पत्नी ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे

हिंदू धर्माने मानवी  जीवनाला चार आश्रमात विभागले आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. त्यातील पत्नीचा संबंध हा दुस-या आश्रमापासून येतो. मानवी जीवनातील काही ऋण फेडण्यासाठी  व प्रजोत्पादन करण्यासाठी गृहस्थाश्रम हा महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्माने सोळा संस्कार सांगितले. त्यातील विवाह संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा मानला आहे. विवाह संस्कारानंतर आपल्या आयुष्यात  विधी संस्कारानुसार ज्या स्त्रीचे आगमन आपल्या जीवनात होते तिलाच पत्नी बायको, भार्या, कांता, कामिनी, अर्धांगीनी या व अशा अनेक नावांनी संबोधले जाते.  
खरे तर पत्नी या शब्दाचा अर्थ असा सांगता येईल की जी पतीला अध:पतनापासून वाचविते ती पत्नी पण जर ती संस्कारी असेल तर! नाही तर जी पतीला पतनाकडे घेवुन जाते ती पत्नी असा ही अर्थ काढता येतो. ते पतन शारीरिक असेल किंवा मानसिक.
 पत्नीचे महत्व विशद करताना संस्कृतमध्ये खालीलप्रमाणे सांगितले आहे, 
 " *अर्ध भार्या मनुषस्य l*  *भार्या श्रेष्ठतम सखा l* 
   *भार्या मुलं त्रिवर्गस्य l* *भार्या मुलं तरिष्यती" ll* 
    याचा अर्थ असा की पुरुषाचे अर्धे शरीर म्हणजेच भार्या, तिच पुरुषाचा जिवलग मित्र होय.धर्म, अर्थ,काम हे तिन्ही पुरुषार्थ साधण्याचे मूळ तिच आहे. ज्याला संसाराच्या अडचणीतून पार पडायचे असेल त्याला त्याची भार्याच उपयोगी पडते असे वर्णन ही केलेले  आहे. 
आपल्याकडे ' *अर्धनारी* *नटेश्वर'* ही संकल्पना देखील आहे. एका ठिकाणी शिवजींचे वर्णन करताना म्हटले आहे कि  *'प्रातर्नमामी गिरीशं 'गिरीजार्धदेहम'* म्हणजे इथे गिरीजा अर्थात पार्वती ज्यांचा अर्धदेह आहे त्या शंकराचा त्यास प्रात: नमन करावे. म्हणजेच प्रत्येक पुरूषाचे अर्धे शरीर हे त्याची पत्नी आहे.सोप्या भाषेत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की संसाररूपी या सायकलची दोन चाके म्हणजेच पती-पत्नी आहेत.दोन्ही चाकां शिवाय सायकल चालू शकत नाही. तसेच दोघांचा ताळमेळ  असल्याशिवाय संसार( प्रपंच )चालू शकत नाही.यातील एक जरी बिघडले तरी जीवन प्रवास खूंटतो.
  आपल्या शास्त्रांनी पतीपेक्षा अधिकचे महत्त्व पत्नीला दिल्याचे आपल्या लक्षात येते असे म्हणतात की पतीने पुण्य केले की अर्धे पत्नीला आपोआप मिळते पण पत्नीने पुण्य केले तर ते पतीला मिळत नाही. पतीने पाप केले तर पत्नीला अर्धे मिळत नाही पण पत्नीने पाप केले तर पतीला अर्धे मिळते.
कोणतेही धार्मिक कार्यसूध्दा पत्नी सोबत असल्याशिवाय पूर्ण होत नाही. एवढेच काय तर व्यवहारात देखील पतीची पदवी देखील पत्नीला आपोआप मिळते.
 जसे डॉक्टरची पत्नी डॉक्टरीन, वकिलाची पत्नी वकिलीन,  मास्तरची पत्नी मास्तरीन, तसे पत्नीच्या पदावरून पतीला संबोधले जात नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या संस्कृतीने पत्नीला काही विशेष अधिकार दिले आहेत.
