प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला प्राध्यापकांची साथ
देवणी : आजच्या आधुनिक युगात विज्ञान तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे. तसेच शेती क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञान, रसायनाचा वापर याचा परिणाम म्हणून शेती उत्पादन वाढले परंतु त्याच्या अतिवापरामुळे शेतीतून मिळणारे उत्पादन विषयुक्त झाले आहे. याचा दुष्परिणाम मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणावर होत आहे परिणामी मानव विविध रोगांना बळी पडत आहे. म्हणूनच मानवी आरोग्यास प्राधान्य देऊन सेंद्रिय पद्धतीने शेती करणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून *सेंद्रिय शेती जनजागृति* करण्यासाठी कै .रसिका महाविद्यालय देवणी येथील प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांच्या संकल्पनेतून प्रयोगशील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या शेतात जाऊन सेंद्रिय शेती जनजागृति उपक्रम हाती घेतला आहे. यानिमित्ताने रसिका महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. पुरुषोत्तम मोरे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजयकुमार मोरे तसेच संभाजीराव केंद्रे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक मुंडे, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. एस. कांबळे यांनी देवणी तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी श्री. ओमकार माणिकराव मसगल्ले यांच्या शेतात जाऊन त्यांच्याकडे सुरू असलेला गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्पाची माहिती घेतली व त्यांना मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खत निर्मिती कशी करावी, त्यातून अधिक आर्थिक उत्पन्न कसे घ्यावे तसेच ही सेंद्रिय शेती मानवी आरोग्यास कशी लाभदायक आहे, शिवाय कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील शेतकरी श्री. सिद्धेश्वर नानासाहेब पाटील, श्री. बालाजी शेषराव बिरादार श्री. माणिकराव मसगल्ले यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

0 Comments