देशभरातील राजकीय कोविड 'डेंजर'
--------------------
प्रा.अशोक बागवे यांचे वास्तववादी 'स्फोटक विधान'
----------------------
पनवेल: कोविड विषाणू अद्याप जगाला कळलेलाच नाही. त्यामुळे तीन आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीसारखी व्यथा आहे. ज्याच्या त्याच्या परीने जो तो अनुमान काढत सुटला आहे. परंतु, राज्य आणि एकूणच देशभरातील राजकीय घडामोडी, राजकीय उलाढाली, धोरण या साऱ्यातील गलिच्छ राजकारण पाहता सामान्य जनतेला कंटाळा आला आहे. त्यामुळे समाजाला लागलेला राजकीय कोविड सर्वात डेंजर असल्याचे स्फोटक आणि तितकंच खळबळजनक परंतु वास्तववादी विधान राज्यातील प्रख्यात कवी, गीतकार आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. अशोक बागवे यांनी केले.
पनवेल संघर्ष समितीने आयोजित केलेल्या 'कोविड संजीवनी पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी ते इतर वेळेपेक्षा अधिक आक्रमक झाले होते. नेहमी आपल्या कवी कल्पनेतून शब्दांचे मायेने आभाळ पांघरणारे प्रा. बागवे यांना ऐकायला उपस्थितांनी आतुड्यांचे कान केले होते. त्यात त्यांनी वेगळ्या मूडने कार्यक्रमात रंगत आणल्याने सभागृहात प्रत्येक शब्दागणिक टाळ्यांच्या पाऊसधारा कोसळत होत्या.
प्रा. बागवे म्हणाले की, राजकीय कोविडवर मात केल्याशिवाय समाज सुधारणे अवघड आहे. डॉक्टर, पोलिस, सामाजिक संस्था आणि इतर शासकीय कर्मचारी- अधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून समाजाला भयंकर परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांचे कौतुक आहे, अभिनंदन करायलाच पाहिजे. परंतु त्यांच्या एकूणच प्रयत्नांवर राजकीय कोविड पाणी फेरत असल्याने समाज भयभीत अवस्थेतून मार्गत्कमण करीत आहे, ही स्थिती बदलायच हवी, असे त्यांनी सांगितले.
वृत्तवाहिन्यांमुळे समाजघात सुरूच.!
--------------------
समाजाला मोकळ्याढाकळ्यायापद्धतीने जगू द्यायचे नाही, अशी धारणा करून वृत्तवाहिन्यांवरून जो काही धिंगाणा दाखवला जात आहे, त्यामुळे समाज जास्त व्यथित आहे. त्यांनीच समाजाचा घात चालविला आहे, समाज रसातळाला नेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची बोचरी टीका यावेळी प्रा. बागवे यांनी केली. ते म्हणाले प्रिंट मिडिया अद्याप तरी हाताबाहेर गेल्याचे चित्र नाही पण वृत्तवाहिन्या आग ओकून चुकीच्या पद्धतीने अभास निर्माण करून समाजाला गोंधळाच्या डोहात ढकलत आहेत.
कांतीलाल कडू राजहंस!
--------------
कांतीलाल कडू हा खरा कोविड योद्धा आहे. त्याने गेल्या दीड वर्षात कोविडच्या भयावह परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला आधार दिला आहे, त्या कार्याची नोंद सगळीकडे होत असून तो नुसता योद्धाच नाही तर राजहंसही आहे, असे गौरदगार प्रा. बागवे यांनी काढले. नुकत्याच केलेल्या कर्नाळा बँक आंदोलनाचा उल्लेख करत बागवे म्हणाले की, समाजाशी नाळ जोडली असल्याने बँकेचे ठेवीदार उत्स्फूर्त सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
कांतीलाल कडू यांचे कार्य पाहिले तर ग. दि. मांडगुळकर यांनी त्यावेळी त्यांच्या कवितेत केलेले वर्णन कांती कडूशी तंतोतंत जुळत असल्याचा दावाही प्रा. बागवे यांनी करून ती कविता पेश केली.
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक
कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला म्हणती हसूनी लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक
पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेडे पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणिक
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक
कांतीलाल कडू यांचे असे काव्यात्मक गौरवशाली वर्णन प्रा. बागवे यांनी करताच उपस्थितांमध्ये भावनिक संवेदनांचे नाजूक नाते गुंफले गेले.
ज्येष्ठ अभिनेते, सीआयडी फेम शिवाजी साटम, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांनीही कार्यक्रम फुलवताना साहित्यपूर्ण शब्दांची पखरण केली. त्यांनी काही अनुभव शेअर करून उपस्थितांच्या काळजाला नाजूकपणे हात घातला. त्यामुळे कार्यक्रम उत्स्फूर्त रसिकतेच्या शिखरावर पोहचला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले.
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, माजी नगरसेवक रमेश गुडेकर, कॉंग्रेस नेते शशिकांत बांदोडकर, माजी नगरसेवक, उद्योजक विजय लोखंडे, भाजपाचे नेते भीमसेन माळी, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार केशव कासार, महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, उपजिल्हा रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन संकपाल, कामोठे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव, महावितरणचे पनवेल शहर अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे, आबासाहेब बेडसे ट्रस्टचे संचालक पराग बेडसे, राष्ट्रवादीचे नेते सुरेश फडके आदी मान्यवरांनी व्यासपीठ सजले होते. त्या सर्वांच्या हस्ते कोविड संजीवनी पुरस्कार प्राप्त योद्ध्यांना गौरविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पनवेल महापालिका, पनवेल उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, परिमंडळ-2 चे पोलिस अधिकारी, कर्मचारी, महावितरणचे पोलिस अधिकारी, आयटीआयचे शिल्प निर्देशक, शहरातील आयुषचे डॉक्टर, वाहतूक पोलिस विभाग, एकता सामाजिक संस्था, कामोठे, धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान, नवनाथ मित्र मंडळ आदी सामाजिक संस्थांचा समावेश होता. शेकडो पुरस्कारर्थीनी कार्यक्रमाचे गुणगान गायले आणि समाधान व्यक्त केले.
नेरे विभागीय अध्यक्ष सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते शिवाजी साटम यांच्या हस्ते तर सौभाग्यवती शिवानी सचिन पाटील यांचा सत्कार अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
पाहुण्यांचे स्वागत तेजस डाकी, भास्कर भोईर, हरेश पाटील, डॉ. हेमंत पाटील, विकी खारकर, किरण करावकर, अंकुश म्हात्रे, मंगल भारवाड, तेजस म्हसकर, महादूशेठ पाटील, स्वप्नील म्हात्रे, प्रजिव्ह म्हसकर, योगेश पगडे, योगेश भगत, महेंद्र पाटील, सचिन पाटील, गणेश वाघिलकर, संतोष शुक्ला आदींनी केले.
पाहुण्यांचे औक्षण प्रारंभी शुभांगी लखपती, शैला म्हात्रे, आशा चिमणकर, अपर्णा सोनटक्के, प्रतिम कोळी आदींनी केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन भूषण साळुंके यांनी केले.

0 Comments