नरेंद्रभाई वाल्मिकी समाज हा सुद्धा हिंदू धर्मातीलच एक आहे की वो......

माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब ,
 प्रधानमंत्री ,
भारत सरकार .

महोदय ,
साहेब तुम्हाला त्या उत्तरप्रदेश मधील घटनेचे काही समजले की नाही ? कारण तुम्ही सध्या त्या मोर आणि इतर पक्ष्यांसोबतच फार व्यस्त असता म्हणून विचारले . अहो , तुमच्या उत्तरप्रदेश राज्यात अराजकता माजली आहे . तुमचा आवडता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यात उत्पात मांडला आहे . त्यांना एक प्रकारची मस्ती आणि माज चढला आहे . उत्तरप्रदेश ही त्यांच्या बापजाद्याची प्रॉपर्टी असल्यासारखे ते  वागत आहेत. ते कोणाच्याही बापाला ऐकत नाही. उत्तरप्रदेश राज्यात सध्या लोकशाही नसून रेपशाही चालू आहे .

साहेब तुम्ही सगळ्या देशाचे प्रमुख. खरं म्हणजे संविधानिक पद्धतीने पाहिल्यास राष्ट्रपती हेच  देशाचे प्रमुख असतात .परंतु सध्या त्यांची अवस्था सोन्याच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटासारखी झाली आहे .  ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपल्या मालकाच्या म्हणजे आपल्या सोयीचे भाषण करतात . त्यांनी राष्ट्रपती पदाची शान इतकी वाढवली आहे की काय सांगू . जर भारतातील 132 कोटी लोकांना विचारले की भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ? तर 131 कोटी 50 लाख लोकांना त्यांचे नाव सुद्धा माहित नसेल . ज्या पन्नास लाख लोकांना त्यांचे नाव माहीत आहे ते युपीएससी-एमपीएससीचे विद्यार्थी आहेत . त्यांनाही त्यांच्या नावात काहीही  इंटरेस्ट वाटत  नाही. फक्त 1/2 मार्कांसाठी ते लक्षात ठेवावे लागते . असो.

आपले  राष्ट्रपती दलित समाजातील आहेत म्हणे . म्हणून तर  राष्ट्रपती असून सुद्धा त्यांना देवळात प्रवेश दिला जात नाही. पदापेक्षा जात मोठी असते साहेब . माहीत आहे आम्हाला. मुंबई भेटीत राष्ट्रपती त्यांचा सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून गायिका लता मंगेशकर यांच्या घरी जातात . अगदी  तसाच प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांनी एखाद्या हिंदू दलित बलात्कारित कुटुंबाच्या घरी जायला काय हरकत आहे. असो.  पत्राचा उद्देश राष्ट्रपती नाही तर हिंदू दलित मुलीवर झालेला  गॅंगरेप आहे. आता राष्ट्रपती हे सुद्धा हिंदू दलित असल्याने योगायोगाने योगीच्या निमित्ताने त्यांचा उल्लेख करावा लागला . क्षमस्व .

 तर मोदी साहेब तुम्ही जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होतात ना  तेव्हा तर तुम्ही योगीपेक्षाही जबरदस्त पद्धतीने  राज्याचा कारभार पाहिला होता . त्यावेळचे प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्याला राजधर्म पाळण्यासंबंधी काही सूचना केल्या होत्या . त्या सूचना आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार xxx मारल्या होत्या . आता तुमची भूमिका बदलली आहे. तुम्ही प्रधानमंत्री आहात . तेव्हा तुम्हीसुद्धा योगीबाबांना राजधर्माची आठवण करून द्यावी . मग ते सुद्धा आपण केलेल्या सूचनेला xxx मारतील . याला नैसर्गिक न्याय म्हणतात बर का साहेब . असो .

