सिंगिंग स्टार गायिका कविता राम यांनी रसिकांना केले मंत्रमुग्ध
पुणे / प्रतिनिधी : (सुनिल ज्ञानदेव भोसले) सोनी मराठी या वाहिनीवर सिंगिंग स्टार हा नवीन रियालिटी कार्यक्रम २१ आॅगस्ट पासून सुरु झाला आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटी आपल्या स्वतःमधील गायनाच्या पैलूचे दर्शन घडवत आहेत. कविता राम या नामवंत गायिका असून त्या सिंगिंग स्टार रियालिटी शो मध्ये अभिनेता अभिजित केळकर याच्या गुरुचे काम करत आहेत. गाण्यातील बारकावे, टीप्स त्या अभिजित केळकर याला शिकवताना दिसत आहेत. सोबतच आपल्या मधुर आवाजात गाणी देखील सादर करत आहेत. गायिका कविता राम यांनी " गोमू संगतीनं " या गाण्याचे केलेले सादरीकरण या कार्यक्रमात परिक्षकांना खूप आवडले. साहजिकच कविता आपल्या आवाजाच्या जादूने सिंगिंग स्टार चा रंगमंच व संपूर्ण महाराष्ट्र गाजवत आहे.
पाटण तालुक्यातील चिचांबा माटेकरवाडी हे कविता राम यांचे मूळ गाव आहे. म.टा.सन्मान २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून त्यांची निवड झाली आहे. तसेच नुकतेच त्यांनी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या समवेत चित्रपटासाठी गाणे गायले आहे. तसेच जय जय महाराष्ट माझा या सोनी मराठीवरील कार्यक्रमात त्यांनी अनेक दिग्गज गायकां समवेत उत्कृष्टरित्या गायन केले आहे. कागर या चित्रपटातील रिंकू राजगुरु हिच्यावर चित्रीत झालेल्या " दरवळ मव्हाचा "आणि तांडव या चित्रपटातील " जय भवानी आणि जय शिवाजी " व इतर गाणी सर्वत्र अतिशय लोकप्रिय झाली आहेत. चित्रपट सृष्टीचे तसे सर्वांनाच आकर्षण. याच क्षेत्रामध्ये आपल्या जादुई आवाजाने गायिका कविता राम यांनी वेड लावले आहे . माटेकरवाडीच्या कविता राम यांनी आपल्या आवाजाची मोहिनी सर्वांवर घातली आहे.
कविता राम यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबई या ठिकाणी झाले आहे. शालेय वयात असतानाच त्या गायन क्षेत्राकडे आकर्षित झाल्या. इयत्ता ७ वी मध्ये असताना त्यांनी आंतर शालेय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता तसेच सुप्रसिद्ध गायक अरुण दाते आणि गायिका राणी वर्मा परीक्षक असलेल्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवला होता. शाळेत असताना एकांकिका, अभिनय अशा अनेक स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. अनेक स्पर्धेत त्यांनी पारितोषिके मिळवली आहेत. अभिनय, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत असताना बऱ्याच शिक्षकांनी ‘‘तूझा आवाज गोड आणि चांगला आहे, या क्षेत्रात तू करियर कर’’ असे सांगितले. त्यामुळेच आपण या गायनाच्या क्षेत्रात आल्याचे कविता राम म्हणाल्या.कविता राम यांनी इयत्ता ८ वी मध्ये असताना पहिला स्टेज शो केला. यावरुन त्यांच्या कला क्षेत्रातील प्रतिभेची जाणीव झालेली दिसून येते. घरामध्ये कोणतेही कलाविषयक वातावरण नसताना त्यांनी या क्षेत्रात केलेली वाटचाल आणि मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. त्यांनी घरामध्ये सर्वात मोठी असल्यामुळे घराची जबाबदारी जाणिवपूर्वक आणि अतिशय कौशल्य पूर्वक पेलली आहे. अनेक वर्षापासून कविता राम विविध प्रकारचे स्टेज शो, कार्पोरेट कार्यक्रम, प्राॅडॅक्ट लाॅजिंग प्रोग्रॅम मुंबई व परदेशात करत आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे २००० च्या वरती शोज केले आहेत. त्यांच्याकडे बाॅलिवूड, पंजाबी, पाॅपसाॅंग गाण्याची क्षमता आहे. अनेक मराठी-हिंदी गाण्याचे अल्बम त्यांच्या नावावर आहेत. घरच्या परिस्थितीमुळे काही कारणास्तव त्यांना उच्चशिक्षण व गाण्याचे शास्त्रीय शिक्षण घेता आले नाही याची खंत त्या व्यक्त करतात, पण स्मरणशक्ती चांगली असल्याने त्यांनी यावर मात केली असून त्या सध्या श्री.विरन सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संगीताचे शिक्षण घेत आहेत.
