" 'शिक्षक' आदर्श समाजाचा शिल्पकार "
============================
भारतीय परंपरेत शिक्षकाचे स्थान सर्वोच्च आणि सर्वोत्कृष्ट आहे. आई आणि वडिलांच्या नंतर शिक्षकांचे स्थान मार्गदर्शकाच्या भूमिकेतून आपल्या परंपरेत अधोरेखित केले आहे. आई वडिलांमुळे जन्म मिळतो आणि आपण या जगात येतो. पण शिक्षकांमुळे आपल्याला जगाचे ज्ञान होते. वाचन, लेखन,शिस्त, शहाणपण, संस्कृती,संस्कार, खेळ, कौशल्य,ज्ञान आणि ज्ञानाचे संस्कार यात शिक्षकांची भूमिका पायाभूत आहे. ज्ञान, चारित्र्य आणि संस्कार या व इतर महत्त्वपूर्ण मूल्याची रुजवणूक आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये व प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये होत असते. शिक्षकांनी केलेल्या अध्यापन संस्कारामुळे आपल्या आयुष्यामध्ये व प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात ज्ञानाचा प्रकाश पडतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये शिक्षकांचे व्यक्तिमत्व एक प्रेरणादायी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून मोलाचे असते. उद्याच्या उज्वल, उन्नतीमय समाजासाठी... चारित्र्यसंपन्न संस्कारशील राष्ट्रासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात यशस्वी जीवनाचे सामर्थ्य आणि आत्मविश्वास पेरण्याचे कार्य शिक्षक करत असतो. शिक्षक नुसते ज्ञान आणि कौशल्य शिकवत नसतो तर शिक्षक सर्वप्रिय माणूस घडण्यासाठी जे जे मूल्य आवश्यक आहेत त्या मूल्यांचे अध्यापन घटकाच्या माध्यमातून संस्कारही करत असतो. म्हणून शिक्षकांच्या जवळ ज्ञानाचा साठा असावा आणि असतो. शिक्षकांच्या हाताखालून जाणार्या आणि संस्कारीत होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे आयुष्यच प्रकाशमान होते. प्रत्येक शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाला नैतिकतेचे अधिष्ठान चिकटलेले असते.
शिक्षकाच्या ठिकाणी आदर्श व्यक्तिमत्वाचे गुण संपादित झालेले असतात. राष्ट्र देश आणि समाज यांचे भविष्य शिक्षकांच्या हातात असते. विद्यार्थ्यांच्या पिढीबरोबरच समाज घडवण्याचे कार्य म्हणजे शिक्षकांचे एक पवित्र कार्य आहे. म्हणून म्हणतात ज्या राष्ट्राचे शिक्षक नीतिवान, ज्ञानवान, चारित्र्यवान असतात त्या राष्ट्राचे भवितव्य उज्वल आणि उन्नतीमय असते. प्रत्येक विद्यार्थ्याचे चारित्र्य शिक्षकांच्या माध्यमातून घडत असताना परिणामी समाजाचं चारित्र्य घडत जातं. समाजही नीतिवान, चारित्र्यवान घडायला मदत होते ती शिक्षकामुळेच. म्हणून आपल्या देशाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.
ज्ञानाबरोबर, चारित्र्याबरोबर, आणि संस्कारबरोबर व्यावसायाचेही शिक्षण शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असते. म्हणजे व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाताला स्वकमाईचे आणि स्वकष्टाने पैसा मिळवण्याचे कौशल्य प्राप्त होत असते. व्यवसायिक कौशल्यपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्याची कला शिक्षकांच्या जवळ असते. आई-वडिलांच्या नंतर शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे पालक असतात. म्हणून देशाच्या आणि राष्ट्राच्या घडणीत शिक्षकांचे योगदान सर्वश्रेष्ठ आहे. आपले भविष्य त्याला माहित असते आणि आपल्या भविष्याला जो आकार देऊ शकतो त्याचे नाव शिक्षक असते. म्हणून विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या भविष्याच्या जडणघडणीचा कलाकार हा शिक्षकच असतो.
शिक्षकाची भूमिका या बरोबरच समाजामध्ये एक नीतिवान माणूस बनवण्याचं महत्त्वाचं कार्य आहे़. शिक्षकांनी घडवलेल्या विद्यार्थ्यामधूनच भविष्यामध्ये समाजकारणी आणि राजकारणी घडत असतात. एक चांगली नीतिमान, ज्ञानवान आणि माणुसकीवान व्यक्तीच समाजाच्या विकासासाठी सकारात्मक योगदान देऊ शकते. म्हणून आम्हाला अशा कौशल्यपूर्ण आणि ज्ञानसंपन्न शिक्षक या व्यक्तिमत्त्वाची गरज असते.
