सर्वसमावेशक नेतृत्व : माजी आ.  गोविंद अण्णा केंद्रे

(आज महाराष्ट्रातील अनुभवी जाणते नेतृत्व  माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे यांचा वाढदिवस.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याविषयी थोडेसे )

    स्वातंत्र्यानंतर या देशांमध्ये संविधानानुरुप स्वातंत्र्य, समता, बंधुता,न्याय असी समाजव्यवस्था प्रस्थापित होऊन उपेक्षित समाजातील माणसाला राजकारणाच्या माध्यमातून न्याय मिळावा या दृष्टिकोनातून बहुजन समाजातील काही यूवक  त्या काळात धडपडत होती.ज्यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा प्रभाव पडला होता.चांगल्या नेतृत्वाच्या सहवासात राहून समाज परिवर्तन करावे  असे त्यांना सतत वाटत होते.अस्याच समाज परिवर्तनाच्या भावनेने झपाटलेले त्याकाळचे यूवक व आजचे जुने जाणते नेतृत्व म्हणजे मा.गोविंद अण्णा केंद्रे होत.महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील उदगीर या शहरात तसे परिवर्तनाचे वारे आधीपासून वाहत होते.त्यात उदयगिरी महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य समाजवादी विचारसरणीचे देशपातळीवरील विचारवंत प्राचार्य डॉ.ना.य. डोळे सर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक युवक परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय झाले त्यातीलच एक नाव म्हणजे गोविंद अण्णा केंद्रे होत.
   गोविंद अण्णा केंद्रे यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये  हेर कुमठा ता.उदगीर जि.लातूर येथे संयुक्त कुटुंब पद्धतीच्या घरामध्ये  झाला.अशा संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेल्या या व्यक्तिमत्त्वामध्ये सुरुवातीपासूनच सर्वसमावेशकतेची  दृष्टी विकसित झालेली पहावयास मिळते. त्याच काळात महाराष्ट्रामध्ये समाजवादी चळवळी  मोठ्या प्रमाणावर चालत होत्या त्या समाजवादी चळवळीत काम करणारे प्राचार्य  डॉ.डोळे सर व समविचारी व्यक्तींच्या सहवासात गोविंद अण्णा आले आणि त्यांनी या माध्यमातून उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी अनेक वर्षे लढा दिला.त्यासाठी अनेक चळवळी उभारल्या,रस्त्यावर उतरुन संघर्ष ही केला.
       तद्नंतर भारतीय जनता पार्टीत माधवचा मंत्र डोळ्यासमोर ठेवून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब काम करताना पाहिले आणि त्यांचे आणि आपले विचार हे उपेक्षितांच्या उद्धारासाठीच  आहेत आणि म्हणून अण्णांनी गोपीनाथरावजी यांच्या सहवासातून भारतीय जनता पार्टी या पक्षात पदार्पण केले.त्यानंतर मग सतत या पक्षाच्या माध्यमातून काम करत राहिले. याच काळात उदगीर विधानसभा मतदार संघातून आमदार होण्याची संधीही जनतेने त्यांना दिली.आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी अनेक विकासाच्या योजना मतदारसंघांमध्ये राबविण्याचे मोठ्याप्रमाणावर कार्य केले.त्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला आणि त्यामुळे पुढे त्यांना या मतदारसंघातून उभा राहता आले नाही.तरी परंतु पक्षनिष्ठा म्हणून ते सतत पक्षाचे कार्य करत राहिले. पक्षाने  ही त्यांच्यावर वेळोवेळी अनेक  जबाबदा-या टाकल्या.त्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत तन्मयतेने व जबाबदारीने पार पाडल्या.