उदगीरच्या नवीन बसस्थानकाचे बांधकाम कधी होणार..?

प्रवाशांना जिव मुठीत धरून बसावे लागते बसस्थानकात

उदगीर / प्रतिनिधी : उदगीर विधानसभा मतदार संघातील माजी व आजी लोकप्रतिनिधीने आश्वासन देऊन देखील नवीन बसस्थानकाचे बांधकाम व भूमिपूजन कोनशिला हे लॉकडाऊन मध्येच असल्याचे चित्र दिसून येत आहे.                      सध्या असलेली बसस्थानकाची इमारत ही कमकुवत झालेली आहे. दर वर्षाला पावसाळ्यामध्ये या इमारतीतून पावसाचे पाणी गळत आहे. बरेच वर्षापासून नवीन बस स्थानक उदगीरला व्हावे, ही उदगीरकरांची मागणी होती. उदगीरचे भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या काळात ही इमारत लवकरात लवकर होणार याचा गाजावाजा पण झाला होता. व सन्माननीय आमदार सुधाकर भालेराव यांनी या बसस्थानक इमारतीच्या प्रांगणात भूमिपूजन कोनशिला ऑगस्ट 2019 ला लावून तसा भूमिपूजनाचा कार्यक्रम पण घेण्यात आला. त्यामुळे उदगीरकरांच्या आशा उंचावल्या व नवीन बसस्थानक होणार याबद्दल सर्वांत आनंदाचे वातावरण पण पसरले होते. त्यानंतर हे काम होण्याच्या अगोदरच विधानसभा निवडणुका लागल्या. या विधानसभा निवडणुकीत सन्माननीय विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार संजयभाऊ बनसोडे हे प्रचंड मतांनी निवडून आले. व लागलीच ते महाराष्ट्र राज्याचे बांधकाम राज्यमंत्री पण झाले. त्यानंतर या बसस्थानकाच्या नवीन बांधकामाचा प्रश्न परत समोर आला. यावेळी मंत्री महोदयांनी या उदगीर बसस्थानकाचे बांधकाम लवकरच होणार असे आश्वासन पण दिले. त्यानंतर नगर परिषद उदगीर व बसस्थानक महामंडळ उदगीर यांच्यामध्ये एका नवीन वादाला पाय फुटले.तो वाद म्हणजे एस टी महामंडळ उदगीर यांनी बांधकाम परवाना घेण्यासाठी, जवळपास 35 लाख रुपये भरल्याशिवाय बांधकाम परवाना देता येणार नाही, असे नगरपरिषदेने बजावले.त्यावर बसस्थानक  महामंडळ उदगीर येथील संबंधित अधिकारी यांनी आम्ही जनतेची सेवा करतोय त्यामुळे आम्हास हे पैसे भरणे शक्य नाही, असे नगरपरिषदेला सांगण्यात आले. शेवटी नगरपरिषद व उदगीर बसस्थानकाच्या वादात हे प्रकरण जागीच थांबून राहिलेले आहे.

यावर वृत्तपत्रांनी बातम्या पण प्रकाशित केलेले आहेत. त्यावर आज पावेतो हे प्रकरण जशास तसे जागेवरच राहून गेलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व उदगीर जळकोट मतदारसंघातील सन्माननीय मा.ना.संजय भाऊ बनसोडे यांच्याकडून  उदगीरची जनता नवीन बसस्थानकाची प्रतीक्षा करीत आहे. सध्या आहे ती इमारत कमकुवत झालेली असून धोकादायक ठरलेली आहे. खरे पाहता कोरोना हा संसर्ग रोग तीन महिन्यापूर्वी सर्वत्र जगात झालेला आहे. या कोरोना संसर्ग रोगाच्या काळात उदगीर बसस्थानकावरून सुटणाऱ्या सर्व बसेस या लाँक डाऊन मुळे बंद करण्यात आलेले होते. या बंद काळात ही जुनी  इमारत पाडून टाकण्याचे हे काम कमीत कमी तरी झाले असते. परंतु या इमारतीच्या संदर्भात प्रशासनाकडून कसलेच पाऊल उचलण्यात आलेले  दिसून येत नाही. भूमिपूजनाचा कोनशिला हा विधानसभा निवडणुका पासून आज पावेतो लाँकडाऊन मध्येच आहे. सध्या अस्तित्वात असलेली बसस्थानकाची जुनी इमारत ही कमकुवत व धोकादायक झाल्यामुळे, या बसस्थानकाचे नवीन बांधकाम लवकरात लवकर व्हावे अशी उदगीरकरांची इच्छा आहे. सन्माननीय राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांनी याकडे लक्ष घालून उदगीरकरांचे नवीन बस स्थानकाचे स्वप्न हे लवकरात लवकर साकार करावे अशी उदगीरच्या नागरिकांची  मागणी आहे.