नवनाथ गोरे यांच्या निवडीमुळे मराठी वाचकांसह साहित्य क्षेत्राच्या अपेक्षा उंचावल्या


मुंबई / प्रतिनिधी : जगण्याची चित्तरकथा साहित्यातून मांडणारे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा साहित्यिक 'फेसाटी' कार नवनाथ गोरे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. नवनाथ गोरे यांच्या या निवडीमुळे साहित्य क्षेत्रासह जनसामान्यांमध्ये, योग्य निवड झाल्याच्या भावना व्यक्त होत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
       हलाखीची परिस्थिती, गरीबीचे चटके आणि दोन वेळची खायची भ्रांत अशा जगण्याच्या लढाईतून पुढे आलेले वास्तववादी युवा साहित्यिक नवनाथ गोरे हे, सर्वांना परिचित झाले साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्यामुळे. साहित्यिक म्हणजे समाजातील एक उच्चभ्रू आणि पांढरपेशा वर्ग असल्याचा समज होता. पण नवनाथ गोरे यांच्याकडे पाहिले, त्यांच्याशी भ्रमणवरून संवाद साधला किंवा त्यांची पार्श्वभूमी पाहिली, तर हा (गैर) समज सहज दूर होतो. अशा या तळागाळातून आलेल्या या युवा साहित्यिकाची महाराष्ट्र शासनाच्या या *महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळावर* सदस्य म्हणून निवड झाली. ही बाब साहित्य क्षेत्रासह सर्वसामान्य मराठी माणसाला/वाचकाला सुखावणारी आहे. 

       खरंतर नवनाथ गोरे हा परिस्थितीने घडवलेला साहित्यिक असून तो साहित्य निर्मितीच्या दृष्टीने कधीही शांत बसणारा नाही. साहित्यक्षेत्रात नवनवीन, दर्जेदार व वाचनीय साहित्य साकारणारा तरुण, तडफदार व संवेदनशील साहित्यिक आहे. म्हणून त्यांची उत्तरोत्तर आणखी साहित्यिक भरभराट होवो आणि 'फेसाटी' चा हा दबलेला आवाज भविष्यात एक दिवस विधानपरिषदेमध्ये घुमावा. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळावरील निवडीप्रमाणे रानातल्या झोपडीतला साहित्यिक विधानपरिषदेमध्ये सुद्धा पोहोचू शकतो, हे पुरोगामी महाराष्ट्राने दाखवून दिले, तर एक जगावेगळे उदाहरण ठरेल. नवनाथ गोरे यांच्या भावी आयुष्यामध्ये हेच घडो, ही मनःपूर्वक सदिच्छा...!!