आज ते राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी नियुक्त  आहेत.देशाच्या पंतप्रधानांपासून गृहमंत्री मा.ना.अमीतभाई शहा प्रर्यंत त्यांचा संपर्क आहे. एकेकाळी तर महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या अनेक निर्णयात गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे गोविंद अण्णा यांचा सल्ला घेत असत आणि अत्यंत प्रामाणिक पणे पक्षवाढीसाठी अण्णांनी साहेबांना सल्ला दिल्याचे ही आपण पाहिले आहे.तसेच पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे ही आपण पाहिले आहे. माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे  साहेब हे जाहीर सभेतून तिकीट वाटप असो की निवडून येण्याबद्दलची जबाबदारी असो ते गोविंद अण्णांवर सोपवायचे आणि अभिमानाने सांगायचे की ते माझे जावई आहेत. यावरूनच अण्णांनी मुंडे साहेबांचा किती विश्वास संपादन केला होता हे आपल्या लक्षात येते. आजही मुंडे साहेबांच्या वारसदार माननीय माजी मंत्री सौ. पंकजाताई मुंडे यांच्या प्रत्येक सुख दुःखामध्ये वडीलकीच्या नात्याने ते सतत मागे उभे असलेले आपण पाहतो.दसरा मेळावा असो की अन्य प्रसंग असोत अण्णांनी मुंडे साहेबांची निष्ठा ढळू दिली नाही.बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या किंवा परळी विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये देहभान विसरून पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करतानाही आपण अण्णांना पाहिले आहे.अण्णांनी पक्षनिष्ठा  आजपर्यंत ही ढळु दिली नाही. बऱ्याच वेळेस नेतेमंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी  मागील निष्ठा बाजूला ठेवून  सत्तेचे वारे जिकडे वाहते त्या गटाला जाऊन मिळताना आपण नेहमी पाहत असतो म्हणजेच संधीसाधू पणाचे राजकारण आपणास पहावयास मिळते  परंतु अण्णांनी लोकनेते मुंडे साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा आजही सोडल्याचे आपणास दिसत नाही. कदाचित त्याचे फायदे त्यांना किती होत आहेत  व तोटे त्यांना किती सहन करावे लागत आहेत. ते त्यांचे त्यांनाच माहिती असेल परंतु एक मात्र खरे की अण्णासारखा कित्येक वर्षापासून पक्षासाठी रात्रंदिवस काम करणारा नेता जो  सतत जनतेच्या  विविध प्रश्नांसाठी लढताना, झगडताना दिसतो आहे. अस्या ह्या एकनीष्ठ नेत्याला पक्षाने विधान परिषदेत  संधी  द्यायला हवी  असी सामान्य जनतेपासून सर्वांचीच तीव्र इच्छा आहे. आम्ही वाट पाहतोय की अशा प्रामाणिक नेत्यांला  पक्ष कधी संधी देतोय ते ?परंतू त्यापेक्षा या पक्षांमध्ये नवीनच येऊन त्यांना विधानपरिषदेची संधी प्राप्त झाल्याचे आपण सगळेच जाणतोत. यामुळे देखील अण्णांनी आपली पक्षनिष्ठा सोडलेली नाही,कांगावा ही केला नाही. कदाचित त्यांच्या मनाला पक्षाच्या अशा धोरणांचा खेद होत असेलही पण त्यांनी  तो कधी व्यक्त केल्याचे दिसतही नाही.पक्षासाठी 'जिथे कमी  तीथे आम्ही'  हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून ते एकनिष्ठपणे काम  करताना दिसताहेत.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनंतर भारतीय जनता पार्टीत मराठवाड्यात  नव्हे तर महाराष्ट्रभर सर्वदूर पोहोच असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून  त्यांच्याकडे पाहता येईल.