रक्तामध्ये ओढ मातीची!
---------------
पनवेल संघर्ष समितीच्या एक हजार झाडांच्या लागवडीला प्रारंभ
------------------
जागतिक पर्यावरण दिनाचे साधले कोल्हेखार येथे औचित्य
-----------------
कामोठे/प्रतिनिधी
रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन...
कवी कुसुमाग्रज यांच्या नावे देण्यात येणारा ‘जनस्थान’ प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्राच्या कवी इंदिरा संत यांच्या निसर्गाच्या प्रेमावरील कवितेतील ओळींशी अतूट नाते सांगत पनवेल संघर्ष समितीने आज शनिवारी (ता. ५) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तहसीलदार विजय तळेकर आणि सामजिक वनीकरणच्या वनाधिकारी प्रियांका पाटील यांच्या शुभहस्ते वृक्ष लागवडीला प्रारंभ करण्यात आला.
कामोठे शहराच्या पश्चिमेस, पनवेल सायन महामार्गावरील रोडपाली-कोल्हेखार येथील समुद्राच्या कुशीत वसलेल्या मोकळ्या सरकारी जमिनीची निवड करून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, नावडे विभागीय अध्यक्ष योगेश पगडे यांनी सर्व पदाधिकार्यांच्या सहकार्याने एक हजार वृक्ष लागवड आणि किमान तीन वर्षे संवर्धनाचा निर्णय लोकसहभागातून घेतला आहे.
त्यानुसार पनवेल तहसील विजय तळेकर, नायब तहसील संजीव मांडे, राहुल सूर्यवंशी, सामाजिक वनखात्याच्या वनाधिकारी प्रियांका पाटील यांची भेट घेवून त्यांचे सहकार्य घेतले. जागा निश्चिती, सामाजिक वनीकरण मार्फत लोकसहभागातून वृक्षाची खरेदी करून आज मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीला प्रारंभ केला. आज जवळपास अडीचशे झाडांची लागवड करण्यात आली. पर्यावरण पुरक सशक्त आणि वेगवेगळ्या प्रजातीची किमान पाच फूट उंचीची झाडे शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यात आली.
उर्वरित झाडे पुढच्या आठवडाभरात तेथील रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात येतील. त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत ऑक्सिजनची गरज पाहता वृक्ष लागवड, त्यांचे संगोपन आणि निसर्गाचे जतन करण्याची शिकवण कवयित्री इंदिरा संत यांनी त्यांच्या कवितेतून दिली आहे. मातीतून मी आले वर, असे इंदिरा संत यांनी सांगून वृक्ष मानवी जीवनाची अनोखी सांगड घातल्याचा अनोखा अंदाज लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते, कवी आणि ज्येष्ठ संपादक कांतीलाल कडू यांनी पर्यावरणप्रेमी संघर्ष सदस्य योगेश पगडे आणि सहकार्यांनी लोकसहभागातून हा प्रकल्प हाती घेतला आहे.
‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देणारे टी-शर्ट, हिरवीगार झाडे, प्रसन्न मुद्रेचे अधिकारी, संघर्ष समितीचे निसर्गप्रेमी आणि सामाजिकता जतन करणारे पदाधिकारी तसेच वातावरणातील गारवा आणि हिरवाईचा शालू पांघरलेली धरती आज पनवेल संघर्ष समितीच्या कार्यक्रमानिमित्त उतू चालली होती.
कार्यक्रमाला तहसीलदार विजय तळेकर, वनाधिकारी प्रियांका पाटील, निवासी नायब तहसीलदार संजीव मांडे, राहुल सूर्यवंशी, नायब तहसीलदार एकनाथ नाईक, नालंदा गांगुर्डे, कळंबोली मंडळ अधिकारी संतोष कचरे, पळस्पे मंडळ अधिकारी सुरेश मोराळे, मोर्बे मंडळ अधिकारी एल. आर. राऊल, ओवळे मंडळ अधिकारी गणेश तेलंगे यांच्यासह तहसील कार्यालयातील कार्यालयीन स्टाफ, तलाठी कमचारी वर्ग, कोतवाल कर्मचारी वर्ग तसेच, वन खात्याचे प्रभाकर कुडारकर, मारुती मुंडे यांच्यासह पनवेल संघर्ष समितीचे सचिन पाटील, तुकाराम कंठाले, संतोषकुमार शुक्ला, हरेश पाटील, भूषण साळुंके, भास्कर साळूंखे, महेंद्र पाटील, तेजस म्हस्कर, इंदुबाई रामचंद्र पगडे, रामचंद्र नारायण पगडे, योगेश पगडे, उद्योजक संदीप सिंग, स्वप्नील पाटील, प्रणय पाटील, प्रियांका पगडे, विक्की पाटील, कुणाल पाटील, गोपाळ भाई, सुमित पगडे, वैभवी पगडे, सुभद्रा पगडे, योगिता पगडे, विकास जोगळे, सागर पाटील, मनोज पगडे, निर्मिती पगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments