता वाहणारे राज्य संपले आणि बहुजनांना गुलाम बनवणारी ब्राह्मणी–पेशवाई आली. परंतु अशाही परिस्थितीत शिवरायांचा वारसा चालविण्याचा यशस्वी व स्वाभिमानी प्रयत्न काही संस्थानिकांनी केला. त्या मध्ये इंदौर संस्थानचे नाव प्रकर्षाने पुढे येते. इंदौर संस्थानाची स्थापना राजर्षि मल्हारराव होळकर (जन्म-१६९३,मृत्यू–१७६६) यांनी केली आणि संस्थानाचा सर्वोच्च उत्कर्ष आपल्या स्वकर्तुत्त्वाने मल्हाररावांच्या सुनबाई लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी केला. 
    लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा दिनांक ३१ मे १७२५ हा जन्म दिन . अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी गावी एका मुलनिवासी धनगर कुटुंबात जन्मलेल्या अहिल्याबाई वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी इंदौर संस्थानचे संस्थापक राजर्षि मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव यांच्या सहचारिणी बनल्या. (खंडेरावांच्या इतर दोन मुस्लिम पत्नी होत्या.) 
    राजर्षि मल्हारराव होळकर हे ब्राह्मणी विचारधारा न मानणारे होते. स्त्रियांना शिक्षण प्रशिक्षण घेण्यास ब्राह्मणी संस्कृतीचा असणारा विरोध नाकारून त्यांनी आपल्या या चाणाक्ष व चपळ असणार्‍या सुनेला म्हणजे अहिल्याबाईंना तत्कालीन दरबारची मोडी मराठी लिहिणे–वाचने शिकविले. त्याबरोबरच घोड्यावर बसणे,दांडपट्टा चालविणे,डावपेच आखणे,सूचक पत्रव्यवहार करणे,करवसुली,न्यायदान आदी गोष्टींचे ज्ञान दिले.या सर्व बाबींच्यामुळे अहिल्याबाईंच्या विचारांवर त्यांच्या ससार्‍यांच्या संस्कारांचा /विचारांचा ठसा उमटलेला दिसतो. 
     वैदिक ब्राह्मणी समाज व्यवस्थेविरुद्ध बंड पुरुषांखेरीज स्त्रियांचे स्वतंत्र अस्तित्व अमान्य असणारी वैदिक ब्राह्मणी व्यवस्था त्यावेळी फारच मजबूत होती. या प्रथेविरुद्ध बंड करण्याचा प्रसंग अहिल्याबाईंच्या जीवनात १७ मार्च १७५४ रोजी आला. भरतपूरचा राजा सुरजमल जाट याच्याविरुद्ध राघोबाच्या (पेशवे)बाजूने लढताना अहिल्याबाईंचे पती खंडेराव ठार झाले. तत्कालिन वैदिक ब्राह्मणी समाज प्रथेनुसार खंडेरावांच्या इतर दोन मुस्लिम बायका सती गेल्या. परंतु अहिल्याबाईंनी सती जाण्यास साफ नकार दिला व त्यांनी केशवपनही केले नाही. सती जाऊन ब्राह्मणी व्यवस्थेला बळी पडण्यापेक्षा सासर्‍यांनी स्थापलेल्या ‘बहुजन हिताय’राज्याचा राज्य कारभार पाहणे त्यांनी पसंत केले. तसे करण्यात सासरे राजर्षि मल्हाररावांचे त्यांना मोठे पाठबळ मिळाले. खंडेरावांच्या श्राद्धविधीच्या वेळी सती गेलेल्या मुस्लिम पत्नींच्या नावाने विधी करण्यास ब्राह्मण भटाने नकार दिला.त्यामुळे अहिल्याबाई खवळल्या व त्या गरजल्या,‘नाती –गोती काय धर्मानेच बांधतात का? चराचरात ईश्वर पाहायला तुमचाच धर्म सांगतो. ज्या स्वामीमागे (पतीबरोबर) त्या जळून खाक झाल्या . त्यांच्या नावे दोन पळ्या पाणी सोडणे जमत नसेल तर बंद करा तो श्राद्ध विधी .....’लोकमाता अहिल्याबाई जशा स्वतः सती गेल्या नाहीत तशाच त्यांच्या सुनांनाही सती जाण्यास त्यांनी विरोध केला. सती प्रथेस विरोध करून अहिल्याबाईंनी जिजाऊ माँसाहेबांचा विचारवारसा पुढे चालविला.
लोकमाता अहिल्याबाई : बहुजन कल्याणकारी राज्यकर्त्या : 
राज्याचा कारभार करीत असतांना नेहमी सामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून त्या वागत असत. अपंग व असहाय्य लोकांचे पुनर्वसन,गोरगरिबांसाठी अन्नछत्रे,वस्त्रे यांचे वाटप असे जनहित कार्यक्रम त्यांनी त्यांच्या राज्यात राबवले. रयतेच्या भल्यासाठी कितीही मोठी किमंत मोजण्यास त्या तत्पर असत . राज्यात ज्यावेळी चोर–दरोडेखोरांचा उपद्रव होऊ लागला, तेव्हा अहिल्याबाईंनी घोषित केले की,‘जो कोणी उपद्रव कर्त्यांचा बंदोबस्त करेल त्याच्याशी आपल्या मुलीचा विवाह केला जाईल.’ हे आवाहन महेश्वरीच्या यशवंतराव फणसे या युवकाने स्वीकारले व पूर्ण केले. अहिल्याबाईंनी आपली मुलगी मुक्ताबाई हिचा वैदिक ब्राह्मणी धर्मसंकेत टाळून यशवंतराव फणसे यांच्याशी आंतरजातीय विवाह करून दिला. ब्राह्मणी विचारधारेमुळे जातीचा फुका अहंकार बाळगून जातीव्यवस्था अबाधित राखण्यास मदत करणार्‍या सध्याच्या बहुजनांसाठी ही घटना प्रेरणादायी नाही का? 
    वैदिक ब्राह्मणी वर्णव्यवस्थेचा परिणाम म्हणून आदिवासी भिल्ल , गोंड , रामोशी इ. जमातींना जंगलात लुटमार करून उदरनिर्वाह करावा लागत होता. त्यामुळे यात्रेकरू व जंगल असुरक्षित झाले होते. या जमातींच्या पोटाचा प्रश्न आणि यात्रेकरूंच्या संरक्षणाची जबाबदारीच वरील जमातींवर सोपविली व त्यासाठी त्यांना वार्षिक मोबदला सुरू केला .
त्यांचे सासरे राजर्षि मल्हारराव होळकरांच्या मृत्यू नंतर त्यांनी संस्थानची राजधानी महेश्वर येथे आणली . उद्योग धंद्याना चालना देण्यासाठी विणकर,कारागीर,कलावंत,साहित्यिक या सर्वांच्या विकासाचे धोरण ठरविले. त्यांना सुखसोयी पुरविल्या . परिणामी राज्याची औद्योगिक व आर्थिक प्रगती झाली.  
     छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये वृक्ष संरक्षणासाठी जसे अनेक आदेश आपल्या सैन्यांना दिले होते . तेच पर्यावरणवादी धोरण अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात राबवून अनेक ठिकाणी आमराई ,वड , पिंपळ अशी १५० ते २०० वर्षे जगणारी वृक्षे लावून कृतीतूनच त्यांनी छत्रपती शिवरायांचे विचार सत्य करून दाखविले. नदीवर घाट बांधतांना प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलावून पायर्‍या कशा असाव्यात,कपडे धुतांना मुलांना ठेवण्याची व्यवस्था व स्त्रियांना कपडे बदलण्याची खोली कशी असावी याचे मार्गदर्शन घेतले. अशा बारीकसारीक बाबींचा विचार करून कार्य करणार्‍या अहिल्याबाई म्हणजे मूलनिवासी बहुजनांस लाभलेल्या त्या भूषणच आहेत. 
     त्यांच्या या सर्व कामगिरीमध्ये सासरे राजर्षि मल्हारराव होळकर यांच्या संस्काराची व विचारांची साथ त्यांना खंबीरपणे होती. २० मे १७६६ रोजी राजर्षि मल्हारराव होळकर यांचे निधन झाले,आणि अहिल्याबाईंचा आधार तुटला.पण त्यांनी अशा प्रसंगाने खचून न जाता आपला पुत्र राजकुमार मालेराव यास शूर व लढवय्या बनविले व होळकरांचे राज्य घशात घालू पाहणार्‍या पेशवाईतील मस्तावलेल्या वैदिक ब्राह्मणी किड्यांना पायाखाली तुडवून मालेरावाने त्यांची ब्राह्मणी नांगी ठेचली. अशा या मालेरावांस तलवारीने संपविणे त्यांच्या शत्रूंना कधी शक्य नव्हते,म्हणून २७ मार्च १७६७ रोजी गुप्तपणे विषप्रयोग करून ब्राह्मणांनी त्यांचा खून करविला.तो दिवस होता गुढीपाडव्याचा.ज्या प्रमाणे धनगर पुत्र सम्राट अशोकाचा पणतू बृहदरथ व छत्रपती संभाजी महाराज यांना वैदिक ब्राह्मणी मनुस्मृती कायद्यानुसार ठार केले तसेच मालेरावांचे सुद्धा झाले. परंतु या बाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी‘ब्राह्मणांना त्रास देणार्‍या मुलाला अहिल्याबाईंनी हत्तीच्या पायाखाली दिले’असा ‘खोटा व गो ब्राह्मण प्रतिपालक’स्वरूपाचा इतिहास ब्राह्मणवादी इतिहासकारांनी लिहिला.  