    मग हा प्रश्न उपस्थित होतो की शास्त्राने एवढे अधिकार पत्नीला का दिले असावेत? तर पत्नी  जो त्याग करते तो खरोखरच वाखाणण्याजोगा असतो.आपल्या आयुष्यातील सुरूवातीची कित्येक वर्षे आपल्या आई वडिलांबरोबर राहणारी ही स्त्री आई-वडिलांना सोडून नव्या घरी पतीसोबत येते. एवढेच नाही तर आपल्या आई-वडिलांकडील अनेक वेळा तिला तिचे नाव सोडावे लागते,आडनाव सोडावे लागते. पतीच्या  घरी येईपर्यंत तिला सुरुवातीला  बघायला येण्यापासून अनेक कसोट्यातून बाहेर पडावे लागते. येथे नांदायला आल्यावर तिला अनेक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते, अनेकांची मर्जी सांभाळावी लागते, त्यासाठी तिने पूर्वी पाहिलेल्या अनेक स्वप्नांना तिलांजली द्यावी लागते, आपल्या आईवडिलांच्या नावासाठी ती अनेक प्रकारच्या तडजोडी स्विकारते. कदाचित या सर्वांमुळे  शास्त्रांनी तिला जास्तीचे अधिकार दिले असावेत असे वाटते. 
जी पत्नी पतीच्या घरी राहून पती धर्माचे आचरण करते तिला शास्त्राने पतिव्रता असे संबोधले आहे. पतिव्रता पत्नी कशी असते याची सहा गुणवैशिष्टे सांगितले आहेत.
 *कार्येषु मंत्री, करणेषु दासी l* 
 *भोज्येषु माता, शयनेषु रंभा l* 
 *धर्मानुकुला,क्षमया धरित्री l* 
 *षडगुण एतध्दी, पतिव्रतानाम* ll
   याचा अर्थ असा सांगता येईल की ती कार्यात मंत्र्यांप्रमाणे, सेवेत दासीप्रमाणे, जेवण्यात आईप्रमाणे,शयनात रंभेप्रमाणे, धर्मामध्ये अनुकूल व शेवटी नवऱ्याचे अपराध धरित्रीप्रमाणे सहन करणारी स्त्री म्हणजे *प्रतिव्रता* असे म्हटले आहे.
    अशा प्रतिव्रतांबद्दल शास्त्र खूप विस्ताराने लिहिते पण त्या खोलात मी न जाता संत कबीर  काय म्हणतात ते आपण पाहू -
 " *पतिव्रता मैली  भली l* 
 *गले कांच की पोत l* 
 *सब सखियां में यों दिपै l* 
 *ज्यों सूरज की पोत ll* तर
    संत तुकाराम महाराज म्हणतात-
 *तुका म्हणे पतिव्रता* l
 *तीची देवावरी सत्ता ll* 
     किंवा 
 **पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण* 
 *आम्हा नारायण तैशा परी** ।किंवा
ज्ञानेश्वर माऊली लिहितात, *"पतिचिया मता l अनुसरोनी पतिव्रता l अनायासे आत्महिता l भेटेचि ते ll"* अशी किती तरी प्रमाण संत साहित्यात आपणास आढळतात.पत्नीचे महत्व भारतीय संस्कृतीने परोपरीने वर्णीलेले दिसते. आपल्याकडील हिंदू देवतांमध्ये हनुमंत  सोडले तर सर्वच देव पत्नीसोबतच दिसतात व त्यांच्या स्तुती स्रोतांमध्ये पत्नीचा उल्लेख पहिल्यांदा दिसून येतो.  