शिक्षकांच्या हाताखाली वावरणारे विद्यार्थी ही वेगवेगळ्या क्षमतेची आणि वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे असतात. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे अनुभवाचे परिस्थितीचे आणि क्षमतेची जाणीव शिक्षकच ओळखतात आणि त्याप्रमाणेच त्याला घडवण्यासाठी किंवा त्यांच्या कौशल्याला आकार देण्यासाठी शिक्षक रात्रंदिवस धडपडत असतात. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे कार्य शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा आणि बुद्धीचा कल लक्षात घेऊन शिक्षक त्याला घडवत असतात. म्हणूनच शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कमतरता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा सतत गुणगौरव करत त्यांना प्रबलन देत, त्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण बनवण्याचे कार्य शिक्षकांचेच आहे. यासाठी प्रत्येक शिक्षक त्याच्या आयुष्यात विद्वान आणि प्रज्ञावान असणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असणारी स्वयंपूर्णता सकारात्मकता, आशावादी, प्रामाणिकपणा, निर्व्यसनी आणि निर्मळ व्यक्तिमत्त्वाचे पडसाद विद्यार्थ्याच्या मनावर पडले पाहिजेत. असा शिक्षकांचे व्यक्तिमत्व असावं.
शिक्षकांच्या जवळ इतर वाचनाचे कौशल्य संपादित असावे. आदर्श आणि मौल्यवान ग्रंथांचा संग्रह त्याच्या जवळ असणे आवश्यक आहे. वाचनप्रियता हा गुण आणि चांगल्या विचाराचे संग्रह त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात करणे गरजेचे आहे. ज्ञानाबरोबर विविध कला आणि कौशल्याचे ज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. विविध सण, समारंभ आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्यामुळे सहभाग नोंदवून कौशल्य प्रवीण बनवणे हे शिक्षकांचे मोठे कार्य आहे. लेखन, वाचन, श्रवण या कौशल्याबरोबरच शारीरिक आणि भावनिक विकास यासाठीही शिक्षकाने प्रयत्न करायला हवे. गुणवंत खेळाडू देशाचे नाव उज्वल करू शकतो. म्हणून गुणवंत खेळाडूचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये शोधणे हे शिक्षकांचे कार्य आहे. याबरोबरच माहिती कौशल्याचे ज्ञानही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काळाबरोबर दिले पाहिजे. या काळाचे तंत्र आणि संगणकसारखे यंत्र कौशल्य काळाची गरज म्हणून ते ज्ञान विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. शिक्षक हा मातृहृदयी असावा कारण विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण कमी होऊन ते आपल्या शिक्षकांसमोर आपले मन मोकळे करायला तयार असतील. अध्यापनातील आलेल्या अडचणी व प्रश्न विचारू शकतील. म्हणून शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून अतिशय परिणामकारक आणि प्रभावी असणे समाजाच्या आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी गरजेचे आहे.
आजच्या समाजात आणि या तंत्रकुशल युगामध्ये शिक्षकांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कायम राहण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपल्याकडील ज्ञानाचा आणि कौशल्याचा साठा सदोदित वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. ज्ञानापेक्षा चारित्र्य हे खूप मोठे आणि महत्त्वाचे आहे. ज्ञानसंपन्न आणि चरित्रसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण असणे आवश्यक आहे. या काळाची पावले ओळखून आपल्याकडील ज्ञानाचे कौशल्याचे संपादन वाढवले पाहिजे. काळाप्रमाणे प्रवाही असून आपल्या व्यक्तिमत्त्वात चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे संपादनही करणे गरजेचे आहे. आपल्या परंपरेत शिक्षकांकडे समाज अतिशय पावित्र्याच्या दृष्टीकोनातून पहात असतो. म्हणूनच शिक्षकाने पावित्र्य आणि चारित्र्य क्षणाक्षणाला जपली पाहिजे.
आपल्या विद्यमान भारतीय परंपरेत अनेक गुरूंच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे आणि संस्कारामुळे अनेक विद्यार्थी घडले, मोठे झाले आणि महान बनले. अनेक महान विद्यार्थ्यांच्या नावावरून गुरूंची महती किर्तीमान झाली. आपल्या उज्ज्वल परंपरेमध्ये गुरुशिष्यांची परंपरा अतिशय नावाजली आणि जगासमोर आदर्श गणली आहे. त्या परंपरेचा पाईक होण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याला भारत देशाच्या महान परंपरेची महती वाढवणारा विद्यार्थी घडवण्याचे कार्य करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते अतिशय पवित्र्याने व विश्वासाने बांधले गेले पाहिजे. म्हणून पालक आणि विद्यार्थी यांना विश्वासात घेऊन शिक्षकाने आपल्या अष्टपैलू अध्यापनाच्या व संस्कारशील कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवून समाज आणि देशाला महान बनवण्याचे कार्य शिक्षकांच्या हातात आहे. आज या गौरवशाली कार्याची अपेक्षा प्रत्येक शिक्षकाकडून आहे. या शिक्षक दिनानिमित्त सर्व विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय आणि राष्ट्रप्रिय शिक्षकांना शिक्षक दिनाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा..
श्री दत्तात्रय जाधव,
संशोधक विद्यार्थी,
स्वा.रा.ती.म.वि.नांदेड.
संपर्क:-९६८९२५०२५१.
0 Comments