सर्व समाजाबद्दलची सर्वसमावेशकता अण्णांकडे पहावयास मिळते. त्यातले  त्यात अण्णा अनेक वर्षांपासून कुठल्या ही सत्तेवर नसताना देखील वंजारी समाजाचे त्यांच्यावर विशेष प्रेम आहे.समाजाचा किती ही भव्य दिव्य कार्यक्रम असेल  किंवा छोट्यातला छोटा कार्यक्रम असेल पक्ष, गट,तट विसरून त्या कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष म्हणून असो की मार्गदर्शक म्हणून असो अण्णांचे नाव हे प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या अत्यंत अनुभव संपन्न भाषेतून सर्व श्रोत्यांना समजेल अशा शैलीतून अण्णा नेहमीच मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाने सभेचा मूडच बदलून टाकण्याची ताकद त्यांच्या वक्तृत्व शैली मध्ये पहावयास मिळते. त्यांनी पक्षासाठी जपलेल्या निष्ठा त्यांच्या बोलण्याला वजन प्राप्त करून देतात.प्रत्येक व्यक्तीच्या सुख दुःखा मध्ये मुद्दामहुन अण्णा उपस्थित राहतात. कार्यक्रमाची कल्पना  स्वतः भेटूनच द्यावी  याचा ही मान ते पहात नाहीत.त्यांना केवळ भ्रमणध्वनीवरून किंवा व्हाट्सअप वरून जरी पत्रीका पाठवली किंवा  कल्पना दिली तरी वेळेच्या आत त्या कार्यक्रमास उपस्थित राहून हजेरी लावतात.  याचा अनुभव मी माझ्या वैयक्तिक तीन-चार कार्यक्रमांच्या संबंधाने घेतला आहे.एकदा येतो म्हणाल्यावर  मग ते कितीही दूर असतील तरी  निश्चितच येतात. हे त्यांचे अत्यंत महत्त्वाचे गुणवैशिष्ट्ये आहे. गुणी माणसा बद्दलचा आदर त्यांच्या ठिकाणी पहावयास मिळतो. गुणी माणूस हा सतत समाजासमोर आला पाहिजे आणि त्याचा मोठेपणा समाजाला समजला पाहिजे यासाठी ते अश्या व्यक्तीची तोंडभरून प्रशंसा करतानाही अनेक वेळेस मी पाहिले आहे. एखाद्या व्यक्तीचा परिचय झाल्यानंतर त्या व्यक्तीला  न विसरणे,त्यांच्या चांगल्या कामासाठी आपले वजन खर्ची घालने, त्याला त्याच्या नावानिशी  संबोधने हा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा गूण अण्णांनी हुबेहूब आपल्या आयुष्यामध्ये उतरविला आहे. कुठल्याही कामात दिरंगाई अण्णांना आवडत नाही. एखादे काम घेऊन गेल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला लगेच बोलून कामासाठी आलेल्या व्यक्तीचे पूर्ण समाधान करण्यासाठीची शैलीही अण्णाकडे पहावयास मिळते. हे एका अर्थाने चांगल्या नेतृत्वाचे गुण म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करावा लागेल.  ते मला तर नेहमीच  जावई  या शब्दाने संबोधतात  कारण मी केंद्रे परिवाराचा जावई असल्यामुळे ते सतत मला आदरार्थी  बोलत आले आहेत. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या समोर माझ्या गुणांचे कौतुक करने असो की  सौ.पंकजाताई यांचा परिचय करून देणे असो अशा  कामामध्ये अण्णा कधीच  कंजुषी करताना दिसत नाहीत . उजव्या  व डाव्या विचारसरणीच्या मध्ये समन्वय घडवून आणण्याचे कामही अण्णांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसून येते.जे चूक आहे ते चूक आहे असे स्पष्टपणे सांगण्याची भूमिका अनेक वेळेस ते घेताना दिसतात. वेळ काढून वाडी तांडा पासून महानगरापर्यंत सतत प्रवास करून जनतेच्या संपर्कात असतात. प्रत्येकाच्या आनंदात आपला आनंद समजून ते सतत कार्य करतात. 