जसे *' पार्वतीपते' शिवहरहर महादेव'* किंवा ' *अच्युतम केशवम्* रामनारायणम या श्लोकात *'जानकीवल्लभम्'* असा उल्लेख आहे. नरसी मेहतांच्या प्रसिद्ध भजनात *'रघुपती राघव राजाराम l पतित पावन सिताराम ll इथेही 'सिताराम'असा* उल्लेख येतो.
वारकरी देखील म्हणतात, *'आम्ही धरिला चित्ती l एक 'रखुमाईचा पती'* 
किंवा 
पांडूरंगाच्या आरतीत  ही, *'जय देव जयदेव जय पांडुरंगा l 'रखुमाई वल्लभा'l 'राहीचे वल्लभा' ll 'रुक्मिणी प्राण संजीवन' l* 
' *लक्ष्मीकांत* *' ,'लक्ष्मीपती'* असे अनेक उल्लेख दिसून येतात.
      आपण शास्त्रांचा व इतिहासाचा धांडोळा घेतला तर लक्षात येते की आपल्याकडे पती-पत्नीचे नाते हे पाश्चात्यांप्रमाणे तात्कालिक स्वरूपाचे नसून ते पवित्र, एकनिष्ठ आहे. एकमेकांसाठी सर्वस्व अर्पण करणारे आहे.  जसे आपण जाणता की आपले पती महादेव यांचा अपमान आपले वडील दक्ष करतात हे सहन न झाल्यामुळे सती आपल्या वडिलांना सांगते की माझ्या  पतीचा अपमान करणार असाल तर आपल्यापासून मिळालेल्या या देहाचा मी त्याग करते व असे  म्हणत ती यज्ञकुंडात देह समर्पीत करते.रामायणात आदर्श पत्नी म्हणुन मंदोदरीचा उल्लेख करता येतो. तसेच एकपत्नीत्व रामांच्या ठिकाणी ही पाहता येते.महाभारतात ही आदर्श पत्नीचे उदाहरण म्हणुन गांधारीचा उल्लेख करावा लागेल.आपला पती नेत्रहीन आहे.तो पाहू शकत नाही म्हणून ती स्वतःच्या डोळ्यावर आयूष्यभर कापडाची पट्टी बांधून घेते. द्रौपदी ही पाच पतीबरोबर आदर्श जीवन जगते,अत्रीऋषी व अनसूयेचे दांपत्य जीवन, विठ्ठलपंत व रुक्मिणीचे दांपत्य जीवन, विठ्ठलपंतांना देहदंडाची शिक्षा दिली जाते तर त्यांच्या बरोबर  रुक्मिणी  ही देहदंडाची शिक्षा स्विकारते. गोस्वामी तुलसीदास जे सुरुवातीला विषयांध होते असे  त्यांचे जे वर्णन आलेले आहे ते पुढे आपल्या रत्नावली पत्नीच्या उपदेशाने प्रभु रामचंद्रांचे भक्त बनतात व रामचरितमानस तथा अन्य ग्रंथांचे लेखन करतात.स्वत: तुलसीदास सांगतात की, ' *तुलसी तो चाखा रामरस l पत्नी का उपदेश ll'* रामकृष्ण परमहंस व शारदामणी या दोन्ही पती- पत्नीच्या वयात अठरा वर्षाचे अंतर होते.रामकृष्ण हे पाच वर्षाचे होते तेंव्हा  पत्नी शारदामणी ह्या तेवीस वर्षाच्या होत्या,तरीही दोघांनी एक दुस-यां सोबत केलेला संसार हा आदर्श पती-पत्नीचा संसार ठरतो.महात्मा फुले व सावित्रीबाई फुले,महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी, संत गाडगेबाबा व  आलोकाबाई,बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर,लालबहादूर शास्त्री व ललितादेवी शास्री,जयप्रकाश नारायण व प्रभावती, बाबा आमटे व  साधनाताई आमटे अशी किती तरी आदर्श पती-पत्नीची उदाहरणे आपणास देता येतील.
