आपणच ठरवा दोष कुणाला द्यायचा देवाला द्यायचा कि आपण मांडलेल्या विकृत अंधश्रेध्देला ...आपण किती अंधश्रेध्देच्या आहारी जायचे ते आपणच ठरवा ...."

 मे महिन्यातील रणरणत्या उन्हात ती चालत होती. कडेवर इवलंसं मूल घेऊन ऊन्हाने अन् भुकेने काऊन रडणारं... आज शनिवार, शनीच्या मंदिरात अभिषेक करावा म्हणून घरातून लवकरच बाहेर पडली होती ती. पण मालकाच्या घरी जाऊन उचल घ्यायला उशीर झाला...
मालक तसे चांगले पण देवा धर्माचा त्यांना तिटकारा... कितीतरी वेळ ते सांगत होते की असे अभिषेक, पूजा करून काही होणार नाही. त्यापेक्षा हेच पैसे जमव. पोराला शिकव. मोठा कर... पण तिच्या डोक्यात एकच आवाज घुमत होता देवळातल्या पुजा-याचा..."
 माई, तुझा घरधनी खूप पुण्यवान माणूस. देवधर्म पाळणारा. पण तुमच्या घराला शनीची साडेसाती लागली. त्यामुळे देवदर्शनाला जाताना तो अपघातात गेला. आता तुझा एकुलता एक लेक वाचवायचा असेल तर लवकरात लवकर शनीची शांती करून टाक... अभिषेक, पूजा केली की तुमच्या मागची साडेसाती निघून जाईल..." धनी गेला, आता लेकरू गमावलं तर जगून काय करणार..? म्हणून तिने ह्याच शनिवारी शांती करायची ठरवलं अन् त्यासाठीच ती लगबगीने निघाली होती... मालकाने होय नाही करत मालकिणीच्या म्हणण्यावरून '५००' रूपये दिले होते...'२५०'रुपयात पूजेसाठी सामान, अभिषेकसाठी दुध घेतलं. '२५०'पुजा-याची दक्षिणा बाजूला काढून ठेवली....
पोरगं दुधाची पिशवी बघून जास्तच कोकलाया लागलं. तसं तिने पिशवी पदराआड दडवली. एक दिवस पोरगं उपाशी राहिलं तर मरणार नाही. पण ही साडेसाती त्याचा जीव घेतल्याशिवाय कशी राहील..? पण पोरगं ऊन्हानं अन् भुकेने कळवळून रडत होतं. आईचं काळीज फाटत होतं पण ती स्वतःच स्वतःला दिलासा देत होती... ही शांती तुझ्यासाठीच करतेय रे लेकरा. पूजा झाली की प्रसाद खाऊ घालते अन् माझाबी शनिवार सोडते...
 ऊन आता पार डोक्यावर आले होते. एकदाचं मंदिर गाठलं. आतल्या नळावर तिनं हातपाय धुतले, पोराच्या तोंडावरून पाण्याचा हात फिरवला. एकदम थंडगार वाटलं. तिनं देवाला नमस्कार केला. पुजा-याला आवाज दिला. पुजारी जेवत होता. पाटलांच्या घरुन आताच शिधा आली होती. पुजा-याने तिथूनच तीला सांगितलं... " माई, थोडा वेळ लागेल. देवाची विश्रांतीची वेळ आहे. अर्धा तासाने करू अभिषेक अन् पूजा. तू तोपर्यंत आराम कर..."
तिने लेकराकडं पाहिलं. ते पार भेळकांडून गेलं होतं. तिच्याबी पोटात कावळे ओरडत होते. तिनं हात जोडून पुजार्‍या ला विनवणी केली... " लेकरू लय भुकाजून गेलंय महाराज, पूजा झाली असती म्हणजी प्रसादाचं दोन घास त्याला खाऊ घातलं असतं..."
" अगं माई, तुझ्या लेकरापायी मी देवाची झोपमोड करू काय..? देवाच्या कार्याला थोडी कळ सोसावीच लागते. थांबायचं असेल तर थांब नाहीतर पुढच्या शनिवारी ये..." पुजारी ताटावरूनच तणतणला....
तिनं हात जोडलं... " नाही महाराज, मी थांबते. देवाच्या झोपमोडीचं पाप माझ्या माथी कशाला..? "  अन् ती लेकरापाशी जाऊन बसली...
ऊन उतरणीला लागलं होतं. दोन तास उलटून गेले होते, लेकरू भुकेने कासावीस होऊन झोपी गेले होते. देवाची झोप होईपर्यंत पुजा-याने सुद्धा वामकुक्षी घेतली. तिचा बी डोळा लागला होता. पुजा-याने हाक दिली तशी तिला जाग आली. पुजा-या पुजेचं सामान घेतलं. अभिषेकाचं दूध घेऊन अभिषेक केला. उरलेले दूध देवासाठी ठेवून दिले. पूजेचा अर्धा नारळ तिला दिला. तिनेही भक्तीभावाने शनीला अन् पुजा-याला नमस्कार केला.  आणि '२५०' रुपये व कवटीचा रुपया मिळून एकूण '२५१' रुपये दक्षिणा पुजा-याच्या हातावर ठेवली...
पुजा-याने तीला प्रसाद दिलाआणि शांती झाल्याचं सांगितलं. प्रसाद घेऊन लगबगीने ती लेकराकडं गेली... लेकराला हाका मारल्या, हलवले पण ते मात्र थंडगार निपचित पडले होते... भुकेने आणि उष्माघाताने त्याचा "बळी" घेतला होता. तिने मोठ्याने टाहो फोडला. तिच्या हंबरड्याने मंदिराचा गाभाराही गलबलून गेला... पुत्रवियोगाच्या अतीव दु:खात तिनंही तिथेच प्राण सोडला. एक प्रश्न मात्र तसाच अनुत्तरीत राहिला... शांती नेमकी कुणाची झाली..? शनीची, पुजा-याची का तिच्या लेकराची..?

"हजारो वर्षापासून अज्ञान आणिअंधश्रद्धेत पिचत पडलेल्या माझ्या या बहूजन समाजाची या मानसिक गुलामीतून सुटका होईल की नाही..? हा ही प्रश्न तेवढाच अनुत्तरीत आहे..."