 अण्णांचे शिक्षणावर ही जीवापाड प्रेम आहे. म्हणून ते कुठल्याही  शाळा, महाविद्यालयांच्या कार्यक्रमांना विशेषता स्नेहसंम्मेलन, पालक मेळावे, अशा शैक्षणिक कार्यक्रमांसाठी आवर्जून उपस्थित राहतात.  मी शिक्षण कसे घेतले?हा स्वताचा विनोदी अनुभव सांगून सभा जिंकतात व  त्यातून शिक्षण शिकण्याचे महत्त्व विद्यार्थी-पालक यांच्या ध्यानी आणून देतात. शिक्षकांनी ही हे पवित्र काम अत्यंत निष्ठेने करण्याचा सल्ला देतात.  याचा प्रत्यय आम्ही आमच्या संस्थेमध्ये अनेक कार्यक्रमांतून घेतला आहे. अण्णांना सर्वाधिक चीड त्या लोकांविषयी आहे जी माणसे कृतन्घ आहेत.त्यांना असे वाटते की प्रत्येक माणसाने कृतज्ञताभाव जपला पाहिजे. ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांना आपण आयूष्यात कधीच विसरू नये असे त्यांना सतत वाटते. त्यासाठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल. पण अलीकडे कृतज्ञता यापेक्षा कृतघ्नता वाढते आहे याची चिंता ते व्यक्त करताना दिसतात. अण्णांचे वारकरी सांप्रदायावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे ते आपली जन्मभूमी हेर कुमठा येथे गावकऱ्यांच्या सहकार्याने त्यांना विश्वासात घेऊन भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह,भव्य रामकथा, भागवतकथा,अन्नदान असे विविध कार्यक्रम आयोजित करतात.वारकरी संप्रदायातील अनेक  कीर्तनकारांसी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक ठिकाणी कीर्तनाच्या कार्यक्रमाला अण्णा आवर्जून उपस्थित राहतात. 
    अण्णांचे आणखीन एक महत्त्वाचे गुणवैशिष्टे म्हणजे त्यांचा असलेला संयुक्त परिवार.  आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या समाजव्यवस्थेमध्ये एक आदर्श संयुक्त कुटुंब पद्धतीचे उदाहरण म्हणजे अण्णांचा परिवार आहे.परिवारात एक दुसऱ्यांचे सन्मान सर्व सदस्य करत असताना दिसून येतात. त्यांनी आपल्या सोबतच्या व पुढील पिढीवर ही समाजसेवेचे संस्कार केलेले दिसतात. त्यामुळे त्यांच्या परिवारात नेतृत्वगुण दिसतो.त्यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्य करत आलेले आहेत तर सध्या त्यांचे चिरंजीव राहुलजी केंद्रे  हे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून मागील काही काळापासून  अत्यंत चांगले कार्य करत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी  विविध असे निर्णय घेतले आहेत ज्या निर्णयांची मीडियापासून राज्यभर चर्चा ही झालेली आपणास विदीत आहेच. त्याचबरोबर एक युवा  जिल्हा परिषद अध्यक्ष  किती चांगले काम करू शकतो याचा आदर्श ही  त्यांनी निर्माण केला आहे.प्रत्यक्ष  भेटीगाठीतुन अनेक समस्या सोडविण्याचे स्तुत्य कार्य  राहुलभैय्या करत आहेत. हे अण्णांनी केलेल्या संस्काराचे फळच आहे. अण्णांच्या या सर्व कार्याला त्यांच्या सौभाग्यवतीचे शोभाताई यांचे मनस्वी सहकार्य लाभत आले आहे,कारण कुठल्याही यशस्वी पुरुषाला यश संपादन करत असताना त्यांच्या अर्धांगिनीचे सहकार्य हे अत्यंत महत्त्वाचे असते.आमच्या ताई ही अण्णांच्या या सर्व कार्यात हिरिरीने सहभाग नोंदवतात म्हणून त्यांच्या प्रती देखील मी कृतज्ञताभाव व्यक्त करतो.
   अशा या सर्वगुणसंपन्न व सर्व समावेशक नेतृत्वाचा आज वाढदिवस. त्या निमित्ताने मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांचे आयु आरोग्य अबाधित राखो व त्यांच्याकडून विविध माध्यमातून समाजाची अशीच अविरत सेवा घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून. माझा शब्द प्रपंच थांबवतो.

              ‌ प्रा. डॉ.रामकृष्ण बदने 
     ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर 
              ता.मुखेड जि.नांदेड
                 ९४२३४३७२१५