        खरे तर पत्नी ही फार मोठी शक्ती पुरविते असे मला वाटते.पुरूष हे सतत घराबाहेर असतात तेंव्हा घराची काळजी ही योगीनीच करत असते. अनेक वेळा पुरुष हे व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात,स्रियांमध्ये हे दिसत नाही. तेंव्हा घर चालवण्याचे काम तिच पार पाडते.माझ्या स्वतःपुरते बोलायचे झाले तर मला आई- वडीलांनंतर सर्वाधिक बळ पत्नीनेच दिले. ज्याकाळी माझे लग्न झाले, तेंव्हा सूरुवातीचे काही वर्ष मी विनाअनुदानित महाविद्यालयात काम करत होतो.गावाकडे अल्प कोरडवाहू शेती.त्यामुळे तीकडून आर्थीक मदतीचा प्रश्नच नव्हता. तिच्या लग्नापर्यंत अडचणी माहीत नसलेली माझी पत्नी पण तिला लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच अडचणींना सामोरे जावे लागले.गावाकडे स्त्री प्रसाधनाची सोय नव्हती,लग्नानंतर तिसऱ्या दिवशी पंढरपुरला देवदर्शनाला आम्ही निघालोत पण गाडी बांधलेली नाही.एका मित्राच्या ट्रकच्या कॅबीनमध्ये बसून आम्ही प्रवास करुन देवदर्शन केलेले,मनाजोगी खरेदी नाहीच कारण पैसाच नाही.त्यात नेट -सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचे भूत मानगुटीवर बसलेलं, परीक्षा फीस भरायला पैसे नको पण पत्नीचे सततचे प्रोत्साहन की फीसची सोय मी माझ्या वडीलांना करायला सांगते.तुम्ही फक्त अभ्यास करा, मी संसाराची जबाबदारी स्विकारते. तिच्या सततच्या प्रोत्साहनामुळे तिसऱ्या प्रयत्नात मी सेट परीक्षा उत्तीर्ण झालो.तेच प्रोत्साहन पीएच.डी. साठी ही तिने केले.मी प्रोफेसर व्हावे म्हणुन मागील अनेक वर्षांपासून ती मला प्रोफेसर म्हणुनच संबोधत असे, त्यासाठी लागणारी गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी सतत प्रोत्साहन  देत राहिल्यामुळे मी प्रोफेसर होण्याचे प्रयत्न केले  आणि मी प्रोफेसर झालो.यासोबतच संस्थेने माझ्याकडे एका निवासी शाळेचे प्राचार्यपद सोपवलेले, त्यासाठी सकाळी ७.०० ते रात्री ८.०० पर्यंत इतका वेळ कुठलीच सूट्टी  (रविवार व सार्वजनिक) न उपभोगता कित्येक वर्ष काम करत होतो.तो पर्यंत आमच्या संसारात दोन मुलींचा जन्म झालेला होता.त्यांचा वाढलेला खर्च व पालनपोषण  करण्याची जबाबदारी त्यावेळी पत्नीने व सासरे नोकरीला मुखेडलाच असल्यामुळे त्यांनी उचलली. परिवारातील वारकरी संप्रदायाचे संस्कार व आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अधून-मधून मी आजूबाजूंच्या गावी कीर्तनासाठी जात असे.त्यातून काही पैसे मिळाले की ते संसारासाठी वापरायचे. तिथेही काही नातेवाईकांना आमचे सततचे कीर्तन करत फिरणे आवडले नाही म्हणून कीर्तनाचे कार्यक्रमही सोडावे लागले अशा आर्थिक अडचणीत गर्भ श्रीमंताची मुलगी असलेली माझी पत्नी तिला अनेक वेळा आर्थीक तडजोडी कराव्या लागल्या. आज वाटते की तिला त्या वेळेस तिच्या  अनेक स्वप्नांचे  पीठ करावे लागले.अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला.मी एक उत्कृष्ट वक्ता व्हावे असे तिला नेहमीच वाटायचे.त्यासाठी तिने भाषणातील अनेक उणीवा लक्षात आणुन देणे, इथपासून ते नोट्स काढु लागणे, इथपर्यंतची मदत केली म्हणूनच मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. मी आईवर एक हजारापेक्षा जास्तीची भाषणे महाराष्ट्रभर दिली तसेच विपुल लेखनही केले पण राहून राहून वाटायचे आई बाळाला जन्म देते.जीवनभर त्याची काळजी घेते हे खरे आहे पण ऐन उमेदीच्या काळात आलेल्या अनेक संकटांना सामोरे जाताना आपल्याला महत्त्वाची  साथ ही पत्नीचीच लाभते.पत्नी जर सहकार्य वृत्तीची व सांमजस्य दृष्टीची  लाभली तर *'नर का नारायण* '  व्हायला वेळ लागत नाही पण ती जर कर्कशा,संशयी व अहंकारी मिळाली तर मग मात्र घराचा नरक व्हायला वेळ लागत नाही. कारण तिला समजावण्यातच आपली सगळी शक्ति क्षीण होते. घरात नेहमी संघर्ष उभा राहतो त्यातून दोघांचेही शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडते.मुलांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो.माझे आई- वडील हे आदर्श दांपत्य जीवन जगले म्हणुन आम्ही भाऊ घडलोत. मला माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या.कधी कधी तर मी मनाने खूप खचलो पण त्यावेळी माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही चिंता करू नका.सगळे व्यवस्थित होईल म्हणून तिने साथ दिली.  ती नेहमी मी न सांगता व न बोलता माझ्या चेह-याकडे बघुनच माझ्या  मनात काय चाललंय ते ओळखून मदत करत राहीली. खरे तर तिचे नावच *दैवशाला* . एका अर्थाने तिने माझे दैवच बदलून टाकण्याचं काम केले असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
       पत्नीने आपल्याला समजून घ्यावे असे प्रत्येक पतीला वाटते, तसे तिच्याही काही भावना असतात.त्या पुरुषांनी ( *पतीनेही* ) समजून घेतल्या पाहिजेत. आपण एकांगी वर्तन करून पत्नीला सतत हाणमार करणे, तिला दुत्कारणे, तिच्या माहेरांच्यांना वाईट वाटेल असे बोलणे, वागणे, असे आपण वागत राहिलोत तर घरात एक औदासिन्यतेचे वातावरण निर्माण होते.त्यातून ताणतणाव निर्माण होतात व  दोघांनाही अनेक आजारांना सामोरे जावे लागते. याचा सर्वात विपरीत परिणाम हा आपल्या अपत्यांवर होतो.त्यासाठी आपले संयमी वागणे,सहविचार व समविचार वृत्तीने राहणे हेच सुंदर आयुष्य जगण्याचं सूत्र आहे.पत्नीचे जितके महत्त्व तारूण्यात आहे ,त्यापेक्षा अधिकचे महत्त्व हे  वार्धक्य अवस्थेमध्ये आहे. तारुण्यात तिचे महत्त्व शारीरिक आकर्षणामुळे असेल परंतु वार्धक्यात  मानसिक दृष्टिने तिचे महत्त्व अधिक आहे. बरीच पुरुष मंडळी वार्धक्य अवस्थेत आपली पत्नी सोडून गेल्यास जास्त दिवस जगत  नाहीत याचे एकमेव कारण हेच आहे.
         अलीकडे *'लिव्ह इन रिलेशनशिप'* सारख्या संकल्पना समाजात येत आहेत  पण माझ्या दृष्टीने त्यातून फार काही साध्य होत असेल असे वाटत नाही. त्या सोबतच करिअरच्या नावावर अलीकडच्या मुली *माता* होणे टाळण्याचे प्रमाण ही वाढताना दिसते आहे. हे समाजाच्या व त्या व्यक्तिच्या दृष्टिने चांगले नाही.याचा प्रत्यय अशा लोकांना नंतर येतो पण त्या वेळी त्याचा काहीच उपयोग होत नाही.कारण वेळ निघून गेलेली असते मग  अशा वेळी टोकाची पावले उचलली जातात. तेंव्हा युवावर्गाने वेळीच सावध होऊन आदर्श दांपत्य  जीवन जगणे हेच शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 
भारतीय कुटुंब व्यवस्था ही जगात सर्वश्रेष्ठ कुटुंब व्यवस्था म्हणुन मानली जाते. त्याचे श्रेय  माता व पत्नीला दिले पाहिजे.फक्त एवढेच की पतीला हे कळाले पाहिजे की आई व पत्नीमध्ये आपले प्रेम विभक्त करताना कसा समतोल साधता येईल. मला वैयक्तिक असे वाटते की आपली आई जितकी महत्त्वाची  आहे तितकीच आपल्या बाळाची आई म्हणजेच पत्नी देखील महत्त्वाची आहे. तिने वेळोवेळी केलेला त्याग लक्षात घेवुन आपणही कधी कधी दोन पावले मागे येऊन तिला समजून घ्यायला काय हरकत आहे? आणि पत्नीने ही केवळ पती हा माझाच आहे ,त्याच्यावर कोणाचाच हक्क नाही म्हणून त्याने कोणालाच विचारता कामा नये असे हेकेखोर वर्तन करू नये कारण त्यालाही त्याच्या जबाबदार्‍या एक पुत्र म्हणून एक भाऊ म्हणून व अन्य संबंधांनी पार पाडाव्या लागतात. त्या जर आपण योग्य साथ देवुन त्याला पार पाडू दिल्या तर घरातच स्वर्ग निर्माण होईल. अन्यथा भौतिक दृष्टीने समृद्ध असलेले घरही नरकात रूपांतरीत होते.
       पती पत्नीचे नाते  हे सर्वाधिक *'विश्वास'* या मूल्यावर आधारलेले आहे.त्याला दोघांकडूनही तडा जाणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. मला जे हवे आहे असे वाटते ते दुसऱ्याला ही वाटतच असेल ना? मग मी चोरी चुपके त्याचा अवलंब करायचा, आपल्या सहकाऱ्याला अंधारात ठेवायचे,हे दांपत्य जीवनात घडता कामा नये.हे नाते गंगेच्या पाण्यासारख स्वच्छ व पवित्र असलं पाहीजे.आपल्याकडे असे म्हटले गेले आहे की, *" स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे",* पण मी तर असे म्हणेन की पत्नी ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे!
      जगात ज्या ज्या महान विभुतींनी मोठी  कामे केली आहेत. त्यात एक तर ते ब्रह्मचारी राहून किंवा आई व पत्नीच्या सहकार्याने केलीत. अन्यथा घरात संघर्ष करून बाहेर मोठे काम करता येत नाही.तेंव्हा  माझ्यासह आपण सगळ्यांनीच पत्नीचा आदर करायला शिकले पाहिजे एवढेच मला म्हणायचे आहे.
    आज माझ्या अर्धांगिनीचा वाढदिवस आहे.त्या निमित्ताने हे विचार  व्यक्त करावे वाटले म्हणुन व्यक्त झालो.मला स्वत:ला जे वाटते ते लिहिले,आपणास असेच वाटत असेल असेही नाही. अर्धांगिनीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो व तिची असीच साथ शेवटच्या क्षणापर्यंत मिळत राहो. तिचे आयू व आरोग्य अबाधित राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझा शब्द प्रपंच थांबवतो.

                 
                प्रा.डॉ.रामकृष्ण बदने 
         ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर 
                 ता.मुखेड जि.नांदेड
                  ९४२३४३७२१५