 साहेब ,अहो त्या हिंदू वाल्मिकी समाजाच्या  मुलीची काय वाईट अवस्था केली हो तेथील सवर्ण हिंदू लांडग्यांनी . साहेब खरं तर तुम्ही हिंदूंच्या मतांसाठी हिंदू हिंदू म्हणून घेता . त्यावेळी कोण खालचा , वरचा , मधला हे पाहत नाही . तुम्ही सगळ्यांना एकच हिंदू समजता . आणि ते योग्यच आहे . हिंदू वाल्मिकी समाज हा कुठे मुस्लिम ,ख्रिश्चन , पारसी , पंजाबी आणि बौद्ध आहे हो . साहेब हा वाल्मिकी समाज हिंदू मध्येच येतो आणि बलात्कार करणारे ते चार नराधम सुद्धा हिंदूच आहेत . हिंदू समाजातील ठाकूर आहेत ते . मला कळत नाही एका हिंदूने दुसऱ्या हिंदुंवर केलेले अत्याचार आपण हिंदुत्ववादी कसं सहन करता ? काय म्हणता हिंदू व्यवस्थेत ते सर्वात खालच्या स्तरावर असल्याने तुम्ही त्यांना हिंदूच समजत नाही .असं कसं  काय ? अहो ते हिंदू धर्माचे सर्व रीतिरिवाज पाळतात . ते गणपती बसविण्यापासून सगळे हिंदू सणसूद व्यवस्थित पार पाडतात . तुम्ही जर कोणत्या मुसलमानाला मारायाचा आदेश काढला तर ते हिंदू म्हणून लगेच मारायला सुद्धा जातात की . ते स्वतःला कट्टर हिंदू समजतात . साहेब .आता गेल्या महिन्यात तुम्ही रामजन्मभूमि शिलान्यास पार पाडला . त्यावेळी हा वाल्मिकी समाजच मोठमोठ्याने जय श्रीराम जय श्रीराम  म्हणत होता . आणि साहेब रामायण सुद्धा वाल्मिकीनेच लिहिले आहे ना ? त्यांची काय चूक ?  खरंतर तुम्ही ज्या हिंदुत्ववादी विचारसरणीतून येता ना त्या सर्वांनी या घटनेचा जोरदार विरोध करून मोठा मोर्चा काढायला पाहिजे होता. कारण वाल्मिकी समाज हा सुद्धा हिंदू समाजाचाच एक भाग आहे .परत काय म्हणता ते हिंदू असून सुद्धा खालच्या स्तरावर आहेत . असेल बुवा . तुमच्या लोकांच्या असल्या वर्तुणुकीला कंटाळूनच लाखो लोकांनी धर्मांतर केले . ज्यांनी धर्मांतर केले ते सुखी झाले . ज्यांना हे समजलेच नाही ते अजूनही त्या स्तरावरच राहण्यात आनंद मानत आहेत . जर त्यांना त्या स्तरावरील आनंद , मानमरताब  घ्यायचा असेल तर त्यांनी त्या स्तरावर दुःख , अपमान हे सुद्धा सहन केले पाहिजे . नाही का ? असो . 

साहेब , मूळ मुद्दा असा आहे की तुमच्या असल्या ढिल्या कारभारामुळे आपल्या देशाची प्रतिमा सगळ्या जगात ढासळत चालली आहे हो . तुम्ही सत्तेवर आज आहात उद्या तर नक्कीच नसणार .  लिहून घ्या . पण देश तसाच असतो ना साहेब .  तुमच्या कारकीर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाच्या प्रतिमेचे नुसते वाटोळे झाले आहे . अमेरिकेत तुमचे गुजराती एन . आर . आय . आहेत म्हणून ते  मोठमोठ्याने मोदी-मोदी असे ओरडतात . त्यामुळे  तुम्हाला भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मोठी झाली असे वाटत असेल . अहो ते एन . आर . आय . भिकारी आहेत . ज्याच्याकडून जास्त  फायदा मिळतो त्याचा ते जयजयकार करतात . डोनाल्ड ट्रम्पने त्यांना कितीही भिकाऱ्यासारखी वागणूक दिली , त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला, तरी ते ट्रम्पचेच पाय चाटणार . इतके ते  स्वार्थी आहेत . देशाबाहेर जाऊन गुलामी करणारे आणि देशातील आरक्षणावर बोलणारी ही बेईमान जमात आहे . असो .

 मोदीसाहेब आपल्या हिंदू धर्मात रात्री  शव जाळतात का हो ? आणि ते ही एका जवान मुलीचे ?  अशी काय आणीबाणी होती साहेब ? आणीबाणी वरून आठवलं . आयर्न लेडी इंदिराजी गांधी यांच्या आणीबाणीच्या पर्वामध्ये सुद्धा इतका भयंकर उत्मात , उन्माद कधी झाला नव्हता हो . तुम्ही आणि संघी त्या पर्वाला नावे ठेवता . आणि स्वतः मात्र कायदेशीर आणीबाणी  न लावता सुद्धा हिटलरी कारभार करता . बरं आठवलं साहेब , हिटलरने अर्ध जग जिंकल्यावर सुद्धा डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती . असो . आपल्याला काय त्याच ? 

