धर्म विज्ञानवादाला का घाबरतो?
============================
नको तो धर्म मजला जो मला ना पाळता आला,
नको तो धर्मग्रंथ मज जवळी जो मला ना चाळता आला,
एकच दिवा बनुनी आले तथागत, ज्या दिव्याच्या सहाय्याने या जगाचा अंधार मला न्याहळता आला........
धर्माचा पाया डळमळीत आहे. कुठलाही धर्म स्वतः वरची टीका खपवून घेऊ शकत नाही. धर्माच्या बाबतीत थोडासा जरी कोणी हस्तक्षेप केला, तरी अनुयायी लगेच भडकतात. धर्मावर संकट कोसळल्याचा गदारोळ करतात. आपल्या पितळ उघडे तर पडणार नाही ना, याची भीती त्यांना सतत सतावत राहते. धर्माच्या बाबतीत बुद्धीवादाला काहीही स्थान नाही. म्हणूनच धर्म ही विश्वासाची, श्रद्धेची बाब असल्याचं बोललं जातं. तुम्ही फक्त अंध भक्त व्हा. बुद्धिवादाचा प्रश्न आला की, धर्माचे रखवालदार नि:शब्द होतात. ते मूळ प्रश्नापासून पळच काढतात. कारण या प्रश्नांची उत्तर त्यांच्याजवळ नसतात.
धार्मिक संस्थांना शिक्षणाच्या बाबतीत एकाधिकार का हवा असतो?
लोकांमध्ये योग्य शिक्षण आणि विचारसरणीचं बीज रुजू नये म्हणून धार्मिक शिक्षणावर भर दिला जातो. आधुनिक शिक्षण, आधुनिक विचारसरणी आणि संस्कृतीला धर्म घाबरतो. कारण त्यांच्यामुळे धर्माचं आणि धर्माच्या आधारावर स्वतःची पोळी भाजणाऱ्यांच्या कमाईवर परिणाम होतो. विज्ञान व आधुनिक शिक्षण सृष्टीची नवीन कोडी करतात. ते बुद्धिवाद आणि पुराव्यांच्या आधारे सत्य परिस्थिती मांडतात. पण धर्मामध्ये ईश्वर व सृष्टी याबाबतच्या गोष्टींना कुठलाही पुरावा नसतो. त्यामुळे सत्य सांगणारं शिक्षण धार्मिक संस्थांच्या दृष्टीने धोकादायक असतं.
धर्मप्रचारक इतर धर्मांना नाव का ठेवतात?
कोणताही दुकानदार स्वतःचा माल खराब असल्याचं सांगतो का? नाही ना. त्याचप्रमाणे प्रत्येक धर्मप्रचारक इतर धर्मातल्या त्रुटी सांगण्यात गुंतलेला असतो. इतर दुकानातल्या ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेणे हे यामागील साधं गणित असतं. प्रत्येक धर्माची पहिली अट हीच असते की, आपल्या धंद्यावर परिणाम होईल असं कुठलंही विधान त्याच्या अनुयायाने किंवा विरोधकांनी करू नये; मग ते सत्य का असेना.
धर्माच्या नावाखाली पैशाच्या उलाढाली का होतात?
धर्म व देव यांची निर्मितीच पैशासाठी केली गेली आहे. हे जाळंच अशा पद्धतीने विणलं गेलंय की, माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत धर्म व ईश्वर यांच्या जंजाळात अडकून राहावा. पावलोपावली त्याच्या खिशातून पैसा काढून तो धर्माच्या दलालांच्या खिशात जात राहावा. हे दलाल सुखसमृद्धीची आश्वासनं देतात; पण खात्री देत नाहीत. नरकाची, वाईट शक्तीची भीती, देव नाराज होण्याची भीती, स्वर्गाचं व सुखाचं आमिष दाखवून हे दलाल माणसाचा खिसा खाली करीत राहतात.
प्रत्येक धर्म दुसऱ्या धर्मियांची डोकी का फोडतो?
शांततेने प्रेमाने व बंधुभावाने राहिले तर धर्माच्या ठेकेदारांनी खायचं काय? जगात जर चोहीकडून प्रेमाच्या नद्या वाहू लागल्या तर धर्माची सर्व दुकानं बंद पडतील. आपापसातील व्देष, भांडणे व मारामारी यावर हे सगळं चालतं. जितके जास्त अनुयायी, तितकी जास्त कमाई. आपल्या भक्तांमध्ये दुसर्या धर्माची भीती व राग निर्माण करून पैसा सहजपणे गोळा करता येतो.
धर्म त्यागावर का भर देतात?
कारण तुमच्या कष्टाच्या कमाईवर धार्मिक संस्था आणि त्यावर अवलंबून असणारे चैनीत राहू शकतील. सर्व धार्मिक संस्था धनाने ओसंडून वाहत आहेत. समृद्धीने उजळून निघत आहेत. इथले साधुसंत, गुरु, प्रवचनकार, शंकराचार्य बसल्याबसल्या सर्व प्रकारची सुखं उपभोगत आहेत. म्हणजे सर्वसामान्यांनी मोहमायेचा त्याग करायचा आणि धर्माच्या ठेकेदारांनी याच मायेतून मजा करायची.
धर्म मोक्षाच्या गोष्टी का करतो?
मृत्युनंतरच माणसाचं काय होतं, हे कोणालाच माहीत नाही. धर्म संस्थापकांनी मोक्ष नावाची कल्पना शोधून, तिला आपल्या उत्पन्नाचं साधन बनवलं. जेणेकरून मोक्ष मिळवण्यासाठी लोक पुजाऱ्यांना लाच देत राहतील. देवाला भेटण्यासाठी पैसा, स्वर्ग मिळवण्यासाठी पैसा, मोक्ष मिळवण्यासाठी पैसा असं हे धर्माच्या साम्राज्याच अराजक स्वरूप आहे. धर्माच्या क्षेत्रात खूप घोटाळा आणि भ्रष्टाचार आहे.
धर्माचे रहस्य समजून घेण्यासाठी तुमच्या मेंदूची कवाडं उघडी पाहिजेत. डोळे मिटून विश्वास ठेवण्या ऐवजी स्वतःच्या बुद्धीने विचार केला पाहिजे. मग आपोआपच तुम्हाला धर्मावरच्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. पण यातली अडचण अशी आहे की, धर्माचे हे ठेकेदार तुमच्या मेंदूचे दरवाजे उघडून देत नाहीत.
संकलन
प्रा.एम.एम.सुरनर सर
0 Comments