टाळेबंदी दरम्यानची राज्यातील अन्नधान्य वितरणाची सद्यपरिस्थिती आणि उपाययोजना याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांसोबत मंत्री छगन भुजबळ यांचा संवाद
सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाबाबत राज्यसरकार सकारात्मक
मुंबई : राज्यातील स्थलांतरित मजुर, कष्टकरी वर्गाचे विविध प्रश्न आणि टाळेबंदी दरम्यानची राज्यातील अन्नधान्य पुरवठ्याची सद्यपरिस्थिती व उपाययोजना संदर्भात आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील अन्न नागरी अभियान या संस्थेतील सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी राज्य सरकार सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून स्थलांतरित कामगारांच्या रेशनिंग बाबतच्या समस्या सुटाव्या यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले
सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्री भुजबळ म्हणाले की स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांची आम्हाला जाण आहे मात्र त्याची आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या येतात मात्र मजुरांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रत्येक स्थरावर आम्ही प्रयत्न करू. यात रेशनवर मिळणारे धान्य हे गहू, तांदूळ प्रतिव्यक्ती पाच किलो दिले जात असले तरी यात वाढ करण्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत. यात चनाडाळ, तुरडाळ आणि खाद्य तेलाची समावेश करावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अश्या कुटूंबांची संख्या मोठी आहे. त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या निर्देशानुसार छाननी करत असते मात्र त्याला सध्या कोरोनामुळे स्थगिती देण्यात आली आहे. जे कार्ड अपात्र होतील अश्या ठिकाणी योग्य आणि पात्र कुटुंबांना समाविष्ट करून घेतले जाईल
विधवा स्त्रियांना रेशनिंग मिळण्यासाठी तातडीने आम्ही शासन आदेश काढू असे आश्वासन देखील या बैठकीत मंत्री भुजबळ यांनी दिले. त्याचप्रमाणे
शिवभोजन थाळीचा विस्तार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे ज्या ठिकाणी गरज भासेल अश्या ठिकाणी आम्ही शिवभोजनचा विस्तार करू, ज्या ठिकाणी गरज असेल अश्या ठिकाणांची नावे दिली तर यात दुरूस्ती करण्यास मदत होईल असे देखील भुजबळ म्हणाले. सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केलेल्या प्रश्नांना देखील यावेळी छगन भुजबळ यांनी उत्तरे दिली...
यावेळी या बैठकीला राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विभागाचे सचिव विलास पाटील, सहसचिव चारुशीला तांबेकर सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, रंजना कान्हेरे, मुक्ता श्रीवास्तव, विशाल जाधव , सुभाष लोमटे, तरूणा कुंभार , शुभदा देशमुख , चंद्रकांत यादव व अन्न नागरी अभियान या संस्थेचे राज्यातील विविध भागातील कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते.
0 Comments