      मालेरावांच्या मृत्यूनंतर होळकरशाही घशात घालण्याच्या कारस्थानात रघुनाथराव उर्फ दादासाहेब पेशवा उर्फ राघोबाही सामील झाले हे षड्यंत्र ध्यानात येताच अहिल्याबाई उदगरल्या, मेल्या ब्राह्मणांनी हरामखोरी आरंभली आहे,मी बायमाणूस काय करणार म्हणून मनास आणू नका.खांद्यावर बासडा (भाला) टाकून उभी राहिली तर श्रीमंतांच्या (पेशव्याच्या) दौलतीस (राज्यास) भारी पडेल,ही दौलत (राज्य) आमच्या वाड-वडिलांनी भाड-भवई करून मिळविली नाही तर तलवारीच्या अनुमाने शरीर खर्ची घातले आहे.’म्हणजे लोकमाता अहिल्याबाई या हातात महादेवाची पिंडी घेवून देव-देव करत देवावर सर्व हवाला सोडणार्‍या नव्हत्या तर आपल्या राज्याच्या रक्षणार्थ तलवार हातात घेवून रणांगणात स्वतः लढणार्‍या शूर मर्दानी होत्या.पण चरित्रकारांनी त्यांचे एकच धार्मिक छायाचित्र प्रसिद्ध केले व त्यांना पुण्यश्लोक ही उपाधी दिली हा त्यांच्या ब्राह्मणीकरणाचाच एक भाग आहे. लोकमाता अहिल्याबाईंनी पुरूषांचेच नव्हे तर स्त्रियांचे सुद्धा सैन्य उभारले होते.‘जर स्त्री राज्य करते तर स्त्री हे तिचे सैन्य का असू नये ?’सर्व जातीय सैनिकांबरोबर अनेक विश्वासू मुस्लिम सैन्य सुद्धा त्यांच्या पदरी होते.‘शरीफभाई’ हे त्यांच्या एका सैन्य तुकडीचे प्रमुख होते. अशा समतावादी स्त्री राज्यकर्त्या विरळच . 
      वरील सर्व विवेचना वरून लक्षात येते की लोकमाता अहिल्याबाईंचा राज्यकारभार प्रजाहितदक्ष, समर्पित वृती अन्यायाची चीड,अबलांचे रक्षण,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय,दृष्टांना शासन व गुणवंतांना आसन अशा प्रमुख तत्वांवर आधारित होता. परंतु त्यांच्या चरित्राचे ब्राह्मणीकरण झाले असून घाट बांधणी व देवळे बांधणीचे विपर्यास्त चित्रण करून अहिल्याबाई ह्या राज्यकारभारापेक्षा देवभोळ्या ब्राह्मणहितदक्ष होत्या,हेच बहुजनांत ठसविण्याचे प्रयत्न आतापर्यंत झाले आहेत. त्यांचे चित्र सुद्धा तलवारीपेक्षा देवपूजा करणारेच प्रसिद्ध आहे. हे सर्व ब्राह्मणी करण असून त्यांना या प्रतिमेतून मुक्त करून त्यांचे प्रेरणादायी बहुजन हिताय कार्य बहुजन समाजापुढे आणून त्याचा प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे व त्या साठी त्यांच्या चरित्राचे पुन्हा संशोधन व पुनर्लेखन होणे आवश्यक आहे. 
       अशा या थोर , महान, बहुजन हित दक्ष राज्यकर्त्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने समस्त मूलनिवासी बहुजन समाजाचे त्यांना विनम्र अभिवादन ! त्यांच्या या जयंती दिना निमित्ताने आपण शपथ घेवूया.‘मूलनिवासी बहुजन सारे एक होऊया.’हीच त्यांच्या कार्य कर्तुत्वास-स्मृतीस विनम्र आदरांजली ठरेल.

बि.टि.व्हि न्यूज महाराष्ट्र तर्फे सर्व बहूजनांना हार्दिक शुभेच्छा..!!