या गायन कला क्षेत्राकडे जाण्यासाठी संपूर्ण कुटुंबियांचा विरोध असताना देखील आई सौ.अलका माटेकर, आजी कै. विमल धनू यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला असल्याचे त्या आवर्जून सांगतात.मुंबईतील प्रतिष्ठित मोठे हाॅल, फाईव्ह स्टार हाॅटेल, बॅन्केट हाॅल यामध्ये आय ए अॅण्ड एफ एज, हाॅटेल आॅफ प्राॅडॅक्शन, रोटरी क्लब आॅफ वापी, सुराना अॅन्ड सुराना इत्यादि अनेक कार्यक्रमांच्या द्वारे त्या आपल्या कार्यक्रमाचे सादरीकरण करत असतात. तसेच अनेक अवघड गाणी, कव्वाली, गझल अशी विविध प्रकारची गाणी प्रभावीपणे गाण्यात कविता राम यांचा हातखंडा आहे. आतापर्यंत त्यांनी स्टार प्लस वरील " ये रिश्ता क्या कहलाता है ", सोनी टीव्हीवरील " " गोदभराई " , कलर्स हिंदी वरील " भाग्यविधाता ", " मेरे घर आई एक नन्ही परी ", " कैरी " या मालिकांतील गीतांचे पाश्वगायन केले असून त्या मालिका शहरी व ग्रामीण भागातील घराघरात पोहोचल्या आहेत. तसेच " या टोपीखाली दडलंय काय " , " लाज राखते वंशाची " , " सौभाग्य माझं दैवत " , ‘दुर्गा म्हणतात मला’, ‘शिनिमा’ या मराठी तर ‘गब्बर इज बॅक’, ‘सिंग इज किंग’या चित्रपटातील लावणींचे आणि गीतांचे गायन गायिका कविता राम यांनी केले आहे. तसेच ‘सिंग इज किंग’या अक्षय कुमारच्या चित्रपटातील व्होकल स्वराचे गायन देखील त्यांनी केले आहे. याशिवाय कविता राम, आनंद शिंदे, आदर्श शिंदे या सर्वांचा एकत्रित असलेल्या ‘हळदी रिमिक्स’ या कॅसेट मधील " गाडी बंगला" , " ये पोरगा माझ्यावर मरतोय " ही गीते खूप हिट झाली आहेत.
विविध गाण्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांच्या वर आपल्या आवाजाची मोहिनी पसरत असलेल्या गायिका कविता राम भविष्यामध्ये उज्ज्वल यश मिळवतील यात शंकाच नाही. कविता राम यांनी
चित्रपटासाठी गायलेली गीते -
कागर चित्रपटातील दरवळ मव्हाचा, तांडव, दोस्तीगिरी, लादेन आला रे, हक्क, आता माझी हटली, नगरसेवक, थॅंक यू विठ्ठला, शिनिमा खूप गाजली आहेत. तसेच हिंदी मराठी मालिकांसाठी गायलेली टायटल साॅंग व गीते - स्वराज्यरक्षक संभाजी, जुळता जुळता जुळतंय, ये रिश्ता क्या कहलाता है, बाजी, गोदभराई, साथिया, मेरे घर आई नन्ही परी अतिशय लोकप्रिय झाली आहेत.
0 Comments