बंगाल आणि  केरळ मध्ये संतोष राम यांचा “प्रश्न" ठरला  सर्वोत्कृष्ट लघुपट   

मुंबई : सहाव्या बंगाल आंतराष्ट्रीय लघुपट मोहत्सवामध्ये संतोष राम यांच्या "प्रश्न" ला सर्व लघुपटाच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून गौरवीत करण्यात आले  तसेच फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, केरळ आयोजित चौदाव्या साईन्स लघुपट आणि माहितीपट मोहत्सवामध्ये विशेष उल्लेखनीय लघुपट म्हणून गौरवीत करण्यात आले.   

बंगाल फिल्म अँड टेलिव्हिजन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने कोलकाता येथे मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लघुपट महोत्सवास दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. “ प्रश्न  “इतर राज्यांमध्येही भाषेची बंधने न येता आवडतोय आणि प्रेक्षकही त्याला चांगला प्रतिसाद देतायेत त्यामुळे मी खूप समाधानी आहे “असं संतोष राम म्हणाले.

मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्येवर आधारलेल्या  ‘प्रश्न’ या लघुपटाला नुकतेच फिल्मफेअर २०२० च्या लघुपट स्पर्धेसाठी नामांकन मिळले होते .मराठवाड्याशी नाळ असणाऱ्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी या विषयावर तेथील स्थानिक कलावंतांना घेऊन तयार केलेला हा पहिलाच लघुपट असावा. मूळच्या बीड जिल्ह्यातील, सध्या पुण्यात कार्यरत असणाऱ्या डॉ. गणेश आणि दिपाली सानप या  दांपत्याने सामाजिक जाणिवेतून त्याची निर्मिती केली आहे. मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या शिक्षणाचा प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करण्याचे ठरवले आणि संतोष राम यांच्या दिग्दर्शनाखाली हा लघुपट तयार करण्यात आला. 

वर्षातील अनेक महिने होणाऱ्या स्थलांतरामुळे मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांची  मुले शिक्षणापासून मोठा काळ वंचित राहतात. एकूणच तिथल्या ग्रामीण भागातील  शाळांची परिस्थिती, शिक्षकांवरील ताण, वेगवेगळ्या लोकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा    दृष्टिकोन या लघुपटात दिसतो. ऊसतोड कामगार असलेली, प्राथमिक शिक्षणही पूर्ण न केलेली आई आपल्या मुलाला शिकवण्यासाठी वाचनाची क्लृप्ती कशी वापरते हे यात पाहायला मिळेल. यात काम केलेले अनेक कलावंत स्थानिक असून व्यावसायिक  अभिनेते  नाहीत.  

‘प्रश्न’ हा लघुपटाची गेल्या वर्षी महिला सक्षमीकरण या विषयावर आधारित राज्य  महिला आयोगाच्या स्पर्धेत निवड आणि २०२० सालच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी  नामांकन मिळाले आहे. आत्तापर्यन्त देशभरातील १८ लघुपट महोत्सवात प्रश्न निवडला गेलेला आहे  आणि १२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

त्याचे दिग्दर्शक संतोष राम हे ही मूळ मराठवाड्यातील उदगीर येथील असून त्यांनी  यापूर्वी ‘वर्तुळ’,‘गल्ली’ असे उल्लेखनीय लघुपट दिग्दर्शित केलेले आहेत. त्यांच्या ‘वर्तुळ’ या लघुपटाला जगभरातील चित्रपट महोत्सवांमधून तेरा पुरस्कार मिळाले आहेत, 
तर  ‘गल्ली’ हा लघुपटही अनेक  महोत्सवांमध्ये दाखवला गेला आहे.