साहेब त्या हिंदू दलित वाल्मिकी मुलीचा शेवटचा मृत्यूपूर्व जबाब ऐकला का हो तुम्ही ? ती म्हणते तिच्यावर गँगरेप झाला आणि बरच काही . परंतु उत्तरप्रदेशचा अतिरिक्त पोलिस महासंचालक ( कायदा व सुव्यवस्था ) प्रशांतकुमार हा एका अंध भक्ताप्रमाणे प्रेस कॉन्फरन्स घेतो  आणि बलात्कार झालाच नाही असे मुर्खासारखे सांगतो . हा आयपीएस चपलेने सुद्धा मारायच्या लायकीचा नाही हो . याला बडतर्फ सुद्धा करू नका . त्याला या गुन्ह्यात सहआरोपी करून तुरुंगातच टाका .च्यायला हे मी कोणाला सांगतोय ?  सॉरी साहेब . मला आपल्या गुजरात राज्यातील आयपीएस अधिकारी संजीव भट हे आठवले . त्यांना अजून जामीन मिळाला नाही ना साहेब ? असो .

साहेब , या वेळच्या मन की बात मध्ये तुम्ही हा विषय घेणार ना ? तुम्ही नक्की घ्या हा विषय . आता तुमची छाती 56 इंची नाही , हे आम्हाला समजलेच  आहे . किमान पंचवीस-तीस इंची तर नक्कीच आहे.  मन की बात मध्ये त्या रोगीला सॉरी  योगीला  राजधर्माची नक्की आठवण करून द्या . साहेब खरं म्हणजे तुम्ही त्याला  मुख्यमंत्रीपदावरून काढून  दुसऱ्याला तिथे बसवा असे सांगणार होतो . परंतु तुम्ही तसे करणार नाही  योगी क्या चीज है हे तुम्हाला  आणि आम्हाला सुद्धा चांगलेच माहीत आहे . ते तुमचे ही गुरु आहेत .  त्यामुळे ती हिंमत तुमच्यात नाही . म्हणून म्हटलं नुसतं आरडाओरडा तरी करा .  आणि आपल्याला कुठे त्याच्यासमोर जाऊन बोलायचं आहे . आपल्याला मन की बात तर करायची आहे .असो .

साहेब आपल्या उत्तरप्रदेशमध्ये चांगली आरोग्यसेवा नाही म्हणून त्या पीडित मुलीला दिल्लीच्या रुग्णालयात शेवटच्या स्टेजला उपचारासाठी घेऊन आले . त्याठिकाणी त्या मुलीने प्राण सोडला .  साहेब , तुमच्या दृष्टीने काँग्रेस कितीही वाईट असू दे . त्यांच्या काळात निर्भया प्रकरण झाले  . परंतु त्या निर्भयाला वाचवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले .  श्रीमती सोनिया गांधी या स्वतः रुग्णालयात जाऊन निर्भयाला भेटल्या . निर्भया वर उत्तम उपचार व्हावेत म्हणून तिला सिंगापूरला नेले . तिचे शव घेण्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहनसिंग हे स्वतः विमानतळावर हजर होते . परंतु त्या हलकट नराधमांनी तिच्यावर इतके भयंकर पाशवी अत्याचार केले होते की सिंगापूरमधील आरोग्य यंत्रणा सुद्धा काही मदत करू शकली नाही . आणि पुढे ऐका हे फारच महत्त्वाचे आहे . कोणालाही न सांगता , सरकारी पैशात स्वतःची प्रसिद्धी न करता , गुपचूपपणे , राहुल गांधींनी त्या मुलीच्या घरच्यांचा सगळा खर्च उचलला . आणि हो हे राहुल गांधींनी नाही सांगितले  तर निर्भयाच्या आईने सांगितले . मोदी महाशय तुमच्याकडून इतक्या उच्च प्रतीची संवेदनशीलता बाळगायला आम्ही मूर्ख आहोत का ? साहेब तुम्ही या हिंदू वाल्मिकी मुलीला उपचारासाठी परदेशात पाठविले  असते तर ती जिवंत तरी राहिली असती एवढीच अपेक्षा होती ५६ इंचाकडून . झाला असता थोडाफार खर्च .आपण तो पी . एम .फंडातून केला असता . नाही तरी आपल्याला त्याचा हिशोब कुठे द्यायचा आहे . दुसरा उपाय म्हणून आपण आदानीला दिला असता अजून एक एअरपोर्ट आणि सांगितलं असतं त्याला थोडा खर्च करायला . आपल्याकडे भरपूर चॉइस होता साहेब .

मोदीसाहेब काळजी घ्या . तुमच्याकडे सत्तेचे शेवटचे  तीन-साडेतीन वर्षे आहेत. नंतर परत तुमच्या पक्षाची सत्ता येईल न येईल . आणि हो ते अमितभाई कोरोना मुक्त झाले का ? त्यांना आमच्या शुभेच्छा द्या . बिहारच्या निवडणुकीची  सेटिंग झाली असेलच ? असो .

 एक भारतीय नागरिक,

अ‍ॅड.विश्वास काश्यप ,
माजी पोलिस अधिकारी ,